प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, राजकीय विश्लेषक विजय तेंडुलकर यांचा जन्म ६ जानेवारी १९२८ रोजी कोल्हापुर येथे सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडिल कारकून होते. शिवाय प्रकाशनाचा छोटासा व्यवसायही ते चालवायचे. ज्या काळात मुलांना खेळण्याशिवाय इतर काही सुचत नसते अशा वयात अर्थात वयाच्या सहाव्या वर्षी तेंडुलकरांनी आपल्या लेखनास प्रारंभ केला. घरात विखुरलेली पुस्तके हे त्यांच्या लेखनाचे मूळ ठरले. बालवयात त्यांच्या लेखनाचे भरपूर कौतुक झाले. घरातील संस्कारांचाही त्यांच्या लेखनावर सुरुवातीच्या काळात बराचसा परिणाम झाल्याचे दिसून येते. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. यासाठी त्यांनी आपल्या शिक्षणावरही पाणी सोडले. या कालखंडात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. १९५५ पासूनच त्यांनी लेखन सुरू केले.
चरितार्थासाठी प्रारंभी त्यांनी पत्रकारितेचा पेशा स्वीकारला. नवभारत, मराठा, लोकसत्ता, नवयुग, वसुधा आदी वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतून त्यांनी सदरलेखनाचे आणि संपादनाचे काम केले. १९४८ मध्ये ‘आमच्यावर प्रेम कोण करणार’ ही त्यांची कथा पहिल्यांदा प्रकाशित झाली. १९५१-५२ च्या सुमारास भारतीय विद्याभवनाने नव्याने सुरू केलेल्या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने तेंडुलकरांचे नाट्यलेखन सुरू झाले. त्यांनी आरंभीच्या काळात निवडलेले नाट्यविषय कौटुंबिक स्वरूपाचे आणि मध्यमवर्गीय जीवनाशी निगडित होते. विजय तेंडुलकरांची साहित्य संपदा अफाट आहे. अर्थातच यात नाटकांची संख्या जास्त आहे. विपुल लेखन करणार्याय तेंडुलकरांनी कादंबरी हा प्रकार आयुष्यात खूपच उशिरा हाताळला. या कादंबर्यां ची नावेही त्यांनी ‘कादंबरी एक व दोन अशी दिली. ‘गृहस्थ’ हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. मात्र ‘श्रीमंत’ हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणार्यास विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला. ‘सखाराम बाईंडर’ मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि ‘घाशीराम कोतवाल’ मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली.
‘माणूस नावाचे बेट’, ‘मधल्या भिंती’, ‘सरी गं सरी’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘अशी पाखरे येती’, ‘गिधाडे’, ‘छिन्न’ आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. ‘निशांत’, ‘आक्रोश’, ‘अर्धसत्य’ या चित्रपटांच्या पटकथा तेंडुलकरांच्या लेखणीतूनच साकारल्या. मराठीतही ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘आक्रित’, ‘उंबरठा’ हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले. “देशातील वाढता हिंसाचार” या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांना १९७३-७४ मध्ये नेहरू शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच १९७९ ते ८१ दरम्यान त्यांनी “टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस” या संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले. नवनाट्याविषयी आस्था बाळगणार्या् संस्था आणि त्यातील कार्यकर्त्यांबद्दल त्यांना जिव्हाळा होता. विजय तेंडुलकर यांचे १९ मे २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply