वस्तीतल्या दिव्यांच्या,भाळी काय आले,–?
उघडे –वाघडे घरदार,
पाहून जीव निमाले,—-
उजेड देत गरीबा,
सगळेच ते दमले,
ओळीने घराघरात,
वातावरण अंधारलेले,—
निवारा फाटका तुटका,
झोपडे मोडकळलेले,
आभाळाचाच आधार आता,
जसे काळीज फाटले,—!!!
कण-कण प्रकाशाचा,
आतून कसा थरथरे,
काही त्यास कळेना,
वाढून काय ठेवले,–?
आईस येई कळवळा,
रिकामे पोट पोरांचे,
करू तरी काय आता,
पेचाने हृदय द्रवले, —!!!
पोटासाठी धावतां,
दुर्लक्ष घराकडे जाहले,
झोपडीतून आरपार,
किरण साक्षीस आले,—!!!
वर आभाळ दिसतां,
साऱ्या आशांचे उमलणे,
येता उजेडाची तिरीप,
वाटते आभाळच फाटलेले,–!!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply