नवीन लेखन...

बगळा या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया

बगळ्याची कथा

“यार तेरे बगळे में कुछ होताही नही…no nothing.. डार्लिंग माल डाल माल !!”

ऐकनाऱ्या त्यांनी सांगितलं. पण मला यात काय माल टाकावं कळलंच नाही.

“फेस्टिवल टाईप पिच्चर  है … कमर्शिअल व्हॅल्यू (चूक चूक chuckle) पर अच्छा है, देखेंगे. करेंगे आपन

ऐकनाऱ्यानी हे ही मला सांगितलं. पण पुन्हा त्यांनी बगळ्याकडे वळून सुद्धा पाहिलं नाही.

मेट्रो कर, माल पाहिजे, काहीतरी मोठ्ठा ट्विस्ट यायला पाहिजे, खूप गुडी गुडी आहे, इराणी आहे etc etc ऐकण्यात ऐकण्यात दोन तीन  वर्ष निघून गेले. आणि एक दिवस महेश आला. खूप दिवसांनी भेटल्यावर जल्लोष करतो तसा त्याही रात्री सुरु झाला. नवं काय जुनं काय याची उजळणी झाली. मग बोलण्या बोलण्यात विषय निघाला. रायटर असोसिएशनचं कुंकु

(ठप्पा )लावून टेबलावर पसरलेली बगळ्याची स्क्रिप्ट होतीच. ती त्याला दाखवली. आणि पहिल्या सीनपासून द एन्ड पर्यंत ती त्याला ऐकवली. आणि पहिल्यांदाच कुणी वजन असलेलं बोललं

“प्रसादया हे एक नंबराय.”

मी भरून पावलो. मग मह्या तिच्याबद्दल, बगळ्याच्या स्क्रिप्ट बद्दल बोलत राहिला. आणि तो कोणत्याही कलाकृतीविषयी फार खोलात जाऊन सिरीयसली बोलतो. उगाच बोलायचं म्हणून बोलतंच नाही.  त्यामूळं मी त्याला खूप जास्त सिरीयसली घेतो. त्यानं स्क्रिप्टची बांधणी कशी झालीय सांगताना आर्चचं उदाहरण दिलं. आणि सांगितलं  की एका गोष्टीला धरून कसा मस्त बगळ्याचा  डोलारा उभा राहिलाय. एक जरी वीट काढली की कसा तो ढासळणार. मग त्याने काही सूचना केल्या जशा

“प्रसादया चिंत्याला पैशे मागणार संत्या अजून तीन चार जागी यायला पाहिजे. त्याची आकरा रुपयाची धास्ती थोडी अधोरेखित कर”

मग लहानपणी खेळात येणाऱ्या  राज्याच्या गोष्टी निघाल्या. कसं ते राज्य स्वतःवर आल्याचं ‘भय’ आपल्याला गांगरून टाकायचं, वैगेरे वैगेरे बोलणं झालं. बोलण्या बोलण्यातंच ती बाटली संपली. ती रात्र संपली. पण दोन वर्ष तुंबलेला  बगळ्याचा विषय असा परत एकदा नव्यानं सुरु झाला. मी माझ्या ‘बगळा’ या स्क्रिप्टमध्ये ते  बदल केले. फेरबदल केले. पण प्रोड्युसर लोकांचा नन्नाचा पाढा काही केल्या पुढे सरकला नाही.

पुन्हा काही  महिने गेले  आता ‘बगळा’  जमालगोटा मला जोरात लागला होता. मला वाटत होतं व्हायला पाहिजे यार ही पिच्चर. पण वाटनंच ते…त्यानं थोडंच काही होतं. आणि अशातच पुन्हा एकदा महेशबरोबर बैठक जमली. पुन्हा आपेय आचमनाबरोबर बगळ्याचाच विषय. मग तो बोल्ला

“प्रसादया मला यात कादंबरी दिसतीय.. तू लिही मी छापतो”

मला छापतो हा शब्द ऐकून भारी वाटलं.  बगळा कुणाला तरी दिसतो. आणि तो मी करतो असं म्हणतोय ही भावनाच भारी वाटवायला लावणारी होती माझ्यासाठी. पण तसं पुस्तकातल्या लेखकासारखं लिहणं मला जमणार नाही याबद्दल मला खात्री होती.

‘मोठं काम असतं ते’ आणि आपण त्यातले नाही असं वाटत होतं. पण महेश बोलला

“अरे नाही बघ तुला जमेल”

आणि ‘बगळा’ पोटुशी  राहिला.

मी मह्या  म्हणालाय म्हणून लिहीतो म्हणलं. पण कादंबरी?  ती खूप मोठी असते, खूप विचार मोठा लागतो, अनुभव हा हवाच. आणि महत्त्वाचं टाईपपण करावं लागतं खूप भरपूर. आणि गेली कित्तेक वर्ष टीवीसाठी दिग्दर्शन आणि तीस सेकंदाच्या कॉप्या लिहणाऱ्या माझ्यासारख्याला ते जमेल का?

आदमी एक प्रश्न अनेक.

पण महेश पुनः उवाचला,

“प्रसाद्या  तू लिही जमेल तुला आणि कसं आहे त्या निम्मिताने तुझ्या स्क्रिप्टला आणखी मजबूती येईल नवं काहीतरी मिळेल ना”  आणि त्याच्या स्क्रिप्ट को मजबुती या  विधानाला  मी कॉन्व्हिन्स झालो. बम भोले  म्हणत लॅपटॉप समोर बसलो.

बगळयाचं कथासूत्र, सुरुवात, मध्य आणि द एन्ड सगळं माझ्या डोक्यात आणि पेपरवर आधीपासून होतंच. पण फॉर्म वेगळा होता. मी लिहलेली पटकथा होती आणि आता लिहायची होती ‘कादंबरी’ ती कशी होणार.

प्रश्न?.

उत्तरासाठी फोन केला पण मह्या पहाटे ११च्या आत उठतंच नाही. मग ? आजून ६ तास बाकी होते. तरी मी लॅपटॉप उघडलाच होता. मग सवयीनं कीज दाबायला सुरुवात केल्या रोमनमधून मराठीत काहीतरी आकारलं जात होतं. लिहिण्याची टोट्टल प्रोसेस ‘ऑटो’मोड मध्येच.  मी लिहिताना काही ठरवलं नव्हतंच म्हणजे तसंही काही ठरवण्याइतकी योग्यता किंवा माझा तितका वकूबही नव्हताच. चार दोन चांगल्या कादंबऱ्या वाचल्या होत्या पण याक्षणी ते काही डोक्यात नव्हतंच. पण १३/१४ वर्ष काम करत असतानाच्या अनुभवानं एक शिकलो होतो

“करत गेलं की काहीतरी होतंयच”.

आणि तसंही मी  केलेल्या नोकऱ्यात मी एकाच प्रोफाईलवर अजिबात काम केलेलं नाही नेहमीची  सुरक्षितता त्रासदायक वाटायची. टीव्ही’शोज’चं डिरेक्शन करताना मला नेहमी त्याच्या लिखानात सुद्धा  उत्सुकता असायची. शोज लिहिताना ऍड लिहिणारे भारी वाटायचे.  टीव्ही करताना रेडिओ आवडायचा. अन रेडिओ करताना प्रोमोज. त्यातलं chllenge खुणवायचं. एकंच फंडा होता आपण जे पण करायचं पडून, आपटून, झोकून करायचं, हातचं राखून काहीच नको. थोडक्यात माझ्या अंगात किडे अन मला लागत्या घोड्यांची खूप आवड. आताही मी काही तरी नवीन घेतलेलं करायला ते पण आयुष्यात आधी कधीच नं केलेलं कादंबरी आणि मी.

वर्ड फाईलचा इंटरफेस कोरा  होता. आणि टाइपिंग मला करता येत होतं. मग काय दे दणादण. महेश उठेपर्यंत ४/६ प्रकरणं लिहून झालेली. ती त्याला दिली पाठवून आणि फोन करून सांगितलं त्याला म्हटलं फीडबॅक दे. तो बोलला तोंड धुवून देतो. मी मग त्याचं आटपेपर्यंत मी लिहलेलं वाचू लागलो. लिहण्याची सुरुवात मी अगदी स्क्रिप्टमध्ये होती तशीच  केली होती. आणि लिहिताना मला अजिबात जाणवलं नव्हतं पण आता मीच लिहलेलं वाचताना लक्षात आलं की, मी  मराठीत लिहिताना बोलल्यासारखं लिहिलेलं आणि लिहिन्यात  ऑटोमॅटिक माझी बोली भाषा आलेली. वाचलं अन म्हणलं  ‘गयी भैंस पानी में’  आपला प्रकाशक आता आपल्याला तात्काळ ‘तखलिया’ बोलणार. पण… झालं उलटंच तो एकदम झुमो नाचों गावो मूड मध्ये बोल्ला

“तुला सापडलंय आता थांबू नको”   त्यानं मग मला सांगितलं तू ज्या भाषेत लिहतोय तसंच लिही. आणि मग त्यानं मला सांगितलं की कशे एकाऐवजी अनेक न्यारेटर माझ्याकडून वापरले गेलेत. मला त्यानं मला मी लिहलेलं उकलून दाखवायला चालू केलं.  मी काय बरं लिहलंय, माझ्याकडून काय चांगलं आलंय, कसं आणखी चांगलं येण्याच्या शक्यता आहेत, चिंत्याच्या स्टोरीत कुठंच चिंत्या येऊन कसा काही बोलत नव्हता, आणि तेच किती चांगलं आहे वैगेरेवैगेरे. थोडक्यात माझी म्हैस पाण्यात जाऊन आता पव्ह्नी खेळूलालती. ती डुबली नव्हती.

आता मला कळूलालतं की  की मी चिंत्याची गोष्ट तशीच रचत चाललोय. जशी आपण नकळत कोण्या ‘फलाण्या’ची रचतो. त्या फलाण्याबद्दल घरात आई बोलते. तसं बाहेर  बाबा बोलतीलंच असं नाही  मग शेजार पाजारचे, गावातले,गावाबाहेरचे अशे सगळे  आपआपलं व्हर्झन  बोलतात आणि ज्याला जसा तो ‘फलाना’ दिसलाय तसं ते आपल्यासमोर आणत जातात अगदी आपण लहानपणी ऐकीलेल्या  ‘सात आंधळे अन एक हत्ती’ या गोष्टीतल्यासारखं.  प्रत्येक आंधळ्याच्या हातात जो पार्ट येतो तसाच त्याला  हत्ती  दिसतो  म्हणजे कुणी कान चाचपडल्यावर त्याला  हत्ती सुपासारखा वाटतो तर कुणी तोच हत्ती त्याची सोंड चाचपडून मोठ्या पाइपसारखा आहे म्हणून सांगतो.  थोडक्यात या सगळ्यांच्या तुकड्यातुन  फलान्याचा कहाणीचा कोलाज आपल्या डोक्यात आकार घेत जाते…’बगळा’ मधल्या हिरोचं, चिंतामण पुरुषोत्तमराव सरदेशमुखचं म्हणजे चिंत्याचं अगदी तसंच झालेलं. लिहण्याची सुरुवात झाली ती त्याच्या दोस्तांच्या सांगण्यावरून आणि त्या दोस्तानं त्यानं चिंतूला जितकं पाहिलं तितकं दाखवलं आणि जिथं त्या दोस्तानं चिंत्याला  आणून सोडलं तिथून ज्यानं कुणी चिंतूचा हात पकडला त्याच्याप्रमाणे चिंतू चालत-वाहत गेला. मग आई, बाबा, काका, आव्वा, दोस्तायची फौज, गुरुजींचे दल, शंकरमामा, पिंकी, केशा etc etc सांगत गेले आणि चिंतूचं जग उभा राह्यलं.

पटकथा लिहिताना सगळ्या गोष्टी दिसतील अशा लिहाव्या लागतात उदाहरणार्थ आपण जेव्हा लिहितो

“…आणि त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं” ते पडद्यावर दाखवणार कसे ? त्याची ही अवस्था चितारणार कशी ?? त्यामुळे मग सीन घडवावा लागतो जेणेकरून त्याची ती अवस्था लोकांसमोर येईल. मी तसंच लिहिलं जितकं लोकांना शब्दांमधून दिसेल उगीचंच शब्दांचे वाफारे मांडणं माझ्या कुवतीबाहेरचंच होतं. चिंतूच्या जागी मी मला नकळत ठेऊन दिले होते त्याकाळात  मग माझ्या आजूबाजूला जे कोणते इंटरेस्टिंग एलिमेन्ट्स होते किंवा मला ते तसे वाटले त्यांना मी घेऊन आलो जशे गल्ल्या बोळं,परिसर, वातावरण, लोकांची नावं जे जे मला भावलं ते ते मी उचललं आणि पेपरवर ठेवलं. जसं गर्जे माझ्या वर्गात होता त्याच्या वडिलांचं घड्याळाचं दुकान होता पण तेवढंच खरं.  तो नापाश्या,हडकुळा  वैगेरे नव्हता त्याच्यात मी दुसरा कुणी मिसळलेला. संदीप नकाशे याच नावाचा माझा शाळेतील मित्र, तो पण बोबडा होता  आणि भरडी सुपारी खाऊन त्याची जीभ जड झाली होती. तुम्ही तसं करू नका असं आमचे सर सांगत तिथून मी संदीप उचलला. मग त्याची आई मी आमच्या आजोळी पाहिलेल्या पाटील काकुवरून उचलली त्याचं मोठ कुंकू डोक्यात राहिलेलं. आणि त्याचं  घर मी एका माझ्या दुसऱ्या मित्राच्या घरावरून उचललं. त्याची चिडखोर आजी मी आमच्या भावकीतल्या एका म्हातारीवरून उचलली. आणि या वेग वेगळ्या सगळ्यांची मोट बांधून त्याचं एक कुटुंब बनवलं आणि ते बगळ्यात वापरलं.  बगळ्यात येणारं प्रत्येक पात्र मी कुठे नं कुठे पाहिलेलं आहे.  कोणाचं दिसणं घेतलं आणि कुणाची बोलण्याची लकब घेतली. कुणाचा आवाज घेतला आणि माझं बगळ्यातलं पात्र उभं केलं.  आणि एकदा माझी पात्र उभी राहिली त्यांचं दिसणं असणं घर बार ठरलं की मग मात्र  त्यांनी जसं मला समोर नेलं तसं मी जात गेलो.  माझ्या मर्जीप्रमाणे त्यांना वापरलं नाही. त्यांनी जशी कथा पुढे नेली तशीच ती मी टाईप केली. मला नेहमी असं वाटत आलेलं की बोली प्रत्येकाची स्वतंत्र असते. तोच शब्द, तीच भाषा प्रत्येकजण आप आपल्याप्रमाणे वापरत असतं, उच्चारत असतं. म्हणून मग मी जेंव्हा लिहीत गेलो तेंव्हा पात्रांच्या प्रमाणे बोलत पण गेलो. आणि जो जसं बोलेल असं मला वाटत होतं तशेच्या तशे उच्चार मी टाईप करत गेलो. मग त्यामुळे एकच शब्द कुठे हृस्व आला कुठे दीर्घ.

‘बगळा’  मी आधी जे लिहिलं होतं जितकं लिहलं होतं  ते सगळं रोमन मराठीतून.  वाचताना कधी कधी माझं मलाच ते आप लिखे खुदा पढे सारखं व्हायचं . ते तसं  बाड टाईप  करायला सुद्धा कुणी घेत नव्हतं. मग आम्ही ते टाईप करण्यासाठी सोपं व्हावं म्हणून स्वतः  हातानी लिहायचं ठरवलं. आणि महेशने ते मुद्धाम मला तसं सांगितलं की कुणी करण्यापेक्षा तूच कर. मग हातानी लिहीत असताना बऱ्याच वेळेला त्यात सुधारणा होत गेली. काही नवं सुचलेलं टाकता आलं आणि जुनं आता जून वाटत होतं ते माझं मलाच उडवता आलं. थोडक्यात साधारण महिनाभर चाललेलं हे काम आमच्या पथ्यावर पडलं.  याच दरम्यान पार प्रकाशनचा  बगळा लोकांपर्यँत पोहचावा म्हणून त्याचं शून्य पैसे कॅम्पेन करायचं ठरवलं. आणि पात्रांच्या वन लायनर व्हाट्स अँप आणि फेसबुकवर टाकायला सुरुवात केली. त्यासाठी वन लायनर लिहिताना  सुद्धा मला बऱ्याच वेळेला काहीतरी मस्त मिळायचं आणि मग ते बगळ्यात पेरलं जायचं. या वन लायनरचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे या वाचूनंच MTVवाल्या मनोज मानेने स्वतःहुन याचं मुखपृष्ठ करण्याची इच्छा जाहीर केली. आणि त्याने ३ मुखपृष्ठ डिझाइन्स बनवून दिले. ते तिन्ही इतके सुंदर होते कि  मग महेशने मोठ्या मुश्किलीने त्यातले दोन बाजूला ठेऊन एक निवडलं. गणेश वसईकर, वार्जेश सोलंकी यांनी बगळ्याचं वाचन करून आम्हाला प्रोत्साहित केलं. पहिलटकर माझा आत्मविश्वास वाढवला.  आणि सगळ्यात महत्वाचं बऱ्याच लोकांनी बगळ्याची भाषा नागर करा किंवा बोलीभाषेचा फक्त फ्लेवर वापरा म्हणजे लोक स्वीकारतील अशा  हितचिंता व्यक्त केल्या असताना देखील आम्ही उदगिरी बोली ठेवणार या आमच्या मताला त्यांनी कॉन्फिडन्टचं टॉनिक पाजलं. आणि  अथक पूर्णवेळ  सहा महिन्यामध्ये महेशलीलापंडितांची  पारावर बसून आमच्या बगळ्याची  साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.

आणि कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर ती वाचून  बाळासाहेब  घोंघडे या साहित्यप्रेमी प्रयोगशील संपादकाने  बगळ्याच्या निर्मिती प्रक्रियेचा लेख त्यांच्या अक्षरपेरणी मासिकातील  वेध निर्मितीचा या साहित्य निर्मितीच्या प्रोसेस विषयी चर्च्या करणाऱ्या सदरासाठी  लिहवून घेतला.

बगळा

पार पब्लिकेशन्स

पृ.सं. १५८

किमत ३००

 

सदर लेख “अक्षरपेरणी” मासिकाच्या जुलै ऑगस्ट अंकातून पूर्वप्रसिद्ध

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..