नवीन लेखन...

उत्सव प्रकाशाचा; फटाक्यांचा नव्हे

खास बात
उत्सव प्रकाशाचा; फटाक्यांचा नव्हे
– गिरीश राऊत
दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा सण मानला जातो. फटाक्यांच्या आतषबाजीने या उत्सवाचा आनंद द्विगुणित होतो. परंतु, फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषण होते. फटाक्यांमधील विषारी रसायनांचा मानवी शरीरावर विपरित परिणाम होतो. मानवाप्रमाणेच जीवसृष्टीलाही धोका पोहोचतो. ही सर्व हानी रोखण्यासाठी दिवाळीमध्ये फटाक्यांच्या वापरावर काही मर्यादा आणल्या पाहिजेत.

दिवाळी म्हणजे उत्सवाचा, प्रकाशाचा सण. या दिवसांमध्ये सगळीकडे दिव्यांचा लखलखाट पहायला मिळतो. या लखलखाटाला जोड मिळते ती फटाक्यांच्या आतषबाजीची. आकाशात उंचावर उडणारे विविधरंगी फटाके लक्ष वेधून घेतात. बहुरंगी फटाके पाहिले की उत्सवाचा जल्लोष आणि उत्साह द्विगुणित होतो. आबालवृद्धांना फटाके वाजवायला आणि दैदीप्यमान वातावरण पहायला आवडतं. पण, फटाक्यांच्या प्रकारांवर ही आवड अवलंबून असते. तरूणाईला मोठा आवाज करणारे फटाके आवडतात तर लहान मुलांना आणि वृद्धांना केवळ भरपूर प्रकाशाचा आनंद देणारे फटाके आपलेसे वाटतात. एकूण काय, तर फटाक्यांशिवाय दिवाळीची धमाल पूर्णच होऊ शकत नाही. पण ही धमाल करत असताना, उत्सवाचा आनंद लुटत असताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजीही घेतली पाहिजे.
फटाक्यांमध्ये अल्युमिनियम, बेरियम, कार्बन, आयर्न, सल्फर, टिटॅनियम, झिंक, लिथियम अशी विषारी रसायने असतात. त्याचा मानवी शरीरावर आणि शरीराच्या विविध अवयवांवर विपरित परिणाम होतो. किडनी, यकृत, फुफ्फुस असे महत्त्वाचे अवयव विषारी रसायनांमुळे निकामी होण्याची शक्यता असते. याचा त्रास आपल्यालाच नव्हे तर आजूबाजूच्या लोकांनाही होतो. हे टाळण्यासाठी दीपोत्सव जल्लोषात साजरा करताना एक जबाबदार आणि सुजाण नागरिक म्हणून सामाजिक जाणिवाच भान आपण नेहमीच राखायला हवं. फटाक्यांची आतषबाजी आपल्यासाठी आनंददायी असली तरी इतरांसाठी उपद्रव देणारी ठरू शकते हे विसरून चालणार नाही. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ध्वनीची तीव्रता किती प्रमाणात वाढते याचा आपण कधी फारसा विचारच करत नाही. पण, फटाक्यांमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होते. केवळ पर्यावरणालाच नव्हे तर आपल्या आरोग्यासाठीही फटाके घातक असतात. त्यामुळेच दिवाळीच्या आनंदी वातावरणाची मजा लुटताना थोडं सुरक्षिततेचं भान ठेवायला हवं. कारण, दिवाळीच्या उत्साहाच्या भरात फटाक्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे आनंदावर विरजण पडते आणि त्याचे दुष्परिणाम कायम स्वरूपाचे होऊ शकतात.
काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये 85 ठिकाणी ध्वनी प्रदूषण चाचणी केली. त्यावेळी पर्यावरणात सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे विषारी वायू मोठ्या प्रमाणात आढळून आले. ही बाब खूप गंभीर स्वरूपाची आहे. आता दिवाळीच्या दिवसांमध्ये तर प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढते. मानवाला याचा धोका सहन करावा लागतोच पण जीवसृष्टीवरही त्याचा परिणाम होतो. कारण, प्राण्यांना फटाक्यांच्या कर्कश्श आवाजाचे आघात सहन होत नाहीत. वास्तविक, दिवाळी हा शेतीसंस्कृतीचा सण आहे. शेतीसाठी हा सुपीक काळ समजला जातो. दिवाळीच्या निमित्ताने निसर्गाची, प्राण्यांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. बलिप्रतिपदेला बैल, गायी यांना पूजिले जाते. त्यामुळे त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन लोकांनी वनस्पती, प्राणी याबाबत संवेदनशील झाले पाहिजे. मानवाप्रमाणेच त्यांनाही चांगले आयुष्य जगण्याचा हक्क आहे हे विसरून चालणार नाही. कानठळ्या बसणार्‍या आवाजाचा ज्याप्रमाणे आपल्याला त्रास होतो तसा प्राणी, वनस्पतींनाही होतो. त्यांना फटाक्यांपासून वेगवेगळ्या माध्यमातून हानी पोहोचते.

आपण दिवाळीचा आनंद लुटत असताना निसर्गाच्या प्रकि’येमध्ये बाधा आणतो. इतरांना दु:ख देऊन आनंद मिळवण्यात काय अर्थ आहे ? दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा सण आहे. हा ज्ञानाचा आनंद आणि प्रकाश असायला हवा. मात्र, पर्यावरणाचा र्‍हास करून आपण आनंद मिळवू शकत नाही. त्याऐवजी कंदील, फराळ, नवीन कपडे, रांगोळ्या यांच्या साथीने आपण हा सण मांगल्याने, पावित्र्याने साजरा करू शकतो. दिवाळीच्या निमित्ताने ग्रामीण भागात बळीराजाचं स्मरण केलं जातं. नरकासुराचा वध झाल्याच्या आनंदात नरकचतुर्थी साजरी केली जाते. म्हणजेच वाईट प्रवृत्तींचा नाश झाल्याचा आनंद आपण उत्सवातून साजरा करतो. असे असताना आपण वाईट वृत्तीने वागून कसे चालेल ? गेल्या काही काळात फटाक्यांचे खूप स्तोम माजले आहे. त्यावर आळा घालण्याची जबाबदारी पूर्णपणे आपली आहे. जीवसृष्टी निरोगी असेल तरच मानवी आरोग्यही निकोप राहू शकते हे विसरून चालणार नाही. फटाक्यांमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी सरकारतर्फे, स्वयंसेवी संस्थांतर्फे लोकांना आवाहन केले जाते. प्रत्यक्षात ही हानी आणि ती रोखण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न समाजाला कोणी समजावून सांगण्याची गरज नाही. एखादी समस्या, त्याची लक्षणे आणि उपाय कोणी तरी सांगावं लागणं ही बाबच चुकीची आहे. ही सुसंस्कृत समाजाची लक्षणे नाहीत. स्वत: आनंद घेऊन जीवसृष्टीला धोका पोहोचवण्याची घोडचूक करण्यापासून प्रत्येकाने स्वत:लाच प्रवृत्त केले पाहिजे. चांगल्या कामाची सुरूवात स्वत:पासूनच झाली पाहिजे.
पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये आधीच प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. त्यातच दिवाळीच्या दिवसांमध्ये ही पातळी सर्वोच्च प्रमाण गाठते. ध्वनिप्रदूषणाचा धोका वाढतो. प्रदूषण रोखण्यासाठी वर्तनातील सकारात्मक बदलाची, इच्छाशक्ती आणि जनजागृतीची गरज आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि आपला आनंद या दोन्हींचा मेळ साधायला असेल तर काही मार्ग अवलंबता येतील. कमी आवाजाच्या तीव’तेच्या आणि शोभेच्या फटाक्यांच्या वापर करावा. न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेतच फटाके लावावेत. राहत्या घरापासून दूर मोकळ्या मैदानात फटाके लावणे अधिक चांगले. लहान मुले फटाके लावत असताना मोठ्यांनी त्यांच्याबरोबर तेथे उभे राहणे आवश्यक असते. आपल्या घराच्या आजूबाजूला वृद्ध आजी-आजोबा राहत असतील तर त्यांना फटाक्यांचा आवाजाचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अॅटमबॉम्ब, सुतळीबॉम्ब, लक्ष्मीबॉम्ब असे आवाज करणारे फटाके लावण्यापेक्षा भुईचक्र, झाड असे शोभेचे फटाके लावून प्रकाशाचा आनंद लुटता येईल. प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी म्हणून आपापल्या परीने ध्वनिप्रदूषण रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फटाक्यांमध्ये अनेक विषारी रसायने असतात. त्याचा आपल्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे फटाके उडवून आल्यावर साबणाणे हात स्वच्छ धुणे ही बाब आपण कटाक्षाने पाळली पाहिजे. फटाके विकत घेताना आधी आरोग्याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी इको फ्रेंडली फटाके विकत घेता येतील. पैसा खर्च करून बहिरेपणा, अस्थमा, रक्तदाब, खोकला, घशाचे विकार अशा प्रकारची विकतची दुखणी का बरे घ्यावीत ? दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, आवाजाचा नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.
चौकट
(अद्वैत फीचर्स)

— गिरीश राऊत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..