अंगद म्हसकर… एक गुणी आणि वास्तववादी कलावंत… रंगमंचावरून प्रवेश करून त्याने स्वत:चा पाया किती पक्का आहे हे कधीच दाखवून दिलंय….
साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. दिग्दर्शक विजू मानेचा मला फोन आला. मराठी इंडस्ट्रीत येऊ पाहत असलेल्या एका फिमेल मॉडेलचं फोटोशूट करण्यासाठीचा तो फोन होता. ठरल्याप्रमाणे आम्ही स्टुडिओत भेटलो आणि शूटला सुरुवातही केली. त्या मॉडेलचं शूट संपल्यावर विजूसोबत एक सडपातळ बांध्याचा, निळ्या-घाऱया डोळ्यांचा, हसऱया चेहऱयाचा आणि चेहऱयावर विलक्षण तेज असलेला मुलगा होता. विजूने ओळख करून दिली. फोटोशूट संपल्यावर विजूचे आणि या नुकत्याच भेटलेल्या मुलाचे काही फोटो मी स्टुडिओत टिपले. ही मैत्री इथेच संपली नाही. पुढे नियमित भेटीगाठी झाल्या. या नव्या मुलाचा आणि इंडस्ट्रीत काही करू पाहत असलेल्या कलाकाराचा प्रवास पुढे रंगमंच ते छोटा पडदा आणि नंतर थेट रुपेरी पडदा असा वेगाने होताना मला पाहायला मिळाला. अंगद म्हसकर या तरुणानं अल्पावधीतच आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. मोजक्या पण अर्थपूर्ण भूमिका चोख निभावणारा कलाकार म्हणून त्याने आपली ख्यातीच निर्माण केली.
अभिनयाचा श्रीगणेशा करण्याआधी अंगदने स्वतःवर विशेष मेहनत घेतली होती. नियमित व्यायामाच्या सरावाने त्याने चांगली शरीरयष्टी कमावली. अभिनयाचे वेगळे धडे गिरवले. या सिनेसृष्टीतल्या प्रवासात अंगदला अनेक गुरू भेटले. अनिवाश नारकर यांना अंगद अगदी जवळचा मित्र मानतो. तर कै. मोहन वाघ यांना तो आपले व्यावसायिक गुरू मानतो. तर त्याचे दुसरे व्यावसायिक गुरू म्हणजे दिग्दर्शक वामन केंद्रे. गॉडफादर नितीन सरदेसाई यांच्यामुळे त्याला अभिनयाची वेगळी शिस्तच लागल्याचं तो मानतो. ‘गारंबीचा बापू’ हे अंगदचं गाजलेलं नाटक. याखेरीज ‘ती फुलराणी’, ‘रणांगण’, ‘ऑल द बेस्ट’, ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘गिधाडे’, ‘तिन्ही सांज’ या नाटकांतून अंगदने रसिकमन जिंकलं. ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, ‘मड्डम सासू दड्डम सून’, ‘गुंतता हृदय हे’, ‘तू तिथे मी’, ‘हृदयी प्रीत जागते’, या महाराष्ट्रभर गाजलेल्या मालिकांत अंगदची महत्त्वाची भूमिका होती. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य एक युगपुरुष’, ‘मुंबई पुणे मुंबई-2’ या चित्रपटांत अंगदने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. ‘बायोस्कोप’ या सिनेमातील ‘एक होता काऊ’ या लघुपटात स्पृहा जोशीसोबतची अंगदची भूमिका विशेष गाजली.
अंगदचं फोटोशूट करण्यासाठी त्याकाळी गाजलेल्या एका मालिकेत त्याची असलेली कॉर्पोरेट प्रतिमा आम्ही लक्षात घेतली आणि याच प्रतिमेला धरून काहीतरी वेगळ शूट करायचं असं आमचं ठरलं. कॉर्पोरेट प्रतिमेला धरून अंगदचा पेहराव ठरवण्यात आला. ब्लेझर लूकमध्ये अंगद फारच सुंदर दिसत होता. स्टुडिओत त्याचं या लूकमधलं एक फोटोशूट केलं. यानंतर या शूटला विरोधाभास वाटेल असं एक शूट करायचं आमचं ठरलं. या शूटसाठी आम्ही थेट एका गॅरेजमध्ये गेलो.
माझा मित्र दिगंबर यादव याचं अवाढव्य मोठं गॅरेज या शूटसाठी आम्हाला उपलब्ध झालं. इथे मला हवं असलेलं सारं काही होतं. जुन्या मोटारी, त्यांचे पार्टस् तसंच त्याची अवजारं हे सारं काही होतं. सुरुवातीला ब्लेझर घातलेल्या अंगदचे इथल्या जुन्या मोटारींच्या बॅकग्राऊंडला काही फोटो मी टिपले तर यानंतर एक जुनी सायकल आमच्या नजरेस पडली. ही सायकल हातात घेऊन जात असलेल्या अंगदचे काही फोटो टिपले. अंगदचा ब्लेझरमधल्या पेहरावामुळे हवा असलेला विरोधाभास निर्माण करता आला तसंच त्याच्या हातात एक हेल्मेट देऊन आम्ही त्यात आणखी मजा आणण्याचा प्रयत्न केला.
साधारणपणे पाच ते सहा तास अंगदचं शूट सुरू होतं. या शूटवर अंगद म्हणाला, ‘यातलं लायटिंग आणि ओव्हरऑल एक्स्प्रेशन फारच सुंदर आहेत. माझ्या आयुष्यातलं हे फारच लक्षात राहणारं शूट तर आहेच; परंतु ही कल्पना मुळातच फार सुरेख आहे आणि हे शूट झाल्यानंतर मला असं जाणवलं की हे समाज प्रबोधनासाठीही अत्यंत उपयोगी पडेल. यासाठी की, सध्याच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी सायकल हे अत्यंत उत्तम साधन आहे. वाहने चालवताना सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. मग ते कोणतेही वाहन असो आणि माझ्या हातात असलेलं हे हेल्मेट त्यांचं प्रातिनिधित्व करत आहे.’ त्याच्या या विधानाने मी भारावूनच गेलो. अंगद जे करतो त्या प्रत्येक कृतीमागे त्याचा असा एक स्वतंत्र विचार असतो. तो विचार त्याला पटला तर आणि तरच तो पुढचं पाऊल उचलतो. हाच गुण कदाचित त्याचा कलाकृती निवडण्यामागेही असावा आणि म्हणूनच मोजक्या परंतु चोख भूमिका निभावण्यात अंगदचा नेहमीच हातखंडा राहिला आहे.
धनेश पाटील
dhanauimages@gmail.com
Leave a Reply