कुटुंब हे घरातील सदस्यांनी मिळून तयार होते. आई-वडील, काका-काकू, भाऊ, बहीण आणि आजी-आजोबा. म्हणजे एकत्र कुटुंब! आई-वडील आणि मुलगा-मुलगी हे झालं छोटं कुटुंब!
पूर्वी खेड्यात मोठा बारदाना असायचा. त्या कुटुंबात लहान मुलांना आजी-आजोबा बरोबरच पणजी-पणजोबाही सोबत असायचे. दोन चार काका-काकू व त्यांची मुलंबाळं सगळे एकत्र रहायचे. आत्याही येऊन जाऊन असायची. अशा मोठ्या कुटुंबात माझं सुट्टीतील बालपण गेलंय.
शहरात आलो आणि आमचं पाचजणांचं कुटुंब नांदू लागलं. सोबतीला कुटुंबात सहभागी होती एक मांजर. माझ्या वडिलांना मांजर फार आवडायचं. तिला कधी दूध, चपाती दिली की, ती शांतपणे झोपायची. तिच्यामुळे घरात एकही उंदीर दिसायचा नाही. मांजर हा दिवसातील अठरा तास झोपणारा प्राणी आहे. सदानकदा अंगाचं ‘मुटकुळं’ करुन तिला ताणून द्यायची सवय होती. कधी ती रात्रभर बाहेरच असायची. मग एखाद्या रात्री बोक्याबरोवर तिचा चढत्या आवाजाचा संवाद बराच वेळ ऐकू यायचा. कधी कधी त्यांची हमरीतुमरी लागायची. मग झोपेतून उठून त्यांना हाकलून दिल्यावरच मला झोप लागायची.
वर्षातून दोन तीन वेळा तिला पिल्लं व्हायची. पिल्लं झाल्यावर मांजर त्यांना ‘सात घरं’ फिरवते, असं ऐकलं होतं. मात्र आमच्या जोशी वाड्यात, इनमीन तीनच कुटुंब..त्या तिन्ही घरी फिरुन ती पुन्हा आमच्याच घरात वस्तीला यायची. पिल्लं थोडी मोठी झाल्यावर जेवताना सुद्धा ती धावत ताटात यायची. शेवटी त्यांना आडवा पाट लावून, आम्हाला जेवावं लागायचं.
काही वर्षांनंतर त्या पिल्लांमधील तांबूस रंगाचा बोका आमच्या सोबत होता. त्याला आम्ही ‘नाम्या’ नाव ठेवलं होतं. तो जोशी वाडा आणि परिसरात भटकत असे. माझ्या आईला सगळे ‘जीजी’ म्हणून ओळखायचे, त्यावरुन त्याला आसपासचे ‘जीजीचा बोका’ म्हणून संबोधायचे.
१९८७ सालापर्यंत सदाशिव पेठेत आम्ही मांजर पाळत होतो. बालाजी नगरला आल्यावर येताना त्या मांजरीला सोबत घेऊन आलो. इथं आल्यावर तिला पुन्हा पिल्लं झाली. घरच्यांना आता ती मांजर नकोशी वाटू लागली. त्यांनी तिला लांब कात्रजकडे नेऊन सोडले. चारच दिवसांनी ‘ती’ पुन्हा दारात हजर झाली..
शेवटी मांजराशिवाय काही वर्ष काढली. माझ्या मुलाने, विजयने पाचवीत असताना फिशटॅंक आणण्यासाठी हट्ट धरला. जवळच्या अॅक्वेरियमच्या दुकानातून फिशटॅंक, गोल्डफिश, फिल्टर, रंगेबेरंगी खडे असा सर्व लवाजमा आणला. मग त्यांचे खाद्य, त्यांना टॅंक धुण्याच्या वेळी बाहेर काढण्यासाठी जाळी हे साहित्य आणले.
गोल्डफिश नंतर डाॅलर, कॅट फिश, फायटर, एंजल असे एकेक प्रकार वाढत गेले. फिशटॅंकमधील मासे पहाताना ताणतणाव विसरला जायचा. टॅंकची स्वच्छता करण्याचे काम माझ्याकडेच होते. खूप दिवसांनी टॅंक धुवायला घेतला की, त्या पाण्याला मचाळ वास यायचा.
दोन वर्षांनंतर विजयने तो फिशटॅंक एका मित्राला भेट दिला. काही वर्षे निघून गेली. फिशटॅंकच्या दुकानात विजयने एकदा सिंगापुरी कासव पाहिले…
त्याला नको नको म्हणताना त्याने ते आणलेच! दहा रुपयांच्या नाण्याच्या आकाराचे ते डार्क हिरव्या रंगाचं कासव काचेच्या एका गोलाकार भांड्यात ठेवलं. त्याचं ‘केशव’ असं नामकरण केलं. त्याला भांड्यातून हवेत डोकं काढण्यासाठी आत एक दगड ठेवला. त्याचं खाद्य वेगळ्या प्रकारचं होतं, ते खरेदी केलं. दिवसभरात ते पाणी खराब झालं की, ते मी बदलायचो. केशवला जमिनीवर सोडले की, तो त्याच्या संथ गतीने पळायचा. त्याला काही अडथळा आला की, उलटा व्हायचा.. क्षणार्धात सुटला होऊन स्वारी पुन्हा चालायला लागायची. सहा महिन्यांतच तो दुप्पट मोठा झाला. विजयच्या एका मित्राचा कासव खरेदी करायचा विचार होता, विजयने केशवला काचेच्या भांड्यासहीत त्याला भेट दिले.
केशवला देऊन आता वर्ष होऊन गेले. परवा विजयच्या मित्राने केशवचा मोबाईलवर व्हिडीओ पाठवला. केशव आता तळहाता एवढा मोठा झाला आहे. त्याला चांगलं घर मिळालं आहे…
लाॅकडाऊनमध्ये घरी बसून फार कंटाळा येऊ लागला म्हणून विजयने कनुर, हा छोट्या पोपटासारखा दिसणारा पक्षी आणला. तो लगेच माणसाळतो. त्याच्या सहवासाने हा कोरोनाचा लाॅकडाऊन सुसह्य झाला. आता आमचं पाच जणांचं कुटुंब आनंदात आहे..
आजच्या या ‘जागतिक कुटुंब दिनी’ आपल्याबरोबरच पशु-पक्ष्यांना देखील कुटुंबात सहभागी करुन घेतले तर त्याला आपण नक्कीच ‘वसुधैव कुटुम्बकम’ म्हणू शकू, यात काहीएक शंका नाही…
© — सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत
Leave a Reply