फेब्रुवारी महिन्यातील सर्वात महत्त्वाचा इव्हेंट म्हणजे बजेट अर्थात अर्थसंकल्प. अर्थसंकल्प हा सरकारचा वार्षिक उपक्रम असून गरीब, श्रीमंत सारेच त्याच्या प्रतीक्षेत असतात.
अर्थसंकल्प किवा बजेट हा शब्द मध्ययुगीन काळातील इंग्लिशमधील बॉगेट (bowgette) या शब्दाचे सुधारित रूप आहे. हा शब्दही मध्यकाळातील फ्रेंच भाषेतील (bougette) या शब्दापासून आला आहे. या शब्दाचा मूळ अर्थ चामड्याची बॅग असा होतो.
अलीकडच्या काळात अर्थसंकल्प फेब्रुवारीत सादर करण्यास सुरुवात झाली. मात्र, बजेटचा थोडा मागे जाऊन इतिहास रंजक आहे.
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला तो २६ नोव्हेंबर १९४७ रोजी. तत्कालीन पहिले अर्थमंत्री सर आर.के. षण्मुगम चेट्टी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. १९४४ च्या ‘बॉम्बे प्लॅन’च्या धर्तीवर हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. जॉन मथाई, जी.डी.
बिर्ला आणि जे.आर.डी. टाटा यांनी एकत्रितरीत्या तो तयार केला होता. या पहिल्याच अर्थसंकल्पात देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता आणि कोणत्याही प्रकारचे आर्थिक धोरण मांडण्यात आले नव्हते.
१९५० – ५१ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांनी नियोजन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली. मात्र, हा नियोजन आयोगच सुपर कॅबिनेट होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र मथाई यांनी स्वत:च राजीनामा दिला.
त्यानंतर सी.डी. अर्थात चितामण द्वारकानाथ देशमुख हे अर्थमंत्री झाले. ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर होते. १९५५ – ५६ मध्ये त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा प्रथमच हिदीत मांडण्यात आला होता. देशमुखांनंतर टी.टी. कृष्णम्माचारी हे अर्थमंत्री झाले.
देशमुखांनी अर्थसंकल्पात जी आश्वासने दिली होती; त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. कृष्णम्माचारी यांनी बदललेल्या आर्थिक परिस्थितीचा दाखला देत कराद्वारे पैसा उभा करण्याच्या गरजेवर भर दिला.
काही वर्षांनंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी मतभेद झाल्याच्या कारणावरून कृष्णम्माचारी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे १९५८ – ५९ चा अर्थसंकल्प खुद्द नेहरूनाच सादर करावा लागला. ही अत्यंत महत्त्वाची बाब होती; कारण तोपर्यंत अर्थमंत्र्यांनीच अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा होती.
सर्वाधिक अर्थसंकल्प (१०) सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावे आहे. यातील ८ वार्षिक तर २ अंतरिम अर्थसंकल्प होते. याशिवाय, १९६४ आणि १९६८ मध्ये मोरारजी देसाई यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा विशेष होता. हे दोन्ही अर्थसंकल्प २९ फेब्रुवारीला
सादर झाले आणि याच दिवशी मोरारजी देसाईंचा वाढदिवसही होता.
या दरम्यानच टी.टी. कृष्णम्माचारी हे पुन्हा एकदा अर्थमंत्री झाले. स्वेच्छेने संपत्ती जाहीर करण्याची योजना त्यांनीच आणली. त्यामुळेच आपली छुपी संपत्ती जाहीर करणे जनतेला शक्य झाले.
सुरुवातीच्या काळात कृषी क्षेत्रावरच अर्थसंकल्पाचा पूर्णपणे भर होता. मात्र, उद्योग, अन्य सेवा क्षेत्रांचाही समावेश अर्थसंकल्पात होऊ लागला. १९५० ते १९८५ पर्यंत बचत, कर आणि महागाई दर यासारख्या गोष्टींवरच अर्थसंकल्पात जास्त भर होता.
मात्र डॉ. मनमोहन सिग यांनी जेव्हा अर्थमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला तेव्हा सगळा भर उदारीकरणावर आला आणि जागतिक अर्थसत्ता बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू झाली. निर्गुंतवणुकीची प्रक्रिया त्यांनीच सुरू केली जी आजही चालू आहे.
भारतीय अर्थसंकल्पाबाबतची ही मोजकी पण संग्रही ठेवावी अशी माहिती.
— अनिकेत जोशी
Leave a Reply