पहिल्या महायुद्धाच्या शेवटास विमानाचा उपयोग लढण्यासाठी झाला. त्यात भारतीय तरूण योद्ध्यांनी नैपुण्य तर मिळविलेच पण त्यांनी नावही कमावले. यामुळे इतर भारतीय तरूणांना सैन्यात अधिकारी म्हणून जायची ईर्षा निर्माण झाली. ब्रिटिश सरकारने याची दखल घेतली. त्यासाठी सँडहर्स्ट समिती स्थापन झाली. या समितीच्या शिफारशीनुसार भारतीय तरूणांना रॉयल एअर फोर्समध्ये शिक्षणाची संधी मिळून नंतर त्यांना सैन्यातही प्रवेश मिळाला. ८ नोव्हेंबर, १९३२ मध्ये भारतीय वायुसेनेची स्थापना झाली.
पहिल्या सहा लोकांना वैमानिकी शिक्षणासाठी क्रॅनवेल येथे पाठविण्यात आले तर रेल्वेतून निवडलेल्या २२ लोकांची हवाई सिपाही पदाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. रॉयल एअर फोर्समध्ये विमाने दाखल झाली ती सर्व अमेरिकन आणि ब्रिटिश बनावटीची होती. ३ सप्टेंबर, १९३९ रोजी सुब्रोतो मुखर्जी एका स्क्वाड्रनचे प्रमुख झाले. हे वायुदलातले पहिले भारतीय. त्यांना एओसी इंडिया कमांड म्हणून नेमले होते. १२ मार्च १९४५ रोजी आपल्या वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एअर फोर्स झाले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर एअर मार्शल एल्महर्स्ट ऑगस्ट १९४७ मध्ये भारतीय वायुसेनेचे प्रमुख झाले.
त्यावेळी विमानांना जी इंजिने बसवलेली असत, त्यात पिस्टन असे. त्याची जागा नंतर गतीमान जेट विमानांनी घेतली. प्रथम नॅट, हंटर, कॅनबेरा यासारखी ब्रिटिश बनावटीची विमाने आली. नंतर त्यांची जागा फ्रेंच बनावटीच्या विमानाने घेतली. त्यानंतर प्रामुख्याने रशियन बनावटीची लढाऊ आणि मालवाहू विमाने आली. रशियन हेलिकॉफ्टर्स आली.
आधुनिक रडार यंत्रणा, मिसाइल्स, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर सी-४ आय ही संगणक प्रणाली हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी क्षेपणास्त्रे इत्यादी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे आपल्याकडे आली आहेत. एसयु-३० एनकेटी ही विमाने वापरून आपण अमेरिकेच्या लढाऊ विमानांच्या तुकडीवर मात केली आहे. त्यामुळे भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.
– डॉ. अविनाश वळवडे, पुणे
मराठी विज्ञान परिषदेच्या कुतुहल या सदरातून साभार
Leave a Reply