दोन रुळांमधील सरळ रेषेतील (म्हणजे कमीत कमी) अंतराला गेज म्हणतात. जगात निरनिराळया रेल्वेत वेगवेगळी गेजेस वापरली गेली आहेत.त्याचे सर्वसाधारण वर्गीकरण चार विभागात होते.
1) ब्रॉड गेज – हे अंतर ५ फूट ६ इंच किंवा १.६७६ मीटर असते.
2) स्टँडर्ड गेज – हे अंतर ४ फूट साडेआठ इंच किंवा ४ फूट ९ १/८ इंच अथवा १.४३५ मीटर किंवा १.४५१ मीटर एवढे असते
3) मीटरगेज – हे अंतर ३ फूट ६ इंच किंवा ३ फूट ३/८ इंच किंवा २ फूट अथवा १.०६९ किंवा १ मीटर किवा ०.९१५ मीटर असते.
4) नॅरो गेज – हे अंतर २ फूट ६ इंच किंवा २ फूट अथवा ०.७६२ मीटर किंवा ०.६१ मीटर असते.
इंग्लंडमध्ये सुरु झालेल्या पहिल्या रेल्वेचे रुळ जेव्हा टाकले गेले त्यावेळी त्यामधील अंतर १.४२५ मीटर ( ४ फूट ८१/२ इंच ) होते. त्यावेळी इंग्लंडमध्ये वापरल्या जाणाऱ्या घोडागाडीच्या दोन चाकातील ते अंतर होते. इंग्लंड व यूरोपमध्ये हे स्टँडर्ड गेज वापरुन केलेल्या रेल्वे आहेत.
इंग्लंडमध्ये ईआयआर आणि जीआयपी या दोन कंपन्या होत्या. त्यांनी भारतामध्ये रेल्वेबांधणीसाठी दिलेल्या १८४९ सालच्या प्रस्तावात स्टँडर्ड गेज वापरावे असे म्हटले होते. पण १८५० मध्ये त्यावेळचे गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांनी आणखी मोठे असलेले ब्रॉड गेज निवडले. त्यामुळे भारतात प्रामुख्याने ब्रॉड गेज आहे. परंतु स्वस्त पडते म्हणून भारताच्या मागासलेल्या भागात मीटर गेज वापरले होते. कालका-सिमला,सिलिगुडी- दार्जिलिंग,नेरळ-माथेरान या ठिकाणी आणि ग्वाल्हेरसारख्या काही संस्थानात नॅरो गेजचाही वापर केला आहे. अशा तऱ्हेने भारतात तिनही गेजचा वापर केला आहे. दिल्लीतील मेट्रो रेल्वेमुळे स्टँडर्ड गेजही आता आले आहे. १९९० च्या दशकात प्रमाणिकरण करण्यासाठी भारतीय रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे दरवर्षी शेकडो किलोमीटर मीटर आणि नॅरो गेजचे रूपांतर ब्रॉड गेजमध्ये होत आहे. जगात अजूनही वेगवेळी गेज वापरली जात आहेत.
Leave a Reply