भारतातील पहिले व्यावसायिक हवाई उड्डाण १८ फेब्रुवारी १९११ रोजी अलाहाबाद ते नैनी असे १० किलोमीटरचे होते. फ्रेंच नागरिक-मॉल्सियर पिकेट विमान चालक होता. पण मुलकी प्रवास सेवा १९१२ सालच्या डिसेंबर महिन्यात सुरू झाली. ती कराची ते दिल्ली अशी होती. हे उड्डाण इंडियन स्टेट एअर सर्विसेस या कंपनीने इंग्लंडमधील इंपिरियल एअरवेज या कंपनीच्या मदतीने केले.
तीन एक वर्षानंतर कराची ते मद्रास ही सेवा नियमितपणे सुरु झाली. पण पुरेशा सरकारी पाठिंब्याअभावी लवकरच ती बंद करायला लागली.
१९४७ मध्ये भारतात नऊ हवाई वाहतूक कंपन्या होत्या. त्यातली ओरिएंट एअरलाइन १९४८ मध्ये पाकिस्तानात गेली. त्यानंतर भारतात प्रामुख्याने टाटा एअर लाइन्स, इंडियन नॅशनल एअरवेज, एअर सर्विस ऑफ इंडिया, डेक्कन एअरवेज, अंबिका एअरवेज, भारत एअरवेज आणि मिस्त्री एअरवेज या कंपन्या कार्यरत होत्या.
१९४८ साली भारत सरकार व टाटा एअरलाइन्स (नंतरची एअर इंडिया) यांनी एक संयुक्त संस्था स्थापन केली. त्याचे नाव होते एअर इंडिया इंटरनॅशनल. त्यात दोन कोटीचे भांडवल घातले होते. त्यावेळी या कंपनीकडे तीन लॉकहीड कॉन्स्टलेशन विमाने होती. ८ जून, १९४८ रोजी या कंपनीने पहिली मुंबई-लंडन सेवा सुरू केली. पण ती नीट न चालल्याने नंतर १९५३ मध्ये तिचे सरकारीकरण करून हवाई वाहतूक मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली ती आणली.
टाटा एअरलाइन्स ही जे. आर. डी. टाटा व नेव्हिल विन्सेंट यांनी संयुक्तरित्या सुरू केली. १९४८ मध्ये ती एअर इंडिया इंटरनॅशनलमध्ये आली व १९५३ मध्ये ती सरकारी संस्था झाल्यावर परदेश प्रवासासाठी एअर इंडिया आणि देशांतर्गत वाहतुकीसाठी इंडियन एअरलाइन्स असे विभाजन झाले. १९९३ मध्ये एअर टॅक्सीची पद्धत सुरू झाली. १९९४ पासून खाजगी कंपन्यांना विमान वाहतुकीची परवानगी देण्यात आली. २००३ पासून स्वस्तातील तिकिटाची योजना सुरू झाल्याने विमान प्रवास मध्यमवर्गाच्या आवाक्यात आला.
– डॉ. अविनाश वळवडे, पुणे
मराठी विज्ञान परिषदेच्या कुतुहल या सदरातून साभार
Leave a Reply