मानवी पेशीतींल आनुवंशिक तत्वात, 46 गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात तर चिपांझीच्या पेशीतील आनुवंशिक तत्वात 48 गुणसूत्रांच्या 24 जोड्या असतात. मांजर 38 (19 जोड्या) कुत्रे 78 (39 जोड्या) घोडे 64 (32 जोड्या) वगैरे. पेशीतील आनुवंशिक तत्वातील गुणसूत्रांच्या जोड्या, म्हणजेच अेकूण गुणसूत्रांची संख्या (2न नंबर), सजीवाची प्रजाती निश्चित करते.
तसेच वनस्पतीच्या पेशीतील गुणसूत्रांची संख्या, वनस्पतीची प्रजाती निश्चित करते. काही वनस्पतीतील गुणसूत्रांची संख्या (2न) :: काजू-42, मका-20, कापूस-52, वाटाणा-14, द्राक्षे-38, पेरू-22, आंबा-40, कांदा-16, बटाटा-48, पपअी-14, अननस-50 वगैरे. सजीवांच्या शरीरातील किंवा वनस्पतीच्या प्रत्येक पेशीत, केंद्रक म्हणजे न्यूक्लीअस हा घटक असतो. त्यात, आनुवंशिक तत्व म्हणजे गुणसूत्रं, जनुकं, डीअेनअे, आरअेनअे वगैरे घटक असतात. सजीवांच्या प्रत्येक प्रजातीच्या पेशीतील आनुवंशिक तत्वातील गुणसूत्रांची संख्या ठरलेली असते.
सजीवांच्या शरीराची किंवा वनस्पतींची वाढ होते याचं कारण म्हणजे, त्यातील पेशींना आपल्या सारख्याच अनेक पेशीं निर्माण करण्याची क्षमता असते. या नवीन पेशींसाठी लागणारं वस्तूद्रव्य, आहारातून आणि पोषणद्रव्यातूनच घेतलं जातं. यासाठी, आनुवंशिक तत्वात जनुकीय आज्ञावल्या असतात. काही कारणांमुळे, या वाढणार्यात पेशींसाठी योग्य असं वस्तूद्रव्य मिळालं नाही तर त्या पेशींच्या जडणघडणीत जनुकीय बदल होतात आणि निराळं वाण निर्माण होतं. कारण या पेशीत, आनुवंशिक गुणधर्म, पुढच्या पिढीत संक्रमित करण्याची क्षमता असते.
डार्विननं, त्याच्या अुत्क्रांतीच्या सिध्दांतानुसार, पर्यावरणीय परिस्थितीशी अनुकूलन करण्यासाठी, सजीवात अनुकूल असे बदल होतात हे सिध्द केलं. वास्तविक हे बदल, आनुवंशिक तत्वाचे जनुकीय बदल होते आणि ते, प्रजातींच्या अुत्क्रांत गुणधर्माच्या स्वरूपात प्रकट झाले.
1866 साली, ऑस्ट्रेलियन धर्मगुरू, ग्रेगॉर मेन्डेल यांनी, वाटाण्यांवर पध्दतशीर प्रयोग करून, वाटाण्याचे रंग, आकार, शेंगा वगैरे गुणधर्म, पुढच्या पिढीत संक्रमित होण्यासंबंधी, आनुवंशिकतेचे नियम सिध्द केले. म्हणूनच मेन्डेल यांना अनुवंशशास्त्राचे जनक असं म्हणतात.
त्याकाळी, गुणसूत्रं, जनुकं वगैरे आनुवंशिक तत्वाचे घटक आणि जनुकीय आज्ञावल्या यांचा शोध लागला नव्हता. नवीन वाणं निर्माण होण्यासाठी, आनुवंशिक तत्वात संकर होतो हे आता आपल्याला माहित झालं आहे. आता, शास्त्रज्ञ, या आनुवंशिक तत्वाची तोडजोड करून, सक्षम प्रजाती निर्माण करीत आहेत. आनुवंशिक तत्वं, सजीवांची शरीरं घडवितात हे आता निर्विवादपणे सिध्द झालं आहे. अध्यात्मवाद्यांनी आता या विज्ञानीय सत्याचा स्वीकार केला पाहिजे..आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, सजीव आणि वनस्पती यांच्यातील आनुवंशिक तत्व म्हणजेच त्यांचा आत्मा हेही मानलं पाहिजे.
— गजानन वामनाचार्य
सोमवार २६ डिसेंबर २०१६
Leave a Reply