शाळेत असताना आणि नंतर कॉलेज मध्ये गेल्यावर पण जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे इंग्रजी आहे असा समज होता. पण नंतर नंतर जहाजावर असताना ब्राझील, रशिया, युक्रेन, इस्रायल आणि युरोपियन देशांमध्ये जहाजं किनाऱ्याला लागल्यावर बाहेर फिरायला गेलो की इंग्रजीला किती किंमत आहे ते कळून चुकायचे. नंतर नंतर स्पॅनिश ही भाषा सगळ्यात जास्त बोलली जाते असे कानावर यायचं आणि इंग्लिश चा नंबर तिसरा का चौथा लागतो असे सांगितले जायचे. पण हल्ली गूगल सर्च केले की जगात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा ही चायनीज आहे त्यापाठोपाठ स्पॅनिश मग इंग्रजी मग हिंदी, अरबी आणि बंगाली असा काहीसा क्रम दाखवला जातो.
ह्या भाषा बोलायला आणि समजण्यासाठी त्या त्या भाषा तुम्हाला शिकायला लागतात, आपली मातृभाषा सोडून इतर कोणतीही भाषा आपल्याला बोलायला किंवा शिकायला खूप अवघड असते.
पण जगात एक भाषा समजायला खूप सोपी आहे तसेच तिचा वापर सुध्दा इतर सर्व भाषांपेक्षा जास्त केला जातो. ही भाषा कोणत्याही देशात गेलो आणि कोणाशीही बोललो तरी पटकन समजली जाते. ती भाषा आहे, पैशांची भाषा जी रंगीत कागदाच्या कपट्यांद्वारे बोलली जाते. अक्षर आणि आकड्यांची ओळख नसलेले पण केवळ कागदाच्या रंगावरून ही पैशाची भाषा बोलू शकतात.
पैशाची पहिली भाषा म्हणून अमेरिकन डॉलर्सची ओळख झाली. पहिल्या जहाजावर असताना किनाऱ्यावर जाण्याकरिता कॅश अॅडव्हान्स म्हणून पगारातील काही रक्कम जहाजावर घेता येते त्यामुळे डॉलर्स ची भाषा पहिले समजली. ब्राझिल मधील अमेझॉन नदी मध्ये तीन दिवस रात्र जहाज चालल्यानंतर समुद्रापासून सुमारे 1800 किलोमीटर आत गेल्यावर मनौस या बंदरात पोहचले होते. या बंदरात जहाज जवळपास दहा ते पंधरा दिवस नांगर टाकून उभे असायचं. त्यामुळे एक दोन दिवसाआड रोजच किनाऱ्यावर जायला मिळत असे. त्यामुळे ब्राझिल मधल्या पैशाच्या भाषेची पण लवकरच ओळख करून घ्यावी लागली. अमेरिकन डॉलर्स किनाऱ्यावर गेल्यावर ब्राझिलियन रियाल या चलनात चेंज करून घ्यावे लागले. पहिले जहाज ब्राझीलच्या किनाऱ्यावर फिरत असल्याने फक्त डॉलर्स आणि रियाल याच दोन भाषा समजल्या. पण घरी परतत असताना साऊथ आफ्रिकन एअरवेज चे मुंबईसाठी कंनेक्टींग फ्लाईट जोहान्सबर्ग वरून मिळाल्याने साऊथ आफ्रिकन चलन पण बघायला मिळाले. त्यानंतर दुसरे जहाज यूरोप मध्ये मिळाले. पण इटलीत जहाजावर चढल्यावर जहाजावरुन पहिल्यांदा किनाऱ्यावर जाण्याकरिता इस्तंबूल शहराजवळील तुझला हे बंदर मिळाले. संपूर्ण जहाज इथे परीक्षण आणि पेंटिंग साठी ड्राय डॉक मध्ये म्हणजे पाण्याबाहेर काढले गेले होते. जवळपास पंधरा दिवस रोजचेच संध्याकाळी तुझला शहरात जायला मिळणार होते, त्यामुळे इथे लिरा या टर्किश चलनाशी ओळख झाली. यावेळी ATM कार्ड आणले असल्याने डॉलर्सची भाषा कमी वापरायला लागली. त्यानंतर आणखीन तीन चार जहाजे यूरोप मध्ये करावी लागल्याने रशियन रुबल, श्रीलंकन रुपी, रोमानियन लिवू, युक्रेनियन ह्रिव, युरो ,पाउंड, दिरहाम, सिंगापूर डॉलर्स, थाई बहाथ , इंडोनेशियन रुपिया अशा कितीतरी चलनाची देवाण घेवाण करायला मिळाली. जवळपास सगळ्याच देशात किती पैसे झाले किंवा या वस्तूची किंमत काय असे पण विचारावे लागत नाही, नोटा काढून समोर धरल्या की त्यातले हवे तेवढे घेऊन उरलेले बरोबर परत केले जातात. अत्यंत नम्रतेने आणि तितक्याच आनंदाने न बोलता सुध्दा बऱ्याच वेळा व्यवहार झाला आहे. इंग्रजी न समजणाऱ्या देशात बस किंवा टॅक्सी ने फिरताना किंवा मॉल मध्ये तसेच खरेदी करताना कधीच कुठे अडचण जाणवली नाही.
प्रत्येक देशात समोरच्याला इंग्लिश येवो न येवो पण एकदा का डॉलर्सच्या भाषेला त्यांच्या भाषेत चेंज केले की बोलायची आवश्यकताच पडत नसे. परदेशात काय आणि आपल्या देशात काय पैसा नावाचे रंगीत कपटे मिळवण्यासाठीच तर सगळे जण काम करत असतात. कोणी कोणी तर कामं न करता फक्त खाऊनच किंवा कोणाला टोपी लावून किंवा लुबाडून मिळवतो. कोणी कमी मिळतात म्हणून दुःखी असतो तर कोणाकडे जास्त आहेत म्हणून चिंतेने दुःखी असतात. एक वरिष्ठ अधिकारी तर नेहमी बोलायचा “साला इतना इंव्हेंस्टमेंट हो गया है की अब पैसा कहा घुमाऊ समझ में नहीं आता”. पैसे मिळत नाही म्हणून आणि मिळतात म्हणून पण लोकं रडतच असतात.
पैशाचे अनेक रंग आणि अनेक रूपे. जसे रंग आणि रूप वेगळे तशी किंमत पण वेगवेगळी. किंमत कमी असो नाहीतर जास्त पण शेवटी कागदच.
हेच कागदाचे रंगीत कपटे न बोलता कधीही कुठेही आणि कसही कम्युनिकेशन साध्य करत असतात हेच खरं.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर,
B.E. ( mech), DIM
कोन, भिवंडी,ठाणे.
पैशाच्या भाषेवरील छान लेख.
– एक लहानशी बाब.
जशा भारतात अनेक भाषा आहेत, तशा चीनमध्येही आहेत. उदा. हाँगकाँगजवळील भागात कँटोनीज बोलली जाते, तर बीजिंग भागात वेगळी. जिचा अनेकदा चायनीज असा उल्लेख केला जातो, ती म्हणजे मँडरीन.