नवीन लेखन...

ब्रिंदाबनी सारंग

वातावरणात उन्हाच्या प्रचंड झळा लागून, मनाची तलखी होत असावी. थंड पाणी पिऊन देखील घशाला शोष पडावी. घराबाहेर नावाला देखील वाऱ्याची झुळूक नसावी आणि त्यामुळे झाडांची पाने देखील शुष्क आणि अम्लान झाली असावीत. सगळीकडे रखरखाटाचे वातावरण पसरले असावे. डोक्यावरील पंख्यातून देखील गरम हवेचे(च) झोत पडत असावे आणि त्यामुळे चिडचीड वाढत असावी. बाहेर नजर ठरत नसावी कारण, डोळ्यांना उन्हाची तिरीप त्रस्त करीत असावी. अगदी डोळे मिटले तरी ग्लानी यायच्या ऐवजी लालसर पिवळे रंग फेर धरत असावेत. आणि अशा अस्वस्थ क्षणी दूरवरून, “मध्यम”,”पंचम” स्वरांच्या जोडीने “कोमल निषाद” कानावर येऊन, मनाची अवस्था किंचित मनोरम व्हावी. हीच किमया, ब्रिंदाबनी सारंग या रागाच्या, सुरांनी होते. रागदारी सुरांची ही किमया केवळ अलौकिक म्हणावी अशीच आहे. वातावरणात क्षणात बदल घडवून आणण्याची ताकद, सुरांच्या अवगाहनातून सहजगत्या होते आणि आपल्याला देखील, या किमयेचे नेमके विश्लेषण करणे अवघड होऊन बसते. अर्थात, यामागे  मनावर झालेले पारंपारिक संस्कार देखील कारणीभूत असतात.

वास्तविक, हा राग म्हणजे दुपारच्या काहीलीवर “उतारा” असा उल्लेख, बऱ्याच ग्रंथातून वाचायला मिळतो. “औडव/औडव” जातीचा हा राग, फार विलक्षण किमया करतो. “गंधार” आणि “धैवत” वर्जित सूर असले तरी, अवरोही स्वरांतील “कोमल निषाद” इथे भलतीच करामत करून जातो. “मध्यम” आणि “पंचम” हे या रागाचे वादी – संवादी स्वर असले तरी, या रागात काही वेळा “तीव्र निषाद” आणि “कोमल निषाद” अशा दोन्ही स्वरांचा वापर केला जातो, पण खरी ओळख होते ती, “मध्यम” आणि “कोमल निषाद” या स्वरांनी. वर उल्लेखलेली दुपारची दाहकता, जणू या दोन स्वरांच्या सहाय्याने शीतल करण्याची जादू करतात. काफी थाटातील या रागाची “मींड” ही मध्यम, पंचम आणि कोमल निषाद स्वरांतून सिद्ध होते. या रागाची आणखी एक गंमत सांगता येते. या रागाचे स्वर जर का नेमकेपणी घेतले नाही तर, हा राग नकळत “मेघ” रागात मिसळून जाऊ शकतो, इतके या दोन रागांत साम्य आहे. या रागात काहीवेळा दोन्ही निषाद घेतले जात म्हणजे कोमल आणि तीव्र निषाद घेतले जातात पण अर्थात, याला एक प्रयोग, इतपतच अर्थ घेता येईल. कोमल निषाद, हेच खरे या रागाचे स्थान!!
उस्ताद रशीद खान, हे नाव आता शास्त्रीय संगीताच्या रसिकांना परिचित झालेले आहे. अत्यंत मुलायम आवाज, ताना घेताना देखील शक्यतो खंडित स्वरूपाच्या घ्यायच्या, ज्या योगे प्रत्येक सुराची “ओळख” रसिकांना घेता यावी. मंद्र आणि शुद्ध स्वरी सप्तकात शक्यतो गायन सादर करण्याची प्रवृत्ती. सरगमचा अतिशय सुंदर उपयोग करणे, इत्यादी अनेक वैशिष्ट्ये, या गायकाची सांगता येतील. गायन ऐकताना काहीवेळा उस्ताद अमीर खान साहेबांच्या गायनाचा प्रभाव जाणवतो, विशेषत: लयकारी ऐकताना, हा प्रभाव जाणवतो. “रामपूर साहसवान” घराण्याचा जरी गायक असला तरी इतर सगळ्या घराणेदार गायकीतून, चांगले उचलून, स्वत:च्या गायकीत मिसळून, स्वत:ची अशी वेगळीच गायकी प्रस्थापित केली. काहीवेळा खर्जातील सूर लावताना, पंडित भीमसेन जोशींचा देखील ठसा दिसतो. याचा अर्थ इतकाच घ्यायचा, उस्ताद रशीद खान यांनी, सगळ्या घराण्यांची वैशिष्ट्ये आपल्या गायनात सामावून घेतली आहेत.
” ओ रे दिन आज” या बंदिशीत, विशेषत: आलापी ऐकताना, आपण वरती जी “मिंड” मांडली आहे, तिचा अनुभव घेता येतो. खरतर, मला बरेचवेळा ” रागदारी गायनातील भावगीत” असे म्हणायचा मोह होतो इतके भावपूर्ण गायन असते. कुठेही स्वर लावण्याचा खटाटोप नाही की कुठे अडखळणे नाही. ज्या सहजतेने, कोमल स्वर लावले जातात त्याच सहजतेने, शुध्द स्वर आणि तीव्र स्वर घेतले जातात आणि वरच्या पट्टीत गाताना, कुठेही स्वर “ताणला” आहे, असे न होता, स्वरांचे “मुलायमपण” कायम राखले जाते. ऐकताना, काहीवेळा “कोमल गंधार” स्वराचा भास होतो पण तो प्रभाव आहे “मध्यम” स्वराचा!! या रागात “गंधार” स्वराला अजिबात स्थान नाही.
संगीतकार हेमंत कुमार, यांना हिंदी चित्रपट सृष्टीत खऱ्याअर्थाने स्थिरावायची संधी प्राप्त झाली, ती “नागिन” चित्रपटाच्या अभूतपूर्व लोकप्रियतेने. या चित्रपटातील सगळी गाणी अप्रतिम आहेत.  याच चित्रपटात, या रागावर आधारित अतिशय सुश्राव्य असे गाणे आहे – “जादुगार सैय्या” आणि हे गाणे ब्रिंदाबनी रागाची नीटसपणे ओळख करून देते.
जादुगार सैंय्या, छोडो मोरी बैय्यां;
हो गयी आधी रात, अब घर जाने दो”.
मेंडोलीनच्या सुराने सुरु होणारे गाणे, झटक्यात जलद लयीत जाते. ताल, पारंपारिक केरवा आहे. यात लय जलद असली तरी इतक्या अप्रतिम हरकती आहेत की, प्रत्येक हरकत अत्यंत बारकाईने न्याहाळावी. तालाच्या प्रत्येक मात्रेगणिक हरकत आहे आणि त्यामुळे चालीला एक सुंदर निमुळते “टोक” येते. प्रणयी गाणे आहे आणि चाल तशी साधी असली असली तरी मनाची लगेच पकड घेते. अर्थात, उडत्या तालामुळे हे शक्य होते. साधी चाल असून देखील, त्यात “गायकीला” कसा वाव मिळतो, याचे हे गाणे म्हणजे नमुना आहे. या गाण्यावर तालाचा इतका प्रभाव आहे की, ताल बाजूला ठेऊन, केवळ हरकती ऐकायच्या तर त्याला फार प्रयास पडतो.
मघाशी मी लिहिताना, एक वाक्य लिहिले आहे, या रागाचे “मेघ” रागाशी फार जवळचे नाते आहे आणि जर का स्वरांची ठेवण नेमकी ठेवली नाही तर रागांची “गल्लत” होऊ शकते. खालील गाणे, माझ्या या म्हणण्याला “दाखला” म्हणून देता येईल. “सावन आये, या ना आये” हे, “दिला दिया दर्द लिया” या चित्रपटातील गाणे, आपण ऐकुया. गाण्याचे शब्द तर स्पष्टपणे, ” मेघ” रागाशी जवळीक दाखवतात पण तरीही, पहिला अंतरा जिथे संपतो तिथे सतारीचे सूर आहेत, तिथे “ब्रिंदाबनी सारंग” दिसतो. खरतर, या रागाची उत्तम ओळख या गाण्यातून आपल्याला होते.
“सावन आये, या ना आये;
जिया जब झुमे सावन है”.
या गाण्यात चक्क दोन ताल आहेत. १] केरवा आणि २] त्रिताल. गाण्याची सुरवात त्रितालाने होते पण पुढे त्याच लयीत केरवा ताल मिसळतो. फारच सुंदर प्रकार आहे. या गाण्यात पहिला अंतर संपत असताना, “नि सा रे म प” ही जी सरगम आहे, तिथे हा राग सिद्ध होतो. रागदारी संगीताची आवड आणि ओळख करून घेण्यासाठी हे गाणे एक अप्रतिम उदाहरण म्हणून सांगता येईल.
मंगेश पाडगावकरांनी अनेक चिरस्मरणीय भावगीते लिहिली आहेत. प्रस्तुत गीत हे त्यातील अजरामर स्वरूपाचे गीत आहे. वास्तविक, या कवितेचा ढाचा थोडासा “कथात्म” स्वरूपाचा आहे, क्वचित गद्याकडे झुकणारा आहे परंतु तरीही संगीतकार यशवंत देवांनी चाल लावताना, चाल कुठेही रेंगाळणार नाही आणि प्रवाहित्व कायम राहील, इकडे नेमके लक्ष दिले आहे. सुगम संगीतात, चाल कुठेही रेंगाळणार नाही, याकडे बारकाईने भान ठेवावे लागते. “भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी” या गीतातून, समर्थपणे, हा राग दिसून येतो.
“भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी,
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी”.
अरुण दाते यांनी, हे इतके मोठे गाणे असून देखील, अतिशय सुंदर गायले आहे. गाण्याच्या सुरवातीला वाजलेल्या सनईमधून, “ब्रिंदाबनी सारंग” रागाची झलक मिळते. खरतर, हे गाणे म्हणजे आत्ममग्न कथासूत्र आहे. अर्थात, याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे शब्दानुरूप बदलेली चाल. लय तशीच कायम ठेऊन, सुरांत किंचित बदल करून, आवश्यक तो “भाव” सुरांतून व्यक्त करायचा. हा खेळ इथे फारच बहारीने साधला आहे. त्यादृष्टीने या गाण्यात वाद्यमेळाचे फारसे प्रयोग नाहीत आणि प्रत्येक अंतऱ्यात जवळपास तशीच ” धून”कायम ठेवली आहे.
“रुदाली” चित्रपटात या रागाची नव्याने ओळख दाखवणारे एक नितांत रमणीय “झुठी मुठी मितवा” असे गाणे आहे. संगीतकार भूपेन हजारिका यांची चाल असून, लताबाईंनी हे गाणे गायले आहे.
“झुठी मुठी मितवा आवन बोले,
भादो बोले कभी सावन बोले;
बादलों पे चलने को चाहू पिया,
आओ मेरा झुलना झुलाओ पिया
झुठी मुठी मितवा आवन बोले.”
कवी गुलजार यांची शब्दकळा देखील चित्रदर्शी आहे. चित्रपटातील प्रसंग आणि वातावरण, याचे नेमके चित्रण त्यांनी आपल्या कवितेतून केले आहे. या गाण्यात देखील आपल्याला “मेघ” रागाचा भास होण्याची शक्यता आहे आणि तसे  बारकाईने ऐकले तर तसाच भास होतो पण गाण्याची काही “वळणे” ही “ब्रिंदाबनी सारंग” राग दर्शवतात.
मराठी नाट्यगीतांत अभिमानाने स्थान मिळवणारे गीत – “साद देतो हिमशिखरे” हे गाणे या रागाची अशीच फसवी ओळख करून देतात. मराठी संगीत नाटकांत, “संगीत मत्स्यगंधा” या नाटकाचे नाव चिरस्मरणीय ठरले आहे आणि त्यामागे, पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांची कामगिरी अतुलनीय आहे,. त्यांनी, नाट्यगीतांचा ढाचा(च) बदलून त्यात अधिक लालित्य आणले आणि भावगीताच्या जवळ आणून सोडले. अर्थात, असे करताना त्यांनी, रचनेत विस्ताराच्या असंख्य शक्यता निर्माण करून ठेवल्या असल्याने, गाताना “गायकी” दाखवण्याचा अवसर गायकांना नेहमी मिळतो.
“साद देती हिमशिखरे, शुभ्र पर्वताची;
क्रमीन वाट एकाकी ब्रह्मसाधनेची”.
आता या गाण्याकडे कविता म्हणून वेगळ्या बाजूने बघितले तर, शब्दकळा पूर्वीच्या गाण्यांपेक्षा काहीशी निराळी आहे. मुख्य म्हणजे अर्थ आकळून घेताना फारसा प्रयास पडत नाही. हाच आशयाचा गाभा ठेऊन, अभिषेकी बुवांनी गाण्याच्या चाली बांधल्या आणि मराठी संगीत रणभूमीवर नवे मन्वंतर घडले. रामदास कामत यांनी हे गाणे गायले असून, गायनाची धाटणी देखील अतिशय सहज, सुगम अशी ठेवली आहे. गाण्यात तानबाजी, हरकती आहेत पण त्यांचा भरमार नसून, त्यात एक प्रकारचा लडिवाळपणा आहे.
“संथ वाहते कृष्णामाई” या मराठी चित्रपटाचे शीर्षक गीत देखील याच रागाची अनोखी ओळख करून देते. संगीतकार दत्ता डावजेकर यांनी चाल बांधताना, वाद्यमेळ आणि त्यातील प्रत्येक वाद्याचा “गुणधर्म” ओळखून संगीत रचना केली आहे. माडगूळकरांची कविता तर अलौकिक आहेच पण त्याला सुरांची असामान्य जोड मिळाल्याने, या गाण्याला चिरंजीवित्व प्राप्त झाले आहे.
” संथ वाहते कृष्णामाई,
तीरावरल्या सुखदु:खांची जाणीव तुजला नाही”.
आता, कवितेतील शब्द संख्या बघा म्हणजे मग संगीतकाराच्या चालीचे मर्म नेमके ओळखता येईल. एका सलग “मीटर” मध्ये शब्द नाहीत पण तरीही गाण्याची चाल(च) अशा प्रकारे बांधली आहे की त्यातील “गेयता” अचूकपणे ध्यानात येईल. गाण्याचा “ठेका” देखील किती विलक्षण आहे. गाणे अतिशय संथ लयीत आहे आणि तोच या चालीचा “स्वभाव” आहे. स्वभावानुसार तालाचे महत्व ठेवले आहे आणि गाण्याच्या पार्श्वभागी बहुतांशी बासरी आणि व्हायोलीन वाद्यांचे स्वर तरळत ठेवले आहेत. परिणाम असा घडतो, गाण्याची चाल आपल्या मनात कायमचे स्थान मिळवते.
– अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..