संगीत संशोधक आणि अभ्यासक विश्वास नेरुरकर यांनी संगीतकार वसंत देसाई यांची संपूर्ण कारकीर्द रसिकांना उपलब्ध करून दिली आहे. ग्रंथाचं नाव आहे, ‘वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’.
केवळ हिंदी चित्रपटसृष्टीचा विचार केला तर वसंत देसाई हे कधीच व्यावसायिकदृष्टय़ा आघाडीचे संगीतकार नव्हते. परंतु वसंतरावांच्या सांगितिक आयुष्याचा, हिंदी चित्रपट हा केवळ एक पैलू आहे. मराठी चित्रपट संगीत, नाटय़संगीत गैरफिल्मी संगीत असा त्यांच्या प्रतिभेचा व्याप मोठा आहे. अशा प्रत्येक क्षेत्रातील कामगिरीची विस्तृत माहिती मिळवून, त्याची वर्गवारी करून ते या ग्रंथात अतिशय आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले आहे. छायाचित्रांची नुसतीच संख्यात्मक रेलचेल नाही, तर ती चित्रे आणि त्यातील व्यक्ती पाहता पाहता अनेक दुर्मिळ क्षण जे कुठे कुठे विखुरले होते ते एकत्रितरीत्या गवसल्याचा आनंद मिळतो.
‘मराठी संस्कृती’चे जतन करण्यासाठी अलीकडे अनेकांचे हात शिवशिवत असतात, त्या सर्वाना असे ग्रंथ पाहिल्यावर ‘संस्कृती जतना’चा खरा अविष्कार म्हणजे काय, ते खरे तर लक्षात यायला हवे!
कलावंताला, त्याच्या चाहत्यांना, कलावंताच्या वारसांना त्या कलावंताच्या कामगिरीचे चीज झाले अशी भावना हा देखणा ग्रंथ पाहताना होते. वसंतरावांच्या कर्तृत्वाचा विभागवार आढावा घेणाऱ्या या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्यांच्या एकूण कारकीर्दीची ओळख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, सुहृदांनी सांगितलेल्या आठवणी आहेत. त्यात पुस्तकाचे संकलक, संपादक विश्वास नेरूरकर यांनी ‘टेल ऑफ द मिस्टिक मिन्स्ट्रल’ या १५ पानी प्रदीर्घ लेखात वसंत देसाई यांच्या संपूर्ण प्रवासाची ओळख करून दिली आहे. त्यात वसंतरावांच्या सुरुवातीच्या अभिनय प्रवासाची व संगीत कारकिर्दीची माहिती आहे.
लेखक, गीतकार गुलजार यांनी ‘गुड्डी’, ‘आशीर्वाद’ या चित्रपटांच्या वेळी आलेले आपले अनुभव अतिशय मोजक्या परंतु भावपूर्ण शब्दात व्यक्त केलेले आहेत. ‘गुड्डी’साठी वसंतरावांनी संगीतबद्ध केलेली ‘हमको मन की शक्ती देना’ ही प्रार्थना ए. आर. रहमानलासुद्धा स्तिमित करते, हे गुलजार यांनी आवर्जून नमूद केले आहे. वसंतरावांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बोले रे पपीहरा’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा आता पाहतोसी अंत’ या गाण्यांमुळे मराठी घरांमध्ये ‘सोयरी’ झालेल्या वाणी जयराम हिने अत्यंत आत्मियतेने वसंतरावांवर लेख लिहिला आहे.
‘आय वॉज लाईक ब्लॉटिंग पेपर, अॅाब्सर्बिग एव्हरीथिंग ही टॉट मी’ असे ती म्हणते तेव्हा वसंतरावांचे तिच्या कारकिर्दीतील स्थान अधोरेखित होते. विकास देसाई, वैजयंतीमाला, भालचंद्र पेंढारकर, सुलोचना चव्हाण, इनॉक डॅनिअल्स, डॉ. मंदार बिच्छू, जगदीश खेबुडकर, फैयाज, हेमंत पंडित, बाळ देशपांडे यांच्या लेखांमधून वसंतराव एक संगीतकार आणि एक व्यक्ती म्हणून म्हणून उलगडत जातात. चित्रपट संगीताचे आस्वादक-अभ्यासक राजू भारतन यांनी त्यांच्या ‘ही टय़ून्ड विथ गॉड’ या लेखात वसंतरावांच्या दैवी प्रतिभेचे मर्म उलगडून दाखविले आहे. गूंज उठी शहनाई, दो आँखे बारह हाथ, गुड्डी, रामराज्य यातील गाण्यांचे अतिशय सुंदर असे रसास्वादन त्यात आहे. ‘अमर भूपाळी’मधील ‘तुझ्या प्रीतीचे..’ हे गाणे ‘अर्धागिनी’मध्ये ‘बडे भोले हो’ असे नवे शब्द घेऊन कसे वेगळेच झाले, याचीही आठवण आहे.
विश्लेषण, माहिती आणि आठवणींनी भरलेली ही सव्वाशे पाने संपली की मग सुरू होतो लेखा-जोखा! त्यात पहिल्या भागात हिंदी चित्रपट भेटतात. १९४२ साली ‘शोभा’ या चित्रपटापासून सुरू झालेला संगीतकार म्हणून प्रवास १९७६ साली ‘शक’ या चित्रपटाशी थांबला तो वसंतरावांच्या अकाली अपघाती मृत्युमुळे. या दरम्यान त्यांनी संगीतबद्ध केलेले ५२ हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले तर ‘अमर समाधी’ आणि ‘कामदेव’ अप्रदर्शित राहिले. या चित्रपटांमधील कलावंत, गाणी, गायक असा सर्व तपशील यात आहे. याच पद्धतीने पुढील भागांमध्ये २१ मराठी चित्रपट (सात अप्रदर्शित मराठी चित्रपट), गुजराती, बंगाली चित्रपट, १४ संगीत नाटके, माहितीपट, गैरफिल्मी गीते, नृत्यनाटके यांची १९ तपशीलांसह नोंद आहे. समूहगानाच्या क्षेत्रात देसाई यांच्या अपूर्व योगदानाची व्यवस्थित दखलही घेण्यात आली आहे.
पुस्तकातील लेख आणि फोटोखालील ओळी इंग्रजीत तरी इतर सर्व तपशील आणि माहिती हिंदी/मराठी व इंग्रजीत देण्यात आली आहे. पुस्तकात सर्वत्र वसंतरावांचे विविध मूडस् टिपणारी आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व ठसठशीतपणे दाखविणारी छायाचित्रे आहेत. सहकाऱ्यांसमवेत गाण्यांची चर्चा करणाऱ्या भावमुद्रा आहेत. मासिकाच्या आकारातील पुठ्ठा बांधणीचे सुंदर मुखपृष्ठ, उत्तम दीर्घ-जीवी कागद आणि अप्रतिम छपाई यामुळे हे पुस्तक म्हणजे वसंतरावांच्या प्रतिभेला खरा सलाम ठरते.
‘जब तक सूरज चंदा चमके, गंगा जमूना मे बहे पानी’ असे टिकणारे संगीत यात बंदिस्त आहे. अशा प्रतिभावंतांचे संगीत या मातीत जन्मते, हेच ‘ऋणानुबंधांच्या सुरेल गाठी’सारखे असते, याचा प्रत्यय देणारे हे पुस्तक आहे! ‘वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’, संशोधन, संकलन, संपादन- विश्वास नेरूरकर, बिश्वनाथ चॅटर्जी, गायत्री पब्लिकेशन व स्वरयोग, पृष्ठे- ४०८, किंमत- ८०० रुपये!
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
संदर्भ.श्री.श्रीकांत बोजेवार
Leave a Reply