नवीन लेखन...

अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग ६

Thanksgiving Sale in America - Part 6

मी रांगेत उभा राहून आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेत होतो. लोकांच्या carts नुसत्या भरभरून ओसंडून वहात होत्या. माझ्या cart मधे जेमतेम तीन चार वस्तू असल्यामुळे, इतरांच्या तुलनेत माझी cart म्हणजे, गुटगुटीत पोरांमधे एखादंच किरकिरं पोर असावं, तशी दिसत होती. लोकांच्या चेहर्‍यावरून कृतार्थतेचा आनंद नुसता ओसंडून वहात होता. लोकांनी खरोखरच वर्षभराचं शॉपिंग या काही मिनिटांतच केलं असावं हे समजत होतं. वर्षभरातले येणारे सारे वाढदिवस, लग्न, anniversaries, कुणाकुणाला प्रसंगानुरूप द्यायच्या भेटी, यांच्या मोठया याद्या घेऊनच सगळे जण आलेले असतात. त्यामुळे यादीत असलेल्या सगळ्या वस्तू मिळवता आल्या, की इतक्या दिवसांचे प्लॅनिंग, धडपड, धावपळ, सारं काही कारणी लागल्यासारखं वाटणं हे साहजिकच असतं.

आता साडेसहा वाजले होते. माधवरावांचा अजूनही पत्ता नव्हता. माझी रांग हळू हळू सरकत होती. रांगेतले लोक अस्वस्थपणे, दुसर्‍या गावी चाललेल्या race च्या घोडयावर पैसे लावल्यासारखे, कासावीस होऊन सेलफोन्सवरून एकमेकांना काय चाललंय, ते विचारत होते. आमच्याकडे संपर्काचे काहीच साधन नसल्यामुळे, इतर आघाडयांवर काय परिस्थिती आहे हे समजायला काहीच मार्ग नव्हता. माझ्या तुकडीतला माझा सहकारी कुठे घायाळ होऊन पडला होता हे देखील मला ठाऊक नव्हते. एवढयात, “अहो हे काय? एवढया वेळात फक्त तीनच वस्तू मिळाल्या तुम्हाला ?” असा नलिनीबाईंचा खणखणीत आवाज त्या गोंधळातही मला स्पष्टपणे ऐकू आला. मी वळून बघितलं, माधवराव जत्रेत फिरणार्‍या लहान मुलासारखे भिरभिर्‍या नजरेने इकडे तिकडे बघत होते. नलिनीबाईंनी एक जळजळीत कटाक्ष टाकून माधवरावांच्या हातातून cart खसकन हिसकावून घेऊन खरेदीची सूत्रे आपल्या हाती घेतली.

मी मनातल्या मनात अनुपमाच्या प्लॅनिंगचे कौतुक केले. आदल्या दिवशी वेगवेगळ्या स्टोअर्समधे जाऊन, कोणत्या वस्तू कोठे ठेवल्या आहेत याचा ती अभ्यास करून आली होती. तिच्याबरोबर गेल्यामुळे, परीक्षेच्या आधीच पेपर मिळाल्यासारखा, या बायकांना दुकानातल्या वस्तूंच्या मांडणीचा नकाशा, बाहेर रांगेत असतानाच समजला होता. त्यामुळे वीस मिनिटांत शॉपिंग संपवून, check out करून, दुसर्‍या दुकानात पुढचं शॉपिंग करायला त्या तयार होत्या. नलिनीबाई आपल्या यजमानांना चांगलं ओळखून असल्यामुळे, त्यांनी अनुपमाला आम्ही असलेल्या दुकानापाशी गाडी घेण्यास सांगितली. तिथे त्यांना उतरवून बाकीची मंडळी पुढच्या दुकानापाशी निघून गेली. नलिनीबाईंच्या अधिपत्याखाली देशमुख कुटुंब देखील खरेदी आटोपून माझ्या मागोमाग दहा मिनिटांतच बाहेर पडले.

दोन्ही गाडयांमधे विविध दुकानांच्या जागा ठळकपणे दाखवलेला, सू फॉल्स शहराचा road map होता. त्या नकाशाच्या व अनुपमाने देऊन ठेवलेल्या सूचनांच्या आधारे आम्ही पुढच्या दुकानात जाऊन आमच्या बाकीच्या ग्रूपला गाठले. पहाटेच्या खरेदीचा पहिला आवेग आता थोडा कमी झाला होता. पण अजूनही गर्दी कमी होण्याची काही चिन्हं नव्हती. लगबगीने चाललेली खरेदीची धावपळ, हवी असलेली वस्तू मिळते की नाही याच्या बद्दलची आतुरता, हवी असलेली वस्तू मिळाल्यावर होणारा विजयोन्माद आणि आपण पोहोचेपर्यंत आपल्याला हवी असलेली वस्तू संपली असली की निघणारे निराशेचे उसासे, अजूनही चालूच होते.

माधवरावांना काही कंप्युटरशी निगडीत अशा वस्तू घ्यायच्या होत्या. ते आपले वरच्या शेल्फवरच्या वस्तू न्याहाळीत उभे होते. एवढ्यात एका बाईने पुढे घुसून ते बघत असलेली वस्तू नेमकी उचलली आणि आपल्या cart मधे टाकली. “अहो ती बया घुसली ना तुमच्या पुढे ! असे नुसतेच बघत बसाल तर सगळ्या गोष्टी संपून जातील”, नलिनीबाई खेकसल्या. “अग जाउंदे; बाई आहे ती!” माधवरावांनी बचावाचा दुबळा प्रयत्न केला. “अहाहा ! काही स्त्रीदाक्षिण्य उफाळून यायला नकोय तुमचं नको त्यावेळी. हे एवढे सगळे एरंडासारखे वाढलेले गोरे लोक धावतायत इकडे तिकडे, ते काय मला जाऊन देतायत का पुढे? जे दिसतंय ते उचला आणि चला पुढे” नलिनीबाईंनी सोक्षमोक्ष लावला.

पुढच्या दोन तीन तासांत आम्ही सगळ्यांनी मिळून आणखी चार पाच मोठी स्टोअर्स पालथी घातली. ज्यांची एखाद्या दुकानातली खरेदी संपायची त्यांना इतरांची खरेदी होईपर्यंत थांबणं भाग असायचं. कुणाचा पाय कुठल्या दुकानातून निघत नसायचा तर कुणाचा जीव खरेदीच्या पुढच्या टप्प्यातल्या, न पाहिलेल्या दुकानात अडकलेला असायचा. कुणाच्या चेहर्‍यावर हवी असलेली वस्तू मिळाल्यामुळे, कुंभमेळ्याला अलाहाबादला जाऊन त्रिवेणी संगमात स्नान केल्यासारखा कृतार्थ भाव असायचा. तर कुणी, आपण घेतलेल्या वस्तूपेक्षा, दुकानातील न घेतलेली वस्तू तर अधिक चांगली नव्हती ना, या कल्पनेने व्याकूळ झालेला असायचा.

– डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..