(कृष्णजन्माष्टमीनिमित्त)
ऊठ ऊठ रे शामसुंदरा, लपली कधिच निशा
अरुणकिरणकंचनकुसुमांनी सजली पूर्वदिशा ।।
कधिच प्रहर रात्रीचा सरला
नच लवलेश तमाचा उरला
दिवाकराची द्याया वर्दी, आली कधिच उषा ।।
कधीपासुनी अवतीभंवती
वृक्षलतांवर खग चिंवचिंवती
कधीच तेजस स्पर्श जाहला गोवर्धनकळसा ।।
कमलदलीं मधुकर गुणगुणती
गोठ्यांमधिं घंटा किणकिणती
गात अंगणीं सडा शिंपती सस्मित गोपस्नुषा ।।
पय प्राशत गोपबाल सारे
दुग्धपान करतात वासरें
धार काढतां, नाद घटाचा लुभवी स्त्रीपुरुषां ।।
फूलफूल-पानपान नाचे
करितें स्वागत नव्या दिनाचें
ऊठ झडकरी, रवि सोनेरी खुणवी तुज राजसा ।।
– सुभाष स. नाईक Subhash S. Naik
Leave a Reply