पांगरी मार्गे देवरुखला जाणारा रस्ता अगदीच अरुंद. समोरून एसटी आली आणि बाईक चालवणारा धाडसी नसेल तर मातीच्या साईडपट्ट्यांवर बाईक जाणारच.
त्यादिवशी माझंही तसंच झालं. समोरचं एसटीचं धूड बघितल्यावर बावचळून मी बाईक साईडला घेतली . एसटीवाला निर्धास्तपणे गेला आणि मी साईडपट्ट्यांजवळ असलेल्या खडीच्या ढिगाऱ्यावर कोसळलो . गाडी माझ्या अंगावर पडली होती आणि मला ती बाजूला करता येत नव्हती .
पण माझ्या सुदैवाने , शेजारच्या झाडाजवळ जेवायला बसलेला एक तरुण धावत आला आणि त्यानं गाडी बाजूला केली. मला उठवलं आणि शेजारच्या त्या झाडाच्या सावलीत नेलं.
पाणी प्यायला देताना तो माझ्याकडे तो एकटक बघत होता. ” सर , तुम्ही आम्हाला शिकवायला होता.” तो म्हणाला , मी त्याच्याकडे बघत राहिलो.त्यानं काही काही संदर्भ दिल्यावर मला हळूहळू सगळं आठवायला लागलं.
तो अतिशय हुशार विद्यार्थी होता. अभ्यासू , कष्टाळू , नम्र. कला , क्रीडा आणि अभ्यासातील गुणवत्तेमुळं सतत दोन वर्षं तो आदर्श विद्यार्थी ठरला होता . बोर्डानं गुणवत्ता यादी बंद केली म्हणून अन्यथा बोर्डातही तो चमकला असता. इंजिनिअरिंग च्या सीईटी मध्ये त्याला चांगलं रँकिंग होतं. मला सगळं सगळं लख्ख आठवलं.
” तू इथे काय करतोयस ? इंजिनिअर झालास ना? ” ” इंजिनिअर नाही झालो सर मी आणि इथे दगड फोडतोय खडीसाठी…”
तो काही बोलणार इतक्यात कुणाची तरी हाक ऐकू आली. माझ्याकडे एकदा बघून तो हसला. गाडी उभी करून ठेवली आणि तो निघून गेला. त्याचा जेवणाचा डबा तसाच पडला होता . आणि त्या डब्याखाली दहाबारा कागद होते .
वाचावेत की नको या द्वंद्वात असताना मी अभावितपणे ते कागद उचलले . आणि वाचू लागलो…
— बस झालं शिक्षण. आता बाबाला मदत करायला हवी. खडी फोडून फोडून त्याचे हात जखमांनी भरून गेलेत. म्हातारा झाला बाबा आता. अजून किती दिवस…
— पुण्यातल्या या कॉलेजात , इथल्या झगमगाटात , मॉडर्न पोरांच्या कलकलाटात जमणार नाही आपलं काही. अभ्यास करताना बाबा आठवतो. अब्रू वाचवायला उसाच्या फडात गेलेली आणि जळलेली आई आठवते. आणि सगळं सोडून बाबाकडे धावावं वाटतं …
— स्टँडवर आलो , गाडीत चढलो आणि बाबा पुन्हा आठवला. खाली उतरलो. त्याला सांगितलं होतं ,
‘ मी नुसता इंजिनिअर नाही होणार , इंजिनिअरिंगचा अभ्यास करता करता कलेक्टरची परीक्षा पण देणार आणि तुझ्यावरच्या अन्याय दूर करणार.’ सांगितलेलं सगळं आठवलं आणि स्टँडवरून पुन्हा सरकारी होस्टेलवर आलो.
— कलेक्टर व्हायलाच हवं आणि अशा जागी पोहोचायला हवं की ज्या जागेवरून बाबाला सन्मानानं न्याय मिळवून देता येईल. फार सोसलंय बाबानं. – साखर कारखाना चालवणाऱ्या राजकारण्यांनी , बाबाची दहा एकर उसाची शेती हडप केली. त्याला फसवलं. कारखान्याचं सदस्य केलं. सहकारी बँकेतून वीस लाखांचं कर्ज उचलायला लावलं. बाबाच्या हातात वीस हजार ठेवले आणि त्याला आयुष्यातून उठवला. जाब विचारायला गेल्यावर त्या लोकांनी मारहाण केली आणि आईच्या पाठी गुंड लागल्यावर ती आपल्या उसाच्या फडात शिरली. उसाबरोबर तिनं स्वतःला जाळून घेतलं. अब्रू वाचवायला …
— अन्याय तर शाळा कॉलेजातसुद्धा होत होता. पेपर चांगला लिहूनसुद्धा मार्क दिले जात नव्हते. दहावी आणि बारावीला तर गुणांचा बाजारच मांडला होता शिक्षकांनी . सायन्सच्या प्रत्येक विषयाच्या वीस गुणांपैकी प्रत्येक गुणाला हजार रुपयांचा भाव होता. तिथले अनेक गुण पैशाअभावी नष्ट झाले. जिद्दीनं केलेल्या अभ्यासामुळं वाचलो.
सतत मानहानी… आर्थिक चणचण …गरिबी …सतत अन्याय …
नैराश्य . उदासी .
जीव द्यावा आणि सगळं संपवावं असं वाटायचं .
पण डोळ्यासमोर बाबा दिसायचा . त्याला झालेली मारहाण .. आईचा शेतात जळणारा देह …पोट भरण्यासाठी केलेली वणवण …
आणि घाटमाथा सोडून कोकणात रस्त्यासाठी खडी फोडण्यासाठी कंत्राटदाराकडे बाबाने केलेली नोकरी …ठराविक डेपो पूर्ण झाला नाहीतर त्याने मजुरी कापून घेतल्यावर उन्मळून पडणारा , हांजी हांजी करणारा बाबा …
– बाबा सारखा आठवायचा. जगण्यासाठी केलेली भ्रमंती आठवायची. भिकेला लागल्यावर नातेवाईकांनी फिरवलेली पाठ .
बाबाच्या मित्रांनी केलेली निर्भत्सना. कॉलेजमध्ये सगळ्यांनी टर उडवल्यावर सुटीत घरी आल्यानंतर कोलमडलेल्या मनाला सावरून धरणारा बाबा …
— सुटीचं इकडे आल्यावर बाबाला मदत करायची सवय लावून घेतली आणि बाबाच्या हाताच्या जखमा बघून , सोलपटलेले पाय बघून , खपाटीला गेलेलं पोट बघून उद्वेगानं शिक्षण अर्ध्यावर सोडलं आणि आता लहानशा झोपडीत बाबाला सांभाळतो. जरा दूर गेलो की तो घाबरतो , हाका मारत राहतो. बस. आता हेच आयुष्य. बाबाच्या शेवटच्या दिवसात त्याला जमेल तेवढं सुखी ठेवायचं…
मी हादरलोच त्याचं ते लिखाण वाचून .
— मी कागद उलटला. आता पुन्हा दचकायला झालं. हातात काहीच नव्हतं. हात रिकामे होते. म्हणजे मग , इतका वेळ आपण वाचलं ते काय? मन सुन्न झालं. एका अत्यंत हुशार विद्यार्थ्याच्या आयुष्याची सगळी शोकांतिकाच झाली होती. व्यवस्थेनं त्याचं आयुष्य खाऊन टाकलं होतं. मला राहून राहून एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. त्यानं अन्य कुणाकडे मदत का मागितली नाही ? अन्याय कुणाला का सांगितला नाही? की ती त्याची मजबुरी होती. की परिस्थितीनं त्याला हतबल केलं होतं? की मानसिक दृष्ट्या तो अपंग झाला होता… त्याला विचारायचं म्हणून मी उठलो. पण थांबलो. दूरवर खडी फोडल्याचा आवाज येत होता आणि त्याचं कुठंही लक्ष नव्हतं. एकाग्रतेनं तो खडी फोडत होता. मी गाडी वळवली आणि माघारी फिरलो. झाडाकडे एकदा पाहिलं. मघाशी दिसलेले कागद आता कुठंच दिसत नव्हते …
( पूर्णतः काल्पनिक ! )
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
दि .१४ जुलै २०२०
Leave a Reply