महाराष्ट्रातील नामवंत प्रसूतीतज्ज्ञ, शतायुषी या मराठीतील सर्वाधिक खपाच्या दिवाळी अंकाचे संपादक आणि उत्तम लेखक डॉ. अरविंद संगमनेरकर यांचा जन्म २३ जुलै १९३६ रोजी पुणे येथे झाला.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वैद्यकीय व्यावसायात पदार्पण केले. पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी प्रसूतीतज्ज्ञ म्हणून काम केले. त्यांनी महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी होऊन दोन लाखांहून अधिक महिलांची आरोग्य तपासणी केली.
वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरू असतानाच संगमनेकर यांना साहित्य क्षेत्रातही रस होता. वैद्यकीय कथांमधून त्यांनी जागृती केली. त्यासाठी त्यांनी ‘शतायुषी’ या दिवाळी अंकाची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शहर प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. ‘गोष्टी लग्नाच्या ः कल्पनेपलीकडच्या डॉक्टरी सत्यकथा’, ‘बकुळीची गोष्ट’ आणि ‘मनीची गोष्ट’ या त्यांच्या पुस्तकांना विविध पुरस्कार मिळाले. लॉकडाउन सुरू होईपर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असत. वैद्यकीय व साहित्य सेवेसाठी त्यांना राज्य सरकारच्या पुरस्कारासह विविध नामंवत संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले.
डॉ. अरविंद संगमनेरकर यांचे ४ जून २०२३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply