हा हा म्हणता नवीन वर्षातील पहिला महिना संपला. जानेवारीचं पानं उलटून त्याच्याखालचं फेब्रुवारीचं पान दिसू लागेल.
दिवाळी झाली की, नवीन वर्षाची कॅलेंडर्स बाजारात विक्रीला येतात. दूरचित्रवाणीवर ‘भिंतीवरी कालनिर्णय असावे’ ची जाहिरात सुरु होते. शनिपार चौकात एका चष्मेवाल्या बाबांना मी गेली तीस चाळीस वर्षे कॅलेंडर व पंचांग विकताना पहातोय. डोक्यावर पांढऱ्या काळ्या केसांचा संमिश्र भांग, बहिर्गोल भिंगांचा चष्मा, निळ्या रंगाचा चौकटीचा शर्ट, काळी पॅन्ट व पायात चपला. या बाबांना मी सर्व ऋतूत दिवसा व संध्याकाळी पाहिलेलं आहे. जणू काही हा कॅलेंडर नव्हे तर वर्षाचे ३६५ दिवस, विकणारा मला चित्रगुप्तच वाटत आला आहे.
नाहीतरी आपण काय करतो? वर्षाचे दिवस, आठवडे, महिने समोर दिसण्यासाठीच कॅलेंडर खरेदी करतो. ते खरेदी केलं की, सरकारी नोकरी करणारी माणसं, आपल्याला किती सुट्टया मिळतात यावर नजर टाकतात. शनिवार रविवार जोडून सुट्टी आली असेल तर बाहेर गावी जाण्याच्या, योजना आखल्या जातात.
घरातील आजी महाशिवरात्र, आषाढी एकादशी व चतुर्थी कधी आहे, ते बघते. गृहिणी सणावारांच्या तारखा बघते. शाळेत जाणारी मंडळी दिवाळीची सुट्टी कधी सुरु होईल याचा अंदाज घेतात.
एकदा ते कॅलेंडर भिंतीवर लटकलं की, त्यावर महिन्यातील महत्त्वाच्या नोंदी होऊ लागतात. जसं दुधाचे, पेपरवाल्याचे खाडे. गॅस सिलेंडर कधी लावला, त्याची नोंद. लाईटबिल भरल्याची नोंद. घरातील वाढदिवसांच्या तारखांना केलेल्या खुणा.
वर्षभरात ह्या कॅलेंडरची बाराही पानं नोंदीनं भरुन जातात. जानेवारीत भविष्यातील तारखा दाखवणारं कॅलेंडर डिसेंबर अखेरीस, वर्तमान होऊन गेलेल्या भूतकाळाचं एकमेव साक्षीदार म्हणून रहातं. त्यात सुख-दुःखाचे, आनंदाचे, सणांचे, यशाचे, पराजयाचे अविस्मरणीय दिवस साठलेले असतात.
खरं तर तो कुटुंबाचा वर्षांभराचा सारीपाटच असतो. प्रत्येकाला त्याच्या खेळीप्रमाणं दान पडत असतं. उद्या काय घडणार आहे हे माहीत नसताना, दिवस उजाडतो.मावळतो. प्रत्येक दिवस काही ना काही जीवनात भर तरी टाकतो किंवा एखादी गोष्ट हिरावून घेतो. सगळं कसं मृगजळासारखं असतं. आपण योजलेलं, घडतच असं नाही. कधी निराशाही पदरी पडते.
पूर्वी कॅलेंडर ही घरामध्ये शोभिवंत वस्तू म्हणून लावली जात असत. त्यात चित्र मोठे व बारा महिन्यांच्या तारखा लहान असत. पोरवाल, बिटको अशा कंपन्यांची कॅलेंडर आवर्जून लावली जायची.
उन्हाळ्यात उसाच्या रसाची गुऱ्हाळं चौकाचौकात चार महिन्यांसाठी उभी रहायची. ते गुऱ्हाळवाले सजावट म्हणून नटनट्यांच्या कॅलेंडरांनी भिंती भरवून टाकत. रसाचा आस्वाद घेणारे रसिक, ते चेहरे बघत रेंगाळत असत.
डिसेंबर-जानेवारी महिन्यात पूर्वी दुकानदार ग्राहकाला खरेदी केल्यावर, दुकानांची जाहिरात म्हणून कॅलेंडर द्यायचे. नंतर बॅंका देऊ लागल्या. काही वेळा घरात आठ दहा कॅलेंडर साठू लागली.
आता सगळं बदललंय. आता कॅलेंडर विकत घ्यावं लागतं. त्यातसुद्धा विविधता खूप आहे. वर्तमानपत्रवाले देखील स्वतःचं कॅलेंडर पेपरसोबत देतात. ‘कालनिर्णय’च्या पानामागे विविध विषयांवरील लेख, माहिती असते. बऱ्याचदा ती वाचलीसुद्धा जात नाही. काही कॅलेंडरमागे रेसिपी दिलेल्या असतात. आता मोबाईलच्या युट्युबवर रेसिपींचा खजिना उपलब्ध असताना, वाचायला ‘वेळ’ कुणाला आहे?
आता कॅलेंडरवरील नोंदी मोबाईलवर होतात. महत्त्वाच्या नोंदीचे स्क्रिनशाॅट घेतले जातात. वाढदिवसांची आठवण करुन देण्यासाठी ॲपमध्ये नोंद केली जाते.
त्यामुळे आता कॅलेंडर हे घरात असावे, म्हणून लावले जाते. ते लावल्याने दिवाणखान्याचा ‘फिल’ येतो. बाकी आपल्या हातात चोवीस तास, बावन्न आठवडे, तीनशे पासष्ट दिवस, बारा महिने चालतं-बोलतं कॅलेंडर आहेच की!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३१-१-२२.
Leave a Reply