वास्तुशास्त्र पेंटिंग म्हणजे काय? यावर मागील लेखात आपण माहिती घेतली. या विषयावर कोणाला फारशी माहिती नसेल. कधी फारसा विचारही कोणी केला नसेल. परंतु घर वा वास्तूची अंतर्गत सजावट करताना, भिंतींना सजविण्यासाठी पेंटिंग, एखादा आकर्षक आकार इत्यादींची योजना केलेली असते. आपल्याला वा पाहणाऱ्याला त्यातील फारसे काही समजले नाही तरी त्या अंतर्गत सजावटीच्या वातावरणात थांबल्याने काहीतरी समाधान मिळत असते. याचा अनुभव आपल्यापैकी बहुतेक जणांनी… ज्यांना स्वतःचे विचार, स्वतःचं मन आणि स्वतःची स्वप्न असतात अशा साऱ्यांनीच हा अनुभव घेतलेला असतो.
हे असं कशामुळे घडत असतं याबद्दल अनुभव घेणारा अनभिज्ञ असतो किंवा तो फारसा विचार या मुद्द्यावर करत नाही. जर त्याच्या मुळाशी जाऊन पाहिलं तर आपल्या ध्यानी येईल त्या वास्तूच्या अंतर्गत सजावटीमध्ये भिंतीचा रंग फ्रेश आहे. आत लटकवलेली-लावलेली-अडकवलेली पेंटिंग्ज वा निसर्गचित्र वा सिन वा देखावा…… एक असो एकाहून अधिक असो… वातावरण शांत ठेवणारे असतात, आल्हाददायक असतात. खिडक्या-दरवाज्यांचे पडदे असतील तर त्यांचे रंग देखील वातावरणाला पोषक असतात.
हा सारा प्रकार आणि हे सारं वातावरण केवळ आणि केवळ रंगयोजनांचा अत्यंत अचूकपणे-समर्पकपणे केलेला वापर होय. दवाखान्यांना हॉस्पिटल्सना पिस्ता कलर, फिक्कट हिरवा, पांढरा, ऑफव्हाईट अशाच प्रकारचे रंग दिलेले असतात. कधी आपण पाहिले आहे काय? की एकदम भडक लाल-भगवा, गडद हिरवा इत्यादी डोळ्यांना त्रास होईल अशा रंगांनी तो दवाखाना वा हॉस्पिटल सजविले आहे? असं दिसलंच तर तो डॉक्टर आणि तो दवाखाना वा हॉस्पिटल खरंच किती रुग्ण व्याधीमुक्त करेल याबाबत प्रश्नच राहील… असो.
आपण पुढील लेख हा कोणत्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचे पेंटिंग घरात लावावे यावर माहिती मिळवू.
-शुभम भवतु
गजानन सिताराम शेपाळ
Leave a Reply