आम्ही युरोपच्या ‘टूरवर’ असताना , नेदरलँड ला उतरलो.तो दिवस होता ३ ऑगस्ट २००९. मोठा मुलगा आणि सून यांनी आधीच ठरविल्याप्रमाणे, ‘अॅन फ्रॅंक हाऊस ‘ नावाने जागतिक प्रसिद्धी पावलेल्या आणि ऐतिहासिक म्युझियम ला भेट देण्यास निघालो. तेंव्हा हा रस्ता जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य पर्यटकांनी फुलून गेला होता. इमारतीच्या दर्शनी भागाच्या समोर उभे राहून शेकडो पर्यटक ‘म्युझिअमचे ‘ फोटो काढून घेत होते. आम्ही प्रथम तिकीट काढून रांगेत उभे राहिलो आणि जेंव्हा त्या ‘वास्तूत ‘ मी पहिले पाऊल टाकले तेव्हा माझे अंग थरारले. विशेष लक्षवेधी बाबी म्हणजे अॅन फ्रॅंक हिचे ‘बोलके मंतरलेले डोळे’ असणारे चित्तवेधक चित्र आणि प्रवेशद्वारा समोरचा ‘पुतळा’.
(अने फ्रॅंक हाऊस, मेन गेट, बुक शेल्फ, दाराच्या पाठीमागील ‘शेल्फ’, अॅनेक्सकडे नेणारा जिना)
आत प्रवेश करतानाच आपल्यासमोर उभी राहते ती एक ऐतिहासिक इमारत, २६३, प्रिन्सेन ग्राच, जिच्यामध्ये अॅन फ्रॅंक आणि तिचे कुटुंबीय हिटलरच्या क्रूर नाझी सैन्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दडून बसले आणि तेही जून १९४२ पासून ४ ऑगस्ट १९४४ पर्यंत, त्यांना पकडून नेऊन बंदिवान करेपर्यंत म्हणजे तब्बल २५ महिने ! आत प्रवेश केल्यानंतर आपण १९४२ सालच्या नेदरलँड पादाक्रांत करणाऱ्या ‘नाझी जाचक कालखंडात’ प्रवेश करीत असल्याचा भास आम्हाला झाला. तिला आणि सर्व सहयोग्यांना भोगाव्या लागलेल्या हाल अपेष्टांची, कष्टांची मानसिक त्रासाची कल्पना प्रत्येक पावलागणिक आम्हाला होत होती.
या अंधार कोठडीसारख्या घरात आपल्या सहकाऱ्यांसमवेत ही छोटी ‘’अॅन फ्रॅंक’ अत्याचारी एडॉल्फ हिटलरच्या नाझी सैनिकांच्या भितीच्या छायेत कशी राहिली असेल? या तब्बल पंचवीस महिन्यांचा काळात, एक दैदिप्यमान अशी साहित्यिक डायरी– ‘अॅनफ्रॅंक’ डायरी’ (रोजनिशी) कशी लिहू शकली असेल? अश्या अनेक विचारांचे काहूर माजले. रोजनिशीतील प्रत्येक पत्र “जिवलग किट्टी” या काल्पनिक सखीला उद्देशून लिहिले आहे.
‘अने फ्रॅंक’ ही नेदरलँड देशात राहणारी हुशार आणि जिज्ञासू ‘ ज्यू ‘ मुलगी. तिने पत्रकार आणि लेखक होण्याचा अगदी लहानपणापासून निश्चय केला होता. ती म्हणजेच ‘द डायरी ऑफ अ यंग गर्ल’, लिहिणारी- अॅन फ्रॅंक. तिच्या या अत्यंत पीडादायक , कठीण परिस्थितीत केलेल्या निश्चयाचा ‘वाङ्मयीन अविष्कार’. तिची आई ‘एडिथ फ्रॅंक’ तर तिचे वडील ‘ओटो फ्रॅंक’. ‘ओटो फ्रॅंक’ पहिल्या महायुद्धात जर्मन सैन्यात लेफ्टनंट’ होते. ते सुखवस्तू घराण्यातले होते. अॅनचे वडिलांवर अतोनात प्रेम होते. तर तीन वर्षाची मोठी बहीण मार्गोट फ्रॅंक ही आई एडिथची अधिक लाडकी होती. अडॉल्फ हिटलरच्या सैन्याने युरोप खंडाचा पुष्कळसा भाग व्यापला होता. ऑस्ट्रिया, पोलंड झेकोस्लोव्हाकिया यांच्यासारखी राष्ट्रे जर्मन सैन्यापुढे ‘शरणागत’ झाली होती. ज्यू -लोकांचे जीवन दिवसेंदिवस अधिक कठीण होत चालले होते. म्हणूनच १९३३ साली फ्रॅंक कुटुंब ‘ऍमस्टरडॅमला स्थायिक झाले. त्यावेळी ऍनाचे वय फक्त चार वर्षांचे होते. या चौघांचे जीवन ‘२६३, प्रिन्सेन गॅक्ट’ या घरात व्यतीत होत होते.
तो दिवस होता १२ जून १९४२ चा. ‘अॅनफ्रॅन्क’ चा तेरावा वाढदिवस. त्यादिवशी तिला आईवडिलांनी एक लाल- पांढरी चौकट असलेली डायरी भेट म्हणून दिली तिला कुलूपही लावता येत होते. शाळेत जाता-येता पुस्तकांच्या दुकानात तिने पाहिलेली व तिला आवडलेली तीच ही डायरी होती.
त्याच वेळी १९४२ साली जर्मन सैनिकांनी ऍमस्टरडॅमकडे कूच केले आणि प्रामुख्याने ‘ज्यू’ लोकांना लक्ष केले. ज्यू लोकांना ओळखता यावे म्हणून ज्यू लोकांनी परिधान केलेल्या कपड्यावर पिवळी चांदणी लावलीच पाहिजे असा कडक निर्बंध घातला. त्यांना ट्रॅम, सायकल किंवा स्वतःच्या मालकीच्या मोटारीचा वापर करण्यावर बंदी घातली होती. दुपारी ३ ते ५ या काळातच बाजारहाट, रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत रस्त्यावर फिरण्यास बंदी. ज्यूंच्या शाळेतच मुलांनी जायचं, चित्रपट नाट्यगृहे, मैदान, तरणतलाव सर्व वापरण्यावर त्यांना बंदी. अशा जाचक अटी फक्त ज्यूंवर लादण्यात आल्या होत्या. बहिष्कार, उपेक्षितता, उपेक्षा, धरपकड, तुरुंगवास, मारहाण आणि छळ एवढंच त्यांच्या वाट्याला आलं होत.
अशा वेळी, फ्रॅंक कुटुंब २५ महिने व्हॅन पेल्स कुटुंबासह – एकूण ८ जण तिथे गुप्त जागेत राहत असत. ती गुप्त जागा म्हणजे-‘सीक्रेट अँनेक्स’’. तिथे त्यांनी घराच्या काचांवर काळे पडदे लावले होते. विमानांचे कर्कश आवाज, बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज असे चालूच होते. प्रत्येकाने फक्त ‘दबलेल्या आवाजातच’ बोलायचे असा दंडक होता. पावलांचा आवाज करायचा नाही, रेडिओवर सतत कानावर येणारे शब्द म्हणजे- आक्रमण, बॉम्बगोळे, विषारी वायू वगैरे. बाहेरच्या जगाची ओळख रेडिओ वरील बातम्यांवरून होत असे. रेडिओ अत्यंत हळू आवाजात लावायचा. न जाणो, बाहेर आवाज गेला तर सर्वच संपले !
(सीक्रेट अॅनेक्स, अने फ्रॅंक फोटो, अने फ्रॅंक डायरी, डायरीचे एक लिखित पृष्ठ, नेल्सन मंडेला यांची मुझियमला भेट)
आणि म्हणूनच वडिलांच्या ऑफिसच्या वरच्या मजल्यावर, एका पुस्तकाच्या मागच्या काळोख्या आड जागेत, त्यांनी लपून राहण्याचा निर्णय घेतला व ती जागा ‘सिक्रेट अॅनेक्स’ म्हणून ओळखली जाऊ लागली. ‘ऍना’चे मामा जर्मन सैन्याच्या भीतीने अमेरिकेत पळून गेले आणि म्हणूनच त्यांची आजी, ‘रोझा होलेन्डर’ सुद्धा, त्यांच्या बरोबर राहायला आली. त्याचप्रमाणे दुसरे एक कुटुंब, ‘पीटर’ व त्याचे आईवडील’, व्हॅन- डॅन, त्यांच्या सोबत एकत्र राहत होते. खाजगी मालकीच्या सायकली जप्त करण्यासाठी नाझी जर्मन सैनिकांनी घराघरांत झडत्या घेण्याचे सत्र चालू केलं त्यामुळेच मदतनीस श्री. कुग्लर यांनी गुप्त जागेच्या पुढ्यात एखाद मोठ पुस्तकांचं लाकडी कपाट सुरक्षिततेच्या दृष्टीने करून घ्यायचं ठरवलं. कपाटालाच ‘बिजागिर’ असून, एखाद दार जसे उघडते, तसेच ते कपाट उघडू-मिटू शकत होते. ते इतके बेमालूम पणे बसविले होते की कोणालाही , त्यातून माणसांना ये-जा, करता येत असेल याची शंका सुद्धा येणे शक्य नव्हते. हे दारांचे कपाटचं त्यांना वरदान ठरले. त्यातूनच (सीक्रेट अंनेक्स ला ) जाण्याचा मार्ग होता. त्या कपाटाला दोन आडव्या भेगा अश्या प्रकारे पाडल्या होत्या की बाहेरच्या हालचाली गुप्तपणे पाहता येणे शक्य होते.
अने फ्रॅंकने, १२ जुन १९४२ पासून ही आपली डायरी लिहायला सुरुवात केली. एक ऑगस्ट १९४४ रोजी रोजनिशी, (डायरी) अॅन लिहिल्याची शेवटची नोंद आढळते. तब्बल पंचवीस महिने पूर्ण. त्यात तिने तिला आलेले अनुभव, तिच्या त्या परिस्थितीत निदर्शनास आलेल्या गोष्टी, भावना, या अतिशय प्रांजळपणे, कोणताही आडपडदा न ठेवता उद्धृत केल्या आहेत. त्याचबरोबर, रेडिओवरून ऐकलेल्या बातम्या, ब्रिटिश आकाशवाणीने दिलेल्या खऱ्या बातम्या, जर्मन प्रसार माध्यमांनी उडविलेली खोट्या बातम्यांची राळ, तिला कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावे लागले, यातना सहन कराव्या लागल्या, यांचे रसाळपणे, एखाद्या कसलेल्या साहित्यिकाप्रमाणे नोंद केली आहे. या सर्वांचे संकलन अतिशय उत्कृष्टपणे केले आहे. कोणत्या कोणत्या प्रसंगांना त्या २५ महिन्यात त्यांना तोंड द्यावे लागले त्याचे वर्णन केले आहे. खिडक्यांना काळे पडदे, कोंदट हवा, अपुरा सूर्यप्रकाश, पायांचा आवाज करण्याची भीती, आजूबाजूला साठवलेल्या वस्तूंचा पसारा, सर्व काही निमूटपणे सहन करायचे. मदतीस ‘जान‘ (JAAN) आणि क्लिमन, अत्यंत जोखीम पत्करून स्त्रियांच्या अडचणी समजून घेत असत. वृत्तपत्र, पुस्तकांविषयी चर्चा करीत, सणासुदीला भेटवस्तू आणीत असत आणि दुःखभार कमी करून, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत.
अशा दडपशाहीत जगत असताना त्यांची खाण्यापिण्याची होणारी आबाळ तिने वर्णिली आहे. कैक दिवस त्यांना एकच भाजी, उकडलेल्या बटाट्याचा लगदा, बटाट्याच्या पोळ्या, नुसत्याच कच्या पालेभाज्या, काकड्या आणि टोमॅटो, खाऊन दिवस कंठावे लागत. श्रावण-घेवड्याच्या बिया आणि देवाच्या दयेने कधीतरी नासक्या गाजराचे सूप, ब्रेड आणि आठवड्यातून एकदा सामोसा व मोरंबा मिळत असे.
तिच्या मते तिची पहिली महत्त्वाची आवड म्हणजे लेखन. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश राजघराण्यांच्या वंशावळीची माहिती संकलित करणे व टिपणे काढणे. त्याप्रमाणे ऐतिहासिक पुस्तके आणि थोरांच्या चरित्रांचा अभ्यास करून मूल्यमापन करणे. ग्रीक व रोमन पुराणांचे वाचन व टिपण. तसेच सिनेनट, महान लेखक, कवी आणि चित्रकारांविषयी माहिती गोळा करून अभ्यास करणे ही तिची प्राथमिकता होती.
‘अने फ्रॅंक‘चा मित्र पीटर, त्याच्यासोबत तिची चांगलीच मैत्री जुळली, एकमेकांबद्दल वाटणारे आकर्षण, त्याने घेतलेले पहिले चुंबन, त्याने मारलेली घट्ट मिठी, आणि स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर रचनेबद्दल, आणि अश्या सर्वच घटनांबद्दल तिने अतिशय सुंदर – साहित्यिक रंगात निर्भीडपणे वर्णन केले आहे.
निरनिराळ्या ‘छळ छावण्यांमधून’ येणाऱ्या बातम्या ऐकून तिचे मन उद्विग्न होत असे. हजारो- हजारो संख्येने कारणाविना अडकवलेल्या ‘ज्यू’ कैद्यांना ऊन, वारा, पाऊसात, हाल अपेष्टाना तोंड द्यावे लागत होते. १०००, कैद्यांमागे
एक ‘टॉयलेट- संडास’, एकच न्हाणीघर, आणि त्यातही स्त्री- पुरुषांना एकत्र रहावे लागत असे, स्त्रियांची अब्रू लुटली जात असे, तसेच केशवपन करून त्याना विद्रुप केले जात होते आणि खायला मात्र एक कोरडा पाव ! हे पाहून तिचा जीव कासावीस होत असे. १५ जुलै १९४४ रोजी तिने आपले मनोगत स्पष्ट केले आहे. ती म्हणते, “मी अत्यंत खंबीरपणे आयुष्याला सामोरी जात आहे. कोणताही भार उचलण्यास मी समर्थ असून मी स्वतंत्र आणि तरुण आहे. मला परिस्थितीची जाणीव आहे. मी मोठ्या प्रयासाने आत्मविश्वास आणि मन:शांती प्राप्त केली आहे”.
बरोबर दोन वर्षांनी ‘अॅन फ्रॅंक’ पुढे लिहिते की “जीवघेणा गोंधळ, यमयातना आणि मृत्यूचे थैमान यांच्या पायावर पुढच्या आयुष्याची इमारत उभारणे आता सर्वस्वी अशक्य आहे”. इतके प्रगल्भ विचार फक्त १५ वर्षे वयाच्या कोवळ्या मुलीकडून आणि ते सुद्धा नाझी भस्मासुराच्या विळख्यात राहून चित्रित करणे हे लोक विलक्षण प्रतिभेचे प्रतीक आहे.
४ ऑगस्ट १९४४ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ‘सिक्रेट अंनेक्स’ वर नाझी यमदूतांनी धाड घातली आणि दडून बसलेल्या सर्वाना अटक झाली. त्यात या निश्राप ‘अॅन फ्रॅंक’ ला आणि इतर सर्वांना अटक झाली. त्यांना प्रथम ‘अँमस्टरडॅम’ आणि नंतर इतर निरनिराळ्या छळ छावण्यांमध्ये हलविण्यात आले. अखेरीस मार्गोट व ‘अॅन फ्रॅंक’ याना हॅनोव्हर जर्मनीमधील ‘बार्गेन- बेल्सन’ छळ छावणीत पाठविण्यात आले. अत्यंत गलिच्छ अशा छावणीत ६ जानेवारी रोजी तिच्या आईचा भूक आणि अति थकव्यामुळे मृत्यू झाला. टायफॉईडची घोंगावणारी साथ आली आणि अत्यंत दुर्दैव म्हणजे हजारो कैद्यांसमवेतच, ‘अॅन फ्रॅंक’ चेही देहावसान झाले. एका युगाचा अंत झाला.
आठ जणांपैकी ‘ऑटो फ्रॅंक’ हे एकटेच छळ छावणीतून जिवंतपणे बाहेर येऊ शकले. ३ जून १९४५ रोजी ते अँमस्टरडॅमला पोहोचले आणि १९५३ पर्यंत तेथेच राहिले. तेंव्हा ‘अॅन ‘ची’ मैत्रीण ‘निब’ (NIB), हिने सुखरूपपणे जपलेले सर्व सामान, कागदपत्र आणि ही ‘सुप्रसिद्ध’ डायरी त्यांच्याकडे सुपूर्द केली. जेंव्हा अॅन ‘ चा वडिलांनी ती वाचली तेव्हा त्यांना लक्षात आले की अॅन आपल्याला कधीच उमगली नाही. ही जणू काही कोणी वेगळीच ‘ANNE’ होती. साश्रू नयनांनी त्यांनी अॅन ’ चे ‘रेव्होल्यूशन’ असे उत्स्फूर्तपणे नामकरण केले. तिच्या वडिलांनी १९४७ मध्ये ही डायरी प्रथम प्रकाशित केली आणि जवळजवळ सत्तर (७०) भाषांमध्ये ती अनुवादित झाली. बायबल नंतर सर्वाधिक लोकांच्या वाचनात आलेले हे पुस्तक आहे .
तुरुंगात असताना आफ्रिकेचे महान स्वतंत्र योद्धे ‘नेल्सन मंडेलां’ यांनी,’रॉबेन आयलंड येथील तुरुंगत ती डायरी वाचली तेंव्हा ‘The invincibility of human Spirt ‘ म्हणजे काय याचा मला प्रत्यय आला, मला तिने जगण्याची हिंमत दिली’ असे उद्गार काढले. ‘मानवतावादाचे पुरस्कर्ते’ असा ‘किताब Anne Frank Foundation तर्फे १९९४ मध्ये त्यांना देण्यात आला.
मी शाळेत शिकत असताना, अमेरिकेत स्थायिक असलेल्या माझ्या सख्ख्या मामाने एका ‘ज्यू’ परिचारिका म्हणून सेवा करणाऱ्या मुलीशी लग्न केले होते आणि ते भारतात आले की, आम्ही तिच्याकडून अनेक गोष्टी ऐकत होतो. त्यावेळी ‘ANNE FRANK ‘ हिच्या अन्यायाविरुद्ध चित्तथरारक लढ्याची आठवण निश्चितच येत असे. त्यामुळेच ३ ऑगस्ट २००९ साली जेव्हा मी या संग्रहालयाला भेट दिली तेव्हा मला माझ्या मामा-मामीची आठवण येऊन गहिवरून आले. तिथे तिची लावलेली पोस्टर्स आणि माहिती यांचे सुंदर सादरीकरण केले आहे. तसेच एक मिनिट आणि दहा सेकंदाचा ‘ व्हिडिओ’ पडद्यावर दाखविण्यात येतो तेंव्हा प्रत्यक्ष अनुभवाचा साक्षात्कार आपल्याला होतो. १९६० साली या इमारतीचे ‘ANNE FRANK MUSEUM’ ‘ मध्ये रूपांतर करण्यात आले. तिने लिहिलेली पत्रे, कथा व तसेच तिचा डायरीची मूळ प्रत त्या तिथे जतन करण्यात आली आहे. प्रत्येकाने ही डायरी एकदातरी आवश्य वाचायला हवी.
— वासंती गोखले
Leave a Reply