वर्षं किती भराभर जातात ना?दिवस तर एकामागून एक नुसते पळतच असतात…!आत्ताआत्ता पर्यंत माझे चारही नातू एवढाल्लेसे होते…बघता बघता चौघेही किती मोठ्ठे झाले..पिल्लं घरट्यातून कधी उडून गेली ते कळलंच नाही.
अर्थात ते काही माझ्या घरट्यात राहात नव्हते…ते होते अमेरिकेत, त्यांच्या घरी!..आता माझ्या दोन्ही लेकींची मोठाली घरं रिकामी होऊन गेली आहेत…ती मोकळी झालेली घरं मला इथूनही जाणवतात. त्यामुुळे आता मला अमेरिकेला जावंसं वाटतच नाही.तेव्हा आम्ही दोघे दर वर्षाआड तिथे जायचो. एका वर्षी आम्ही जायचो..पुढच्या वर्षी मुली यायच्या.आणि दोघी वेगवेगळ्या वेळी यायच्या.त्यामुळे मला डबल आनंद मिळायचा.
पण मला आठवतंय,फक्त एकदाच कधीतरी जूून-जुलै मध्ये त्या एकत्र आल्या होत्या.तेव्हा घरात नुसती गडबड आणि आनंदी आनंद भरून राहिला होता…! ते सगळे परत गेल्यावरही कितीतरी दिवस मी त्या आठवणींमधेच रमलेली होते. खरंतर घरात खूपजण एकत्र
असल्यामुळे दिवसभर काम पुरायचं.त्या चौघांचेही बालहट्ट पुरवताना दमायला तर होत असणारच.पण उत्साहाच्या भरात तो थकवा मला जाणवतच नव्हता. वारकरी कसे विठ्ठलनामाच्या गजरात देहभान विसरून मैलोन् मैल चालत असतात…तशीच अवस्था झाली होती माझी.
झोप, तहानभूक सारं हरपून मी फक्त माझ्या बाळांमधेच बुडाले होते.त्या दिवसांत जणू एक अखंड अविरत ऊर्जास्त्रोतच मला लाभला होता…..! त्यावेळच्या माझ्या भावनांचं वर्णन करू तरी कसं….? एक मासाचा की काळ, जसा क्षणात संपला क्षणभराचा आनंद ,
जगभरून उरला त्या आनंदाची जात, सांगू कशी मी कोणाला तृषार्त मनावर जणू आषाढ वर्षला सहवास नातवांचा मज , शांतवून गेला
वारक-यांचा विठोबा , जणू घरात नांदला…! वारक-यांचा विठोबा माझ्या घरात नांदला……..!! ……आताशा विठोबा फारसा माझ्या घरी फिरकत नाही….!!!!
– मंगला खानोलकर
Leave a Reply