सिग्नलवर फुलं , खेळणी वगैरे विकणारं जोडपं भर दुपारच्या उन्हात पुलाखाली विसावलं होतं आणि त्यांच्या बाळाला एका जीर्ण , फाटक्या चादरीची झोळी करून झोपवत होतं … ती चादर फाटकी असली तरी झोळी चांगली दणकट होती कारण त्याला लावलं होतं एक मोठ्ठ ..”ठिगळ”…. ते बाळ शांत झोपलं होतं …. कारण होतं त्या फाटक्या चादरीला एकसंध ठेवणारं ते …. “ठिगळ”…. तेव्हा मनात विचार आला .. आपल्या सभोवताली वेगवेगळ्या ठिकाणी , वेगवेगळ्या संदर्भातील आजुबाजूला घडणाऱ्या घटना किंवा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अशा अनेक अर्धवट,अपूर्ण राहिलेल्या गोष्टी असतात मग त्या “चांगल्या किंवा कधीकधी वाईट” ही असतात पण त्यांना पूर्णत्वास न्यायला लावावंच लागतं ……..असंच एखादं ….”ठिगळ”
राजकीय पक्षांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी …
एखाद्या दुसऱ्या पक्षाचं …. ठिगळ
आशयघन चित्रपट असूनही गल्लाभरू प्रेक्षकांसाठी …..
आजकाल लावतात Item song चं …. ठिगळ
कलावंत आणि खेळाडूंना आपल्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी ….
त्या क्षेत्रात होणाऱ्या राजकारणाचं आव्हानं स्वीकारण्याचं …. ठिगळ
Fashion च्या चंदेरी दुनियेत आपलं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी ……….
पारंपारिक वेशभूषेला modern costume चं…. ठिगळ
Full time नोकरी करूनही प्रपंचासाठी ………
तारेवरची कसरत करत जोडावं लागतं Over time चं…. ठिगळ
वर्षानुवर्षे नात्यांमध्ये बाळगलेला दुरावा क्षणात संपण्यासाठी ..
निमित्त ठरतं एखाद्या आपुलकीच्या मिठीचं …. ठिगळ
एकत्र जमलेल्या मित्रमंडळीची भेट तेव्हाच पूर्ण होते ……
जेव्हा त्याला जोडतो टपरीवरच्या फक्कड चहाचं …. ठिगळ
शांत , गाढ झोपेतून जागं करणाऱ्या …..
पहाटेच्या रम्य स्वप्नांचं …. ठिगळ
आपली चूक मनोमन उमगल्यावर मोकळं होण्यासाठी……
गरजेचं असतं पश्चात्तापाच्या अश्रुंचं …. ठिगळ
कधी सुखासीन आयुष्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या व्यथांचं तर सतत संकटाच्या गर्तेत बुडालेल्या व्यक्तीला………
एखाद्या आगंतुक शुभवार्तेचं …. ठिगळ
संसारातल्या भांडणांना प्रेमाचं तर कधी मुलांवरच्या वेड्या मायेला ……..
काळजावर दगड ठेवून लावावं लागतं शिस्तीचं …. ठिगळ
तर कायम घड्याळ्याच्या काट्यावर असलेल्या आयुष्याला….
मनमुराद ..स्वच्छंदपणे जगण्याचं…. ठिगळ
वार्धक्याचं ओझं बाळगत दिवस ढकलणाऱ्या वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांना …..
नातवंडांच्या क्वचित भेटीचं…. ठिगळ
परदेशी वास्तव्य असणाऱ्या मुलांच्या पालकांना ……
आठवड्यातून एकदा करायच्या Video call चं …. ठिगळ
सूर्य आणि चंद्राला देखील अनुभवावंचं लागतं ….
ग्रहणात सावल्यांचं …. ठिगळ
अगदी विज्ञानात सुद्धा कुठलाही नियम तेव्हाच सिद्ध होतो …….
जेव्हा त्याला लावतो अपवादाचं …. ठिगळ
म्हणूनच आयुष्याच्या भव्य Canvas वर आठवणींचा “कोलाज” आपोआपच समृद्ध होत असतो जेव्हा आपण परिस्थिती नुसार त्या त्या वेळेस लावत जातो एक एक …… ठिगळ ….
अजून एक …. ठिगळ …
अजून एक …. ठिगळ ….
अजून एक …. ठिगळ
— © क्षितिज दाते, ठाणे
Leave a Reply