वृद्धाश्रमात ठाण्याच्या –
माझी आत्या असते,
मधूनमधून जातो –
मी तिला भेटायला.
गेल्यावर मात्र जे –
भकास चित्र दिसते,
पाहिल्यावर नको वाटतं –
पुन्हा तिथे जायला.
सणवार वाढदिवसाचे गोडधोड –
सारे काही मिळते,
डोळे मात्र आतुरले असतात –
मुलांना पाहायला.
ती दिसणार नाहीत सदा –
हे जेव्हा उमजते ,
शिकतात मग सारी स्वतःशी –
खोटं खोटं हसायला.
एकटेपणाची जाणीव –
जीवाला खूप जाळते,
टपटपणाऱ्या आसवांनी –
उशी लागते भिजायला.
नाही कुणी येणार आपले –
हे जेव्हा वळते ,
मूळ स्वभावाच्या पाऊलखुणा –
अलवार लागतात दिसायला.
विचित्र वागण्या बोलण्याची –
अहमहमिका लागते,
कळवतील घरी अन् –
येईल कुणी घरातला!
न उपयोग होत काही –
न हाती काही लाभते ,
आनंद माना इथे यामधे –
हे लागते कळायला.
काकुळल्या वृद्ध चेहऱ्यावरती –
मग एकच आशा उमटते ,
उरल्या आयुष्यी आपल्या –
पाय लागतील का घराला ???
प्रासादिक म्हणे
–प्रसाद कुळकर्णी
Leave a Reply