पुण्यातील वेदभवनचे वेदपाठशाळेचे प्रमुख, वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांचा जन्म ११ जून रोजी झाला.
मोरेश्वर घैसास गुरुजी यांचे वडील प्रसिद्ध ऋग्वेदी, घनपाठी वेदमहर्षी विनायकभट्ट हरिभट्ट गुरुजी यांनी आपल्या पुढील पिढीलाही वेदांच्या अध्ययनाचा वारसा दिला पाहिजे, या विचारातून त्यांनी पुण्यात राहण्याचे निश्चित केले. सदाशिव पेठेत स्वतःच्या राहत्या खोलीत त्यांनी वेदपाठशाळा सुरू केली. दोन विद्यार्थ्यांना घेऊन १५ ऑक्टोबर १९४५ मध्ये त्यांचे अध्यापन सुरू केले. देशासाठी वेद विद्या ही अमूल्य ठेवा असल्याने त्याचे जतन, संशोधन आणि प्रसार होणे गरजेचे होते. मात्र इंग्रजांनी या ज्ञानाचा ऱ्हास करण्याचा प्रयत्न केला. हळूहळू राजाश्रयही कमी झाला. स्वातंत्र्यानंतर वेद आणि शास्त्रासाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण व्हावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वेदपाठशाळेच्या माध्यमातून जनमानसात वेदांविषयी असलेली श्रद्धा वाढविण्यासाठी काम सुरू केले. ठिकठिकाणी पारायणे, संहिता स्वाहाकार, व्याख्यानमालांचे आयोजन केले. वेदपाठशाळेमध्ये अनेक मान्यवरांना निमंत्रित करून शासकीय स्तरावर वेदशास्त्र विद्यापीठ निर्माण करण्यासाठी आग्रह धरला. सरकार निधर्मी असल्यामुळे प्रयत्न अयशस्वी ठरले. मात्र त्यांनी इतर माध्यमांतून वेद प्रसाराचे काम सुरू ठेवले. याच काळात त्यांचे चिरंजीव मोरेश्वर यांना वेदाध्ययनासाठी आपल्या वेदपाठशाळेत ठेवून त्यांचे अध्ययन सुरू केले. विद्यार्थी अध्ययनाबरोबरच भोजन, निवास आणि इतर प्राथमिक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील, अशी एक वेदपाठाशाळा असावी, अशी त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी १९८१ ते ८५ या काळात अनेक लोकांच्या भेटी घेऊन वेदांचे महत्त्व पटवून दिले. यातून शासकीय मान्यतेने पुण्याकडून पौडच्या आणि नॅशनल डिफेन्स अकादमी (एनडीए) च्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मुख्य चौकात डावीकडच्या बाजूला वनाज कंपनीकडून १९८५ मध्ये वेदपाठशाळा काढण्यासाठी दोन एकर जागा मिळाली. वर्षभरातच जागा ताब्यात आली.
वेदपाठशाळेचे विश्वस्त अण्णा जोशी, वनाज कंपनीचे स. कै. खांडेकर, दि. मु. फाटक, वि. डी. पिटकर अशा विविध सहकाऱ्यांच्या सहभागातून या वेदभवनाचे स्वप्न साकारले. वेदमहर्षी विनायकभट्ट यांच्या मनात असलेल्या कार्याची सुरुवात मोरेश्वर घैसास यांच्या सहभागातून १५ऑक्टोबर १९८९ या दिवशी प्रत्यक्षात झाली. देशाचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते गुरुकुल वेदपाठशाळेचे उद्घाटन झाले. या
वेदपाठशाळेत वेदमहर्षी विनायकभट्ट यांनी ९ वर्षे अध्यापनाचा आनंद घेतला आणि वयाच्या ८२ व्या वर्षी १९९७ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे आजही वेदभवनात अध्यापनाचे कार्य वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरूजी करीत आहेत. आता मोरेश्वर यांचा मुलगा विश्वेश्वर यांचेही अध्ययन पूर्ण झाले आहे. वेदपाठशाळेमध्ये गुरुकुल पद्धत असल्याने इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची अध्ययनाबरोबरच, निवास आणि भोजनाची सोय पाठशाळेतर्फे केली जाते. गुरूजींच्या पत्नी ऐश्वर्या घैसास या सर्व मुलांचे भोजन आणि इतर कार्याची जबाबबारी वर्षानुवर्षे सांभाळत आहेत. विशेष म्हणजे येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणताही मोबदला घेतला जात नाही. वेदभवनातील दशग्रंथांच्या अभ्यासक्रमानुसार १२ ते १३ वर्षे वेदभवनात राहून अध्ययन करतात. पहाटे चार वाजता वेदभवनातील विद्यार्थ्यांची दिनचर्या सुरू होते. राज्याच्या विविध भागांतील विद्यार्थी इथे अध्ययनासाठी येतात.
या वेदभवानाची रचना अष्टकोनी असून तिथे गोशाळा, दुर्मीळ ग्रंथांचे भांडार असलेले ग्रंथालय, यज्ञशाळा, गणेश मंदिर आणि प्रशस्त सभामंडप आहे. वेदपाठशाळेत दशग्रंथांचे अध्ययन शिकवले जाते. गेल्या ७३ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. हा वारसा जपणे आणि पुढे नेणे हे एक कठीण व्रत आहे, यासाठी सरकार आणि समाजाच्या सहकार्याची गरज आहे.
वेदभवनमध्ये दर वर्षी ‘सरस्वती उत्सव’ साजरा केला जातो. आपल्या वैदिक परंपरेत सरस्वती म्हणजे विद्या. आपण ज्या विद्येचे पोथीवरून नित्य वेदांचे अध्ययन करतो, त्या हस्तलिखित अथवा पोथ्यांची पूजा विद्यार्थी या उत्सवामध्ये करतात. वेदपाठशाळेत अनेक हस्तलिखित पोथ्या आहेत. यात काही दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वींच्या संहिता, अरण्यके, उपग्रंथ, ऋग्वेदाच्या पदपाठासह काही हस्तलिखिते, विविध पोथ्यांचा समावेश आहे. या पोथ्यांच्या पानांना कीड अथवा वाळवी लागू नये, म्हणून दर वर्षी त्या चित्रा नक्षत्रावर उन्हामध्ये ठेवल्या जातात.
नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळेला (वेदभवन) भेट दिली. वेदमूर्ती मोरेश्वर घैसास यांच्या पुढाकाराने आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ईटीएचडीसी या संस्थेच्या एकत्रित प्रयत्नांतून पुण्यातील या वेदपाठशाळेने ‘संस्कृतप्रधान बालवाडी’या उपक्रमाची सुरुवात केली आहे. येथील वेदभवन या वेदपाठशाळेच्या वास्तूत ही संस्कृतप्रधान बालवाडी सुरू होत असून तीन ते पाच या वयोगटातील छोटे विद्यार्थी तिथे प्रवेश घेऊ शकतात. २००० साली महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना मिळाला आहे.
वेदभवनची वेब साईट.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply