हल्ली अनेकांना खास करून शहरात राहणाऱ्या लोकांना उजव्या कोपराच्या बाहेर दुखू लागते. निरनिराळ्या गोळ्या वारंवार घ्याव्या लागतात. डॉक्टर टेनिस एल्बोचे निदान करतात. टेनिस हा खेळ न खेळतासुद्धा मला हा रोग कसा झाला याचे रुग्णाला आश्चर्य वाटते. हे दुखणे होण्यासाठी टेनिस किंवा बॅटमिंटनच खेळायला पाहिजे असे नाही. अधिक काम असलेल्या बाजूला हे दुखणे होते म्हणजे उजवीकडे असल्यास उजव्याला व डावीकडे असल्यास डाव्याला. आपल्या हाताची, तसेच मनगटाची हालचाल वरखाली सतत होत असते. ही अशीच हालचाल टेनिस, बॅडमिंटन व क्रिकेट खेळणाऱ्यांचीही होत असते. ही हालचाल करण्यास आपल्या मनगटाच्या वरच्या दोन्ही बाजूंचे स्नायू कारणीभूत असतात. त्यातील बाहेरच्या बाजूचे स्नायू अधिक वेळा वापरले जातात. हे स्नायू आपल्या कोपराच्या हाडाच्या बाहेरील भागास चिकटलेले असतात. सतत केल्या जाणाऱ्या वापरामुळे खेळाडूंत तरुणपणी आणि इतरांना मध्यम वयात या स्नायूंच्या हाडाच्या जोडणीला, म्हणजेच कोपराच्या बाहेरच्या बाजूला इजा होते व कोपर दुखू लागतो.
ऑफीसमध्ये जाणाऱ्या मंडळींना जड बॅग हातात उचलून, घरातील बायकांना चपात्या लाटून लाटून किंवा कपडे पिळून पिळून याच प्रकारची इजा कोपराजवळ बाहेरच्या बाजूला होते. नंतर याच नेहमीच्या क्रिया करताना कोपराजवळ बाहेरच्या बाजूला दुखू लागते. यासाठी खेळाडूंना कोपरावर एक पट्टा लावण्यास देतात. या पट्ट्याने हाडे आणि स्नायू यांच्या जोडणीवर दाब येतो आणि दुखणे सुसह्य होते. फिजिओथेरपिस्ट यावर अल्ट्रासोनिक लहरींनी शेक देतात त्यानेही बरे वाटते. हे दुखणे काही वेळा औषधे देऊन बरे करण्याचा प्रयत्न करतात तर काही वेळा कोपराजवळ नावाचे हायड्रोकॉटिझोन इंजेक्शन देऊन रोग बरा करतात. हे इंजेक्शन हाडाच्या आत न देता हाडाच्या बाजूला स्नायूंमध्येच करूनदेखील देतात. अशा प्रकारचे अनेक उपाय जर बरे वाटत नसेल तर छोटीशी शस्त्रक्रियाही करता येते. सचिन तेंडुलकरने ती करून घेतली आणि तो पुन्हा चांगले क्रिकेट खेळू लागला.
डॉ. सुशील सबनीस
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply