“प्रत्येक पुरुषाच्या जीवनात ‘स्त्री’ तीन भूमिकेतून त्याच्याशी सहभागी होते.. त्यातील पहिली स्त्री ही त्याला ‘आई’च्या भूमिकेत भेटते…
त्याच्या जन्माच्या आधी नऊ महिन्यांपासून ती त्याची काळजी घेते. जन्मानंतर तो उभा राहून चालू लागेपर्यंत त्याला कडेवर घेऊन वाढवते. त्याच्या नकळत्या वर्षांत त्याला खाऊ-पिऊ घालणं, त्याचं शी-शूचं पहाणं, त्याला स्वच्छ ठेवणं, आजारपणात उपचार करणं, इत्यादी गोष्टी ती प्रेमानं, आपुलकीनं करते..
तो शाळेत जाऊ लागतो. त्याला शाळेत पोहोचवणे, घरी घेऊन येणे. डबा देणे. त्याचा अभ्यास घेणे.. अशा सर्व जबाबदाऱ्या ती मायेने करते.. त्याच्यावर उत्तम संस्कार घडवते…
त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत, तो तिला ‘बाळ’च वाटत राहतो.. त्याच्या आवडी निवडी ती जपत राहते.. तो देखील, बाबांपेक्षा आईपुढेच स्वतःच मन मोकळं करत असतो.. त्याला नोकरी लागते व त्याच्या लग्नाविषयी घरात खलबतं सुरु होतात… इथं आईच्या भूमिकेत थोडासा बदल होण्याचा ‘क्षण’ जवळ आलेला असतो…
त्याचं लग्न झाल्यावर त्याच्या जीवनात दुसरी स्त्री, ‘पत्नी’च्या भूमिकेतून सहभागी होते..
संसाराची दोन चाकं, गृहस्थाश्रमाच्या रूळावरुन मार्गी लागतात.. दोघांचंही एकमेकांवर नितांत प्रेम असतं.. संसार फुलतो.. तरुणपणी पाहिलेली स्वप्नं प्रत्यक्षात साकारतात.. दोघेही दोन शरीरं, एक प्राण होतात.. याचं फलित म्हणून त्यांच्या संसारवेलीवर एक कळी उमलते…
इथं त्यांच्या जीवनात तिसरी स्त्री जन्माला येते, ती त्याच्या ‘मुली’च्या भूमिकेत..
ती तान्हुली असल्यापासून ते मोठी होईपर्यंत तो तिच्यावर जिवापाड प्रेम करतो.. तिचं देखील आईपेक्षा, वडिलांकडंच झुकतं माप असतं.. ती वडिलांच्या मनातील गोष्टी त्यांचा चेहरा पाहूनच ओळखू शकते..
ती वयात येईपर्यंत तिच्यासोबत हसून खेळून रहाणारा बाबा, नंतर गंभीर होत जातो… तिचं शिक्षण पूर्ण होतं.. नोकरी लागते… व तिला ‘स्थळ’ पाहाणं सुरु होतं…
उपवर मुलगा चांगला मिळाला म्हणून तो अनेक उंबरठे झिजवतो.. शेवटी मनासारखा मुलगा मिळाल्यावर, ही परक्याच्या घरी जाणार म्हणून मनातून व्याकुळ होतो…
लग्न होतं, मुलगी सासरी निघते.. आई रडू शकते, मात्र वडिलांना उघडपणे रडता येत नाही… इथं त्याच्या जीवनातील तिसरी ‘स्त्री’, सासरी गेल्यावर ‘फ्लॅशबॅक’ संपल्याप्रमाणे पुन्हा पत्नीबरोबरचं सहजीवन सुरु होतं…
दरम्यान जीवनातील पहिली स्त्री ‘आई’ ही वार्धक्यामुळे, एकाच जागी बसून असते…
अशावेळी चुकून त्याला ‘ठेच’ लागली तर तोंडातून ‘आई’ हा शब्द बाहेर पडतो.. ‘पत्नी’च्या डोळ्यात पाणी येतं व ‘मुलगी’ जवळ असेल तर, ती त्या जखमेवर फुंकर घालते…
म्हणूनच या तिन्ही जवळ असतील तर, ‘ईश्वर’च सोबत आहे.. आणि यांपैकी एक जरी नसेल तर जीवन ‘नश्वर’ आहे…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२५-९-२१.”
Leave a Reply