विजय बारा वर्षाचा होता . गावात याला सगळे विज्या म्हणूनच हाक मारायचे. समुद्राच्या काठावर वसलेले ते छोटेसे कोकणातले मच्छीमारांचे गाव. बहुतांशी कुटुंबांचा उदरनिर्वाह मासेमारीवरच चालायचा. विज्याच्या वडिलांची पण एक होडी होती. गावातली चार पाच लोकं त्याच्या होडीवर कामाला होती. एकत्र कुटुंब असल्यामुळे विज्याच्या घरी माणसांचा राबता खूप होता. विज्याला दोन भावंड होती, नववीत असलेला एक मोठा भाऊ आणि त्याच्याहुन लहान असलेली एक बहीण. त्याच्या काकाला पण चार मुले होती त्यामुळे घरी सात जणांची ही टोळी खूप मस्ती करायची.
मासेमारी करणाऱ्या गावातील होड्या संध्याकाळी समुद्रात जाऊन पहाटे पर्यंत परत यायच्या. आजकाल मोबाईल ची सोय झाल्यामुळे एक बरे झाले होते, माशाचा भाव किनाऱ्याला यायच्या आधीच व्यापारी ठरवून सकाळी टेम्पो हजर करायचे. उरली सुरली छोटी मासळीच कायती लोकल बाजारात जायची.
विज्या हे सारे लहानपणापासून बघत आला होता. विज्याला अभ्यासात चांगली गती होती त्यामुळे घरातल्यांच्या अपेक्षा त्याच्याकडून फार होत्या. त्याने चांगले शिकून मुंबईला नोकरी करावी असेच सर्वांना वाटत होते. पण विज्याच्या मनात मात्र मासेमारी बद्दल भलतेच कुतूहल होते. कित्येकदा त्याने बाबा कडे रात्री होडीवर यायची इच्छा बोलून दाखवली होती पण त्याला सतत नकार मिळत होता.
*********
गणपती दोन दिवसांवर येऊन ठेपले होते. चतुर्थी चा सण म्हणजे कोकणातली दिवाळीच. घरातील प्रत्येकजण बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत गुंतला होता. शाळांना पण सुट्ट्या पडलेल्या त्यामुळे बच्चे कंपनी पण घरीच होती. संध्याकाळी दिवेलागणीची वेळ झाली आणि घरच्यांच्या लक्षात आले विज्या कुठे दिसत नाहीएय. गावात शोधाशोध सुरू झाली. सुरुवातीला वाटले कुठल्या तरी मित्राच्या घरी असेल पण कुणाच्याच घरी नाही हे आढळल्यावर मात्र सगळ्यांचेच धाबे दणाणले. गावकऱ्यांनी गावातली सारी ठिकाणे पालथी घातली पण विज्याचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. त्याच्या आईने तर एव्हाना रडायला सुरुवात केली होती. आता पोलिसांना कळवावे असे सर्वांचे मत पडले. पण त्या अगोदर कुणीतरी त्याच्या वडिलांना होडीवर फोन केला. त्यांना घडल्या प्रकाराची कल्पना दिली. ते पण चिंतेत पडले. त्यांनी लगेच इतर खलाशांना परत किनाऱ्या च्या दिशेने होडी घेण्यास सांगितले. सारेच जण चिंतेत होते. होडीवरचे सारे जण विज्याच्या वडिलांची समजूत काढत होते. पण बापाचा जीव पार टांगणीला लागला होता.
**********
विज्या बसल्या जागी एकदम अवघडून गेला होता! होडीच्या सतत खालीवर होण्याने त्याच्या पोटात माळमळायला पण लागले होते. त्याच्या कानावर त्याच्या बाबाचे आणि इतर खलाशांचे बोलणे पडत होते. समुद्रात मासेमारीसाठी जायला मिळावे म्हणून तो कधीपासून हा प्लॅन बनवत होता. संध्याकाळी समुद्रात होडी लोटायच्या आधी सगळ्यांची नजर चुकवून तो बुडाशी लपून बसला होता. एवढा सगळा मोठा प्रकार होईल याचा त्याने विचारच नव्हता केला नव्हता. आता आपल्याला पडणाऱ्या माराच्या विचाराने तो जागच्या जागी थिजून गेला होता. लपण्याच्या जागेतून बाहेर येऊन वडिलांसमोर उभे राहण्याची हिम्मत त्याच्यात नव्हती. त्याला आता खूप रडायला येत होते.
होडी जेवढ्या वेगाने शक्य होईल तेवढ्या वेगाने किनाऱ्याकडे जात होती तेवढ्यात एक खलाशाला हुंदक्यांचे आवाज ऐकू आले. त्याने वाकून पाहिले असता थर थर कापत आणि हुंदके देऊन रडत असलेला विज्या नजरेस पडला!
“अरे तू हय काय करतंस?” तो खलाशी जोरात ओरडला
ते ऐकल्या बरोबर विज्याच्या रडण्याचा जोर अजून वाढला! आता काय प्रकार नक्की झालाय तो सगळ्यांच्या लक्षात आला. लपलेल्या जागेतून विज्या बाहेर यायला तयार नव्हता!
“विज्या, भायर ये” त्याच्या बाबाने ओरडून सांगितले.
“बाबा , मारू नको… मिया चुकलंय.. परत नाय करूंचय” विज्या रडत रडत बोलत होता.
बाबाने मारणार नाही असे आश्वासन दिल्यावरच तो बाहेर आला. बाबाने सर्वात प्रथम घरी फोन लावून विज्या मिळाल्याची खबर दिली तेव्हा कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला!
Leave a Reply