सलिल चौधरी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२२ रोजी झाला. त्यांचे वडील आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये डॉक्टर म्हणून काम करीत.
सलिलदांचे बालपण चहाच्या मळ्यांच्या निसर्गरम्य परिसरात गेले. ब्रिटीश मालकवर्गाच्या सहवासामुळे आणि जात्याच आवड असल्यामुळे सलिलदांच्या वडिलांनी पाश्चात्य संगीताच्या ध्वनीमुद्रिकांचा प्रचंड संग्रह केला होता. कुशाग्र बुद्धीमत्ता आणि ग्रहणशीलता असल्यामुळे कुठल्याही गुरूच्या मार्गदर्शनाशिवायच ते स्वरमालिका शिकले एवढेच नव्हे तर ऐकलेले किंवा सुचलेले स्वर लिपीबद्ध करू लागले. पियानो, हार्मोनियम व व्हायलिनसारखी पाश्चात्य वाद्ये आणि बासरी सारखी भारतीय वाद्येदेखील ते आपल्या स्वतःच्या प्रयत्नानेच वाजवायला शिकले.
संगीताच्या क्षेत्रात अशी एकट्याने वाटचाल सुरू असतांना त्यांच्या मनावर साम्यवादी विचारांचा प्रभाव पडत होता. गरीब मजूरांना एकत्र आणून त्यांच्या समस्यासाठी लढा देणे वगैरे गतिविधींना सुरुवात झाली. पुढील काळात ते संगीताकडे वळले नसते तर खचितच राजकीय पुढारी झाले असते, किंवा कदाचित प्रसिद्ध साहित्यिकही झाले असते.
त्यांनी गाणी लिहिली तसेच कथा सुद्धा लिहिल्या आणि त्या चांगल्या गाजल्या. त्यांनी लिहिलेली नाटके बंगाली रंगभूमीवर आली आणि लोकप्रिय झाली. बंगाली भाषेतील चित्रपटांसाठी कथा व गाणी लिहिली ती सुद्धा यशस्वी झाली. बंगाली चित्रपटक्षेत्रात त्यांचे नांव झाले. ती पाहून तिचे हिंदीत रूपांतर करण्यासाठी स्व.बिमल रॉय यांनी सलिल चौधरी यांना मुंबईला पाचारण केले आणि या कथेवर आधारित ‘दो बीघा जमीन’ हा चित्रपट करण्यासाठी ते मुंबईला आले. हा चित्रपट चांगला गाजला. बिमल रॉय यांचे कुशल दिग्दर्शन व बलराज साहनी यांनी विलक्षण ताकदीने साकारलेली त्यातली प्रमुख भूमिका तर लक्षात राहिलीच. पण सलिल चौधरींची कथा, त्यांनी दिलेले प्रभावी पार्श्वसंगीत आणि त्यातील ‘धरती कहे पुकारके … मौसम बीता जाये’ हे गाणे खूप गाजले. त्यानंतर अनेक वर्ष ते बिमलदांच्या बरोबर राहिले.
‘मधुमती’ची सगळीच गाणी परत परत, ऐकावीत अशी. ‘आजा रे परदेसी’, ‘सुहाना सफर’ आणि ‘दिल तडप तडप के..’ ‘घडी घडी मेरा दिल धडके’, रफी साहेबांचे दर्द-भरे ‘टूटे हुवे ख्वाबों ने’ आणि ‘दैया रे दैया रे चढ गयो पापी बिछुवा..’ ‘जागो मोहन प्यारे’ ‘ओ सजना बारखा बहार आई..’, ‘जा रे उड जा रे पंछी..’ ‘ना जिया लागे ना..’, ही गाणी ऐकल्यावर वाटते की सगळ्या गायकांना सलीलदांनी नावीन्यपूर्ण पद्धतीनेच हाताळले आहे. स्वतःच्या चालीबद्दल काटेकोर असणारा संगीतकार म्हणजे सलील चौधरी.
सलील चौधरी यांचे ५ सप्टेंबर १९९५ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपिडीया
Leave a Reply