|| हरि ॐ ||
ईशान्य भारतातील सात राज्यांना ‘सेवन सिस्टर्स’ नावाने ओळखले जाते ती राज्ये आहेत आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या सिक्कीमचाही ईशान्य भारतात समावेश होतो. ती आठवी भगिनी असे म्हंटले जाते. हिरवागार डोंगराळ प्रदेश, तसे बघावयास गेलो तर राज्याच्या एकूण भूभागापैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भागावर असलेली घनदाट जंगलं, थंडीच्या मोसमात शून्यापर्यंत तापमान घेऊन जाणारा दक्षिण भाग आणि गोठणबिंदू गाठणारा उत्तर भाग ही या राज्याची खास नैसर्गिक वैशिष्टय़ं आहेत.
अजूनही ईशान्य भारतात पायभूत सुविधांचा बराच अभाव आहे. ब्रह्मपुत्रानदी, हिमालय पर्वत, खनिज संपत्तीने ठासून भरलेले कोठार आणि निसर्गाचा वरदहस्त या बेरजेच्या बाजू असल्या, तरी त्यांचा उपयोग करून घेण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती नसल्याने हा भाग उपेक्षितच राहिला. चहाने संपन्न आसाम, मुबलक लाकडासाठी प्रसिद्ध अरुणाचल प्रदेश, पर्यटनाच्या दृष्टीने आणि पर्यटकांचे आवडीचे स्वर्गीय स्थान असलेले राज्य मेघालय, भाताचे आगर असलेला त्रिपुरा, अशी या भागातील प्रत्येक राज्याची वैशिष्ट्ये आहेत. पाण्याची कमतरता नसलेल्या अरुणाचलसारख्या राज्यात जलविद्युत प्रकल्पांच्या माध्यमातून वीजउत्पादन करणे शक्य आहे. परंतू, स्थानिक राजकारण, सरकारचा नाकर्तेपणा आणि काही घटकांकडून होत असलेल्या विरोधामुळे त्याची अंमलबजावणी कृतीत येताना दिसत नाही. तशीच परिस्थिती मणिपूरची. भारताला जोडणारा एकच महामार्ग, तो ही बंद पडला की या राज्याची सर्व बाजूने कोंडी होते.
आर्मस्ट्राँग हा मणिपूरच्या टॅमेंग्लाँग या दुर्गम गावातील झेमे या आदिवासी जमातीत जन्मलेला मुलगा. या दुर्गम भागातील आणि जमातीतील भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) परीक्षा पास झालेला पहिलाच अधिकारी. रस्त्यांचे आणि इतर पायाभूत सुविधांचे कमालीचे दुर्भिक्ष असलेल्या या राज्यात त्याने सरकारची वाट न पाहता स्वत: पुढाकार घेऊन जवळ जवळ १०० किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या लोकांची वाट न पाहता स्वत:च्या कुटुंबाच्या बचतीतून उभी राहिलेली चार लाख रुपयांची रक्कम त्याने या कामासाठी वापरली. आर्मस्ट्राँगची जिद्द, मनमिळाऊ स्वभाव आणि काम बघून लोकांनीही ह्यापासून स्फूर्ती घेतली आणि मणिपूरमध्ये स्वयमस्फुर्तीने काम करण्याची अनोखी चळवळ त्याने उभी केली.
काही वर्षांपूर्वी केंद्रीय स्तरावर ईशान्य भारत विकास मंत्रालय स्थापन करण्यात आले होते. एका भूमिपुत्राकडे हे खाते देण्यात आले. परंतू, खात्याच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न झाल्याचे ऐकिवात नाही. चीनच्या सीमेला लागून असलेल्या अरुणाचल, सिक्कीम या राज्यांत आता विद्युतीकरणाची कामे ‘राजीव गांधी राष्ट्रीय विद्युतीकरण योजने’ अंतर्गत सुरू आहेत याची माहिती सरकारी बोर्डाला दाखविण्यापुरती अस्तित्वात आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे काही वर्षे बोर्ड तसेच उभे होते पण प्रत्यक्ष काम कोठेच दिसत नव्हते. सरकारी अनास्थेच्या पार्श्वभूमीवर आर्मस्ट्राँग यांचे कार्य प्रकर्षाने उठून दिसते. भगीरथाने तप सामर्थ्याच्या जोरावर शंकराच्या जटेतून गंगा पृथ्वीवर आणली हे जसे आपण पुराणात वाचतो तसेच कठोर परिश्रमातून सर्वसामान्यांना प्रकाशाचा मार्ग दाखविणारा आर्मस्ट्राँग या दोघांचे कार्य एकच नाही का?
ईशान्य भारतातील राज्यात नगण्य असलेल्या विकासाच्या संधी कैकपटीने वाढल्या पाहिजेत. विजेचा तुटवडा भरून काढणे, रस्ते बांधणे, प्रमुख शहरे विमानसेवेने जोडणे, औद्योगिक प्रकल्प उभे करून स्थानिकांसाठी रोजगार उपलब्ध कारणे काळाची गरज आहे. नितांत सुंदर पर्यावरणाची कमीतकमी हानी आणि साधनसंपत्तीचा विशेषतः स्थानिकांच्या हितासाठी वापर ही उद्दिष्टे तेथील राज्य सरकारच्या समोर असावयास हवीत. विकास योजनांमध्ये स्थानिकांच्या गरजांना प्राधान्य आणि नियोजनात स्थानिकांना सहभाग असणे आवश्यक आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र धोरणाच्या काही निर्णयांमध्ये ईशान्य भारताच्या समस्येविषयी जाणीव असल्याचे ब्रह्मदेश आणि त्यालगतच्या आग्नेय आशियातील देशांशी संबंध सुधारण्याऱ्या “लूक ईस्ट पॉलिसी” मध्ये ईशान्य भारताचा विचार जाणवतो. ब्रह्मदेश किंवा बांगलादेशातून ईशान्य भारतासाठी व्यापाराचे सागरी मार्ग खुले करण्याचा त्या त्या देशांचा विचार जाणवतो. ईशान्येकडील बहुतेक राज्यांमध्ये परंपरागत आदिवासी जमातींचा आजही पगडा असल्याने त्यांच्यात ‘भारतीयत्वा’ ची भावना रुजवणं हेही एक मोठं राजकीय आणि सांस्कृतिक आव्हान आहे.
जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply