मानव हा पृथ्वीवरील सर्वात हुशार प्राणी आहे. तो सतत नवेनवे शोध लावत असतो. या शोधांचं कारण म्हणजे मानवाची गरज दिवसेंदिवस वाढत गेली. असं म्हणतात की गरज ही शोधांची जननी आहे. पण जगातल्या अनेक शोधांचा उगम माणसाने केलेल्या चुकांमधून किवा अपघातातून झालेला आहे.
अमेरिकेतील दोन भावांच्या विसराळूपणामधूनच शोध लागला फ्लेक्स या खाद्यपदार्थाचा.
सकाळी उठल्यानंतर आपली सर्वात पहिली गजर असते ती नाश्त्याची. आज नाश्त्याला काय करायचं हा प्रत्येक गृहिणीला दररोज पडणारा प्रश्न. आपल्याकडे अनेक पारंपरिक पदार्थ नाश्त्याला खाल्ले जातात. अगदी शिरा-कांदेपोहे पासून बाहेरुन आलेले ब्रेड जॅम, टोस्ट या आधुनिक पदार्थांचे पर्याय आपल्यासमोर असतात.
मात्र हे पारंपरिक पदार्थ मागे पडून आता वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा समावेश आपल्या नाश्त्यात झाला आहे. सध्या डायेटचे मोठे फॅड आलेले आहे तसेच लो-कॅलरी फूडचेही फॅड आलेले आहे. यातले बरेचसे खाद्यपदार्थ पाश्चिमात्य देशाकडून आलेले आहेत.
लहान मुलांमध्ये एक असा खाद्यपदार्थ सध्या प्रचंड लोकप्रिय झाला आहे जो पौष्टिक आहे पण चवदारही आहे आणि तरीही जंक-फुडमध्ये मोडत नाही. विविध धान्यांपासून तयार केलेल्या फ्लेक्सची ही जन्मकथा ! खरंतर फ्लेक्स जरी वेगवेगळ्या धान्यांपासून बनत असले तरीही त्यातले कॉर्न फ्लेक्स सर्वात लोकप्रिय. त्यातही कॉर्न फ्लेक्स म्हटलं की केलॉग्सचं नाव पहिलं डोळ्यासमोर येतं.
ही गोष्ट आहे अमेरिकेतल्या मिशीगन प्रांतातल्या दोन भावांची. जॉन हार्वे केलॉग तिथल्या हॉस्पिटल आणि हेल्थ स्पाचा अधिक्षक म्हणून काम पाहात होता. तर त्याचा लहान भाऊ केथ केलॉग बिझनेस मॅनेजर होता. हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या पेशंट्सना पौष्टिक आणि सकस आहार देण्याकडे या दोघांचही कल होता. पेशंटनी फिश, मांस, मद्य, तंबाखू वगैरे पदार्थाचं सेवन करू नये याकडे या दोघांचाही कटाक्ष होता. त्यासाठीच या दोघांनी संशोधन करुन अधिकाधिक सकस आणि पौष्टिक आहार तयार केला.
केथ चा स्वभाव थोडा विसराळू होता. एक दिवस केथने जेवण तयार करण्यासाठी गहू भिजत घातले आणि तो बाहेर गेला. कामात अडकलेला केथ जवळजवळ दोन तास परतलाच नाही. तिथे असलेल्या जॉनने जेव्हा भांड्यामध्ये प्रमाणाबाहेर भिजलेले गहू बघितले आणि त्याने डोक्यावर हातच मारुन घेतला. त्याने केथला बोलावून घेतलं आणि झाप झाप झापलं. केथच्या विसराळूपणाला दोष देऊन झाल्यानंतर या ढिगभर गव्हाचं काय करायचं हा प्रश्न त्या दोघांसमोर उभा राहिलाच.
या भिजलेल्या गव्हातून काहितरी नवं बनवण्याचा त्यांनी प्रयत्न सुरु केला. त्यासाठी या दोघांनीही या भिजलेल्या गव्हावर प्रयोग करण्याचं ठरवलं. त्यांनी हा गहू कणीक लाटण्याच्या रोलर्समध्ये घातला.
केथ आणि जॉन या केलॉग बंधूंना लक्षात आलं की रोलरमधून आलेला गव्हाचा प्रत्येक दाणा चपटा झालाय. त्यांनी गव्हाचे हे पोहे मस्तपैकी भट्टीत भाजले. हे भाजलेले गव्हाचे पापुद्रे चाखल्यावर त्यांचा कुरकुरीतपणा आणि चव केलॉग बंधूंना फारच आवडली.
काही दिवसांनंनतर त्यांनी हा नवा कोरा खाद्यपदार्थ आपल्या पेशंटना द्यायला सुरुवात केली. पेशंटनाही हा पदार्थ आवडला. कधी दुधातून, तर कधी कोरडे फ्लेक्स पेशंट्सना द्यायला त्यांनी सुरुवात केली.
त्यानंतर त्यांनी इतरही धान्यांवर हा प्रयोग करायला सुरुवात केली. गव्हाप्रमाणेच मक्याच्या दाण्यांचाही यासाठी वापर करता येऊ शकतो, हे केलॉग बंधूंना लक्षात आलं.
सन १९०६ च्या सुमारास केलॉग बंधूंनी या फ्लेक्सचं व्यावसायिक उत्पादन सुरू केलं.
बघताबघता केलॉग्स हा एक भारदस्त ब्रॅंड बनला. नंतरच्या काळात बर्याच कंपन्यांनी हे फ्लेक्स बनवायला सुरुवात केली मात्र आज आपण मॉलमध्ये कॉर्नफ्लेक्स विकत घेतो ते केलॉग्स या नावानेच. त्याच नावाने आज हा खाद्यपदार्थ जागतिक बाजारात विकला जात आहे आणि संपूर्ण जगात लहानथोरांच्या आवडीचा पदार्थ बनला आहे.
केलॉग्सबद्दल माहिती देणारी ही चित्रफीत
— निनाद प्रधान
नमस्कार.
कॉर्न फ्लेक्सवरला लेख माहितीपूर्ण आहे.
– माझ्या लहानपणीं, म्हणजे ६०-६५ वर्षांपूर्वी, घरीं लाह्या बनवत असत व त्या, मुलें खात असत. त्या वेगवेगळ्या धान्यांच्या असत. आमच्याकडे जास्तकरून ज्वारीच्या लाह्या असत. राजगितराही फुलवून, त्याच्या लाह्या खाल्ला जात असत.
– मी स्वत: कॉर्न फ्लेक्स १९५७ मध्ये खायला सुरुवात केली. आपण जी मिशिगनची घटना दिली आहे ती किती सालची असावी ? भारतात तरी , माझ्या मतें कमीत कमी १९५० किंवा आधीपासून कॅर्न फ्लेक्स मिळत असणार.
-सुभाष स. नाईक