वसंताचा गोडवा हळू हळू कमी होत हवेतील उष्णता वाढते आहे. आता होळी व पुढे गुढीपाडवा आहेच. जोडीला लग्नसराई चा सुद्धा हाच ‘सिझन’ ठरलेला.
तेव्हा ‘कुच मिठा हो जाएं?’
पूर्वी सणावाराला होणारे परंतु हल्ली डेअरी च्या कृपेने बारमाही खाल्ले जाणारे ‘श्रीखंड’ हे ह्या उन्हाळ्याच्या मिष्टांनात अव्वल आहे. आज थोड त्याबद्दलच बोलूयात.
बहुतेक सर्वांना ताक, दही, लस्सी हे थंड आहेत असेच माहित असते. हो हे सर्वच थंड आहेत पण केवळ स्पर्शाला !! म्हणजे ?? म्हणजे हे दुधाचे पदार्थ आंबट आहेत, स्पर्शला गार आहेत ( म्हणून पितांना गार वाटतात) पण त्यांचे शरीरातील परिणाम हे उष्ण आहेत. सतत दही, लस्सी आणि तेही उन्हाळ्यात घेण म्हणजे पित्त व रक्ताचे आजारांना तत्काळ आमंत्रणच. म्हणजेच उन्हाळ्यात हे खाण-पिण व तेही भर उन्हात उभे राहून हे जरा रिस्कीच…. नाही का? ज्यांना पूर्वीच पित्ताचे वा रक्ताचे आजार आहेत त्यांनी ह्यांच्या पासून दोनहात लांबच राहिलेले बर.
पण, आपल्यला अस्वस्थ करणारी जीभ हे कस सहन करेल ?
श्रीखंड हा ह्यावर थोडाफार उतारा असू शकतो. ज्यात दह्याचा आंबटपणा व साखरेचा गोडवा देखील आहे. पण तेही असेच कसेही खाऊन नाही चालणार.
हा पदार्थ काही युरो-अमेरिकन नाही. तेव्हा तो केव्हा, कसा खावा ह्याबद्दल नेमकं मार्गदर्शन आपल्या वैदिक साहित्यात – आयुर्वेदात उपलब्ध आहे.
आपण जे आज विकतचे श्रीखंड खातो ते खरे तर शास्त्रात वर्णीत रेसिपीच्या अर्धेच आहे. म्हणजे असे की श्रीखंडात चक्का व साखर एक सारख्या प्रमाणात एकत्र करणे ह्यालाच आपण श्रीखंड म्हणतो वा तेच आपण विकत आणतोय. ह्यात आजून महत्वाचे दोन घटक आजमितीस आपण घालत नाही वा ते घालून परिपूर्ण श्रीखंड होते हे आपणास माहितच नाही. त्यामुळे आज खाल्ले जाणारे श्रीखंड अनेकांना बाधते. त्याने कफाचे त्रास वाढतात.
आपण छोटासा बदल करूयात. विकतच्या (घरी केलेल्या सुद्धा!) श्रीखंडात थोड साजूक तूप व मध मिसळून खाऊयात!!
ढोबळ मानाने चार चमचे श्रीखंडात ३ (तीन) चमचे तूप व २ (दोन) चमचे मध कालवून हे चांगले ढवळून घ्यावे. त्यावर स्वादानुसार वेलची पूड, दालचिनी पूड , तमाल पत्र पूड वा जायफळ पूड घालून (जमल्यास किंचित कापूर लावून) हे श्रीखंड आपल्या आराध्य देवास नैवेद्य म्हणून दाखवावे आणि आपण प्रसाद म्हणून घ्यावे. (प्रमाण आपल्या रुची नुसार कमी अधिक निश्चित होईल.)
वरील तूप-मध मिश्रित श्रीखंड सहसा बाधत नाही. त्याने तोंड उगाच चिकट रहात नाही. हे श्रीखंड चांगले पचते. थोड खाऊनही चांगली तृप्ती देते. वजन वाढवते. विशेष म्हणजे जुनाट सर्दी चा त्रास असलेल्या लोकांना सुद्धा हे मानवते. त्यांना ताकद देते. त्यांची सर्दी कमी करते. लहान मुलांना ह्या श्रीखंडाने सहसा कफाचे विकार होणार नाहीत. ( जे विकत च्या श्रीखंड व आईस्क्रीम मुळ हमखास होतात. )
तेव्हा यापुढे अगदीच जेवतांनाच श्रीखंडाची वाटी समोर आली तर आठवणीने थोड तूप-मध कालवून घ्या. हा उन्हाळा सुखद व उत्तम आरोग्याचा जाईल.
अधिक माहिती साठी
वैद्य सौरभ अच्युत जोशी.
एम डी आयुर्वेद
नाशिक
संपर्क – 9423964516
छोट्या सवयी – मोठे लाभ
Leave a Reply