१.
कर्नल सावंत निवृत्त होणार होते.
आतापर्यंत त्यांनी कधी निवृत्तीचा व विशेषत: निवृत्तीनंतर कुठे रहायचं, याचा विचारच केला नव्हता.
सीमेवर देशाची सेवा करतांना प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकाला निवृत्तीचे बेत आंखायला वेळ नसतो.
सीमेवर तीक्ष्ण नजरेने पहाणारा सैनिक आपल्या भविष्याकडे कधीच नजर लावून बसत नाही. कर्नल सावंत याला अपवाद नव्हते.
अतुलनीय पराक्रमाबद्दल मिळालेली पदके छातीवर अभिमानाने लावायची, मान ताठ ठेवायची व देशरक्षणासाठी सज्ज रहायचे एवढेच त्यांना ठाऊक होते.
त्यांच्या बदल्या झाल्या व ते कुटुंबासह एका शहरांतून दुसऱ्या शहरांत चार वेळा गेले पण त्यांना नवीन ठीकाणी रहाण्यांत विशेष अडचणी आल्या नाहीत कारण आर्मी पाठीशी असे.
रहायला चांगले घर व इतर सर्व सोयीही बघितल्या जात.
त्यांचा मुलगा शिक्षणासाठी प्रथमपासून दूरच राहिला होता आणि शिक्षण पूर्ण करून परदेशी गेला होता.
अलिकडेच ह्या विषयाची आठवण त्यांच्या ब्रिगेडीयरनीच करून दिली.
ते म्हणाले, “कर्नल, स्वत:चा कांही विचार केलास की नाही? निवृत्तीनंतर कुठे रहाणार आहेस? कोणतं शहर निवडलं आहेस?”
२.
तेव्हांपासून ते ह्या विषयाचा विचार करू लागले होते.
निवृत्तीनंतर ते आणि पत्नी दोघांना रहायला घर तर हवं होतं.
मोठ्या शहरांत रहाणं त्यांना दोघांनाही नसतं आवडलं.
गांवी त्यांच असं कांहीच नव्हतं.
दोघांनी विचार करून एका तालुक्यांतील मुख्य शहराची निवड ठरवली.
शहर असल्यामुळे, तिथे सर्व सोयी होत्या.
परंतु मुंबईसारखी गर्दी नव्हती.
तिथे जागा उपलब्ध होत्या.
प्लॅाटस् पध्दत आली होती.
एखादा चांगला प्लॅाट घ्यावा आणि तिथे छानसा छोटा बंगला बांधावा.
बंगल्याभोवती बाग असावी.
त्यांत फुलझाड तर असणारच पण एखादा माड, एखादा शेवगा, इ. लावायलाही जागा असावी. बागेत एक झोपाळा असावा.
छोटंसं कारंज असावं.
त्याच्यातच पाणी साठवायची व त्यांत छोटे मासे पाळायचे.
स्वत: रोज बागेत काम करण्याची त्यांना हौस होती.
अशी स्वप्ने ती दोघं रंगवू लागली.
मग त्यासाठी किती जागा लागेल याचा अंदाज घेऊन त्यांनी त्या शहरांत जागा बघायचे ठरवले. बिल्डर आपल्या सोयीनुसार प्लॅाट पाडत असल्यामुळे कांही प्लॅाटस् अगदी लहान तर कांही खूप मोठे होते.
लहान त्यांना नको होता मोठा परवडणार नव्हता.
प्लॅाट मिळेपर्यत त्यांची निवृत्ती झाली व त्यांनी त्याच शहरांत तात्पुरते घर भाड्याने घ्यायचे ठरवले.
३. आपण इथे येऊनच राहिलो तर काम सोप्पे होईल, असे त्यांना वाटले होते.
त्या शहरांत भाड्याच्या घरांत ते राहिले तरी त्यांना तिथे स्थायिक व्हायला जरूरी गोष्टी त्यांना करतां आला असता.
बैठा बंगला सुध्दा सात आठ महिन्यात बांधून होईल, असे त्यांना सांगण्यात आले.
निवृत्तीनंतर लगेचच ते तिथे रहायला आले.
भाड्याचा फ्लॅट लहान होता आणि त्यांच सामान बरंच होतं.
मग एका खोलीत बरंचस सामान ठेवून इतर दोन खोल्या व छोटे कीचन वापरून भागवायचे ठरले. घरी जेवण करायचे म्हणजे पहिल्यांदा जरूर होता गॅस.
अगदी छोट्या गांवा गावात सुध्दा आता गॅस सिलिंडर मिळतो, असं ते ऐकून होते.
जवळची सर्व कागदपत्रे घेऊन ते गॅस सिलिंडरवाल्याकडे ते गेले.
तिथे तो म्हणाला, “साहेब, इथली शिश्टीम अशी आहे की इथे फक्त डीलीव्हरी होते.
नवीन नोंदणी करायला मेन शॅापला जावे लागेल.”
कर्नल साहेबांनी दुसऱ्या दिवशी दोन किलोमीटरवर असलेले ‘मेन शाॅप’ शोधून काढले.
४.
तिथे बरीच गर्दी होती.
त्यांना पुढे काय करायचे, ते समजेना.
दुकानदाराच्या स्टाफपैकी कोणीही त्यांना काय हवे, हे विचारले नाही.
शेवटी सिलिंडर उचलून नेणाऱ्या एका मजूराला त्यांनी विचारले तर तो म्हणाला, “साहेब, तुम्हांला इथली शिश्टीम माहित नाही वाटतं?”
कर्नल साहेब म्हणाले, “नाही.”
तो मजूर म्हणाला, “आत त्या टोकाला कोपऱ्यात मुलगी बसलीय ना, तिच्याकडून टोकन घ्या आणि मग त्या बाकावर बसा. तुमचा नंबर आला की ते बोलावतील तुम्हांला. टोकन नंबराने बोलावणार, तो लक्षात ठेवा.”
कर्नलसाहेबांना आदल्या दिवसाची बॅंकेतली सिस्टीम आठवली.
तिथेही असाच प्रकार होता.
टोकन घ्यायलाही रांगेत उभे रहावे लागले होते.
नंतर तें टोकन घेऊन बसून बसून कंटाळले होते.
पूर्वी सीमेवर शत्रूपक्षाच्या हालचालींवर लक्ष ठेवायसाठी अवघड जागी तळ ठोकून तास न् तास तपश्चर्या करतांना ते कधी कंटाळले नव्हते, एवढे ते बॅंकेच्या मऊ सोफ्यावर बसून कंटाळले.
एक मित्र त्यांना म्हणाला, “नशीब तुझं! लौकर गेला होतास, म्हणून बसायला मिळालं.
नाहीतर उभंच रहावं लागत.”
गॅसवाल्याच्या बाकावर ते बसले त्याला चाळीस मिनिटे झाली, तेव्हां त्यांना “नंबर नऊ” असा आवाज आला.
त्यांनी हातातला टोकन पाहिला, त्यावर बारा नंबर होता. म्हणजे अजून वीस पंचवीस मिनिटे.
५. शेवटी एका तासाने त्यांचा नंबर लागला.
काऊंटरवरच्यी मुलीने विचारलं, “नवीन अर्ज करायचाय कां? मग हा फार्म घ्या. नीट भरून आणा.”
तिनेच पुढे विचारलं, “तुमच्याकडे रेशन कार्ड आहे ना? ते आणि त्याची एक झेराॅक्स घेऊन या.” कर्नलसाहेब म्हणाले, “मी रीटायर्ड आर्मी ॲाफीसर आहे. माझ्याकडे…..”
त्यांना तोडत ती म्हणाली, “कोणीही असलांत तरी तुम्हाला रेशन कार्ड काढावचं लागेल. त्या शिवाय गॅस सिलिंडर मिळणार नाही.”
ही मागणी कर्नल साहेबांना अनपेक्षित होती.
बाजूला एक भय्या होता, तो त्यांना म्हणाला, “सब कामके लिये यह राशन कारट मांगते है. यही शिश्टीम है साब.”
कर्नल साहेबांच्या जनरल नाॅलेजप्रमाणे राशन कार्ड कधीच रद्द झाली होती.
त्यांनी चौकशी केल्यावर त्यांना कळलं की राशन कार्ड, हे राशन कार्ड म्हणू रद्द झालं होतं. म्हणजे आता धान्य तर नाहीच पण साखर, रवा ह्यांतल कांही राशनवर मिळत नव्हतं तरी रेशन कार्ड हे आतां बर्थ सर्टीफीकेट सारखं किंवा ओळखकार्डासारखं वापरलं जात होतं.
त्या कार्डावरून व्होटींग कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, इ. मिळत होती.
त्यामुळे सर्व प्रथम रेशन कार्ड काढणं फार जरूरीचं होतं.
६. दुसऱ्या दिवशी कर्नलसाहेबांनी रेशन कार्डाचं गांवाबाहेरच ॲाफीस शोधून काढलं.
ते ॲाफीस उघडायच्या आधीच पोहोचले.
ॲाफीसची वेळ लिहिली होती साडे दहाची.
पावणे अकराला एकाने कुलुप काढलं व तो धूळ झटकू लागला.
कर्नल साहेबांनी त्याला विचारलं, “रेशन ॲाफीस हेंच आहे ना?”
तो धूळ उडवत म्हणाला, “हेच आहे साहेब. आता काय पूर्वीचे दिवस राहिले नाहीत. म्हणून ही सगळी धूळ. पूर्वी कशी वट होती आपली! मला चूकवून, टोल दिल्यावाचून एक माणूस आंत जाऊ शकायचा नाही. आतां काय पण नाय!”
त्याने एक सुस्कारा सोडला व तो परत धूळ झटकू लागला.
अकरानंतर एक एक स्टाफ सदस्य उगवू लागला.
त्यापैकी एकाला कर्नल साहेबांनी स्वत:च विचारले, “मला नवीन कार्ड काढायचे आहे.” तो भला गृहस्थ होता.
तो बाजूच्या खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाला, “साहेब, बसा इथे. तुम्हाला एक फार्म भरावा लागेल व कांही कागदपत्र द्यायला लागतील. आज तो फाॅर्म घेऊन जा.”
कर्नल म्हणाले, “तो फाॅर्म कुठे मिळेल?”
तो सद्गृहस्थ हंसत म्हणाला, “इथेच. बसा तुम्ही. फाॅर्म कपाटांत आहेत आणि कपाटाच्या चाव्या साहेब आल्याशिवाय मिळत नाहीत. अशी सिस्टीम आहे.”
७.
सिस्टीमप्रमाणे साहेब जरा बाराच्या थोडे आधी आले.
कपाट उघडलं गेलं आणि एकदांचा कर्नल साहेबांना फाॅर्म मिळाला.
ज्या कार्डावर आता कांही मिळत नव्हतं, त्याचा फाॅर्म मात्र चांगला तीन पानांचा आणि बारीक अक्षरांत हिंदी, इंग्रजी आणि मराठीतून प्रश्न विचारणारा होता.
त्या प्रश्नांची उत्तरे देणे कठीण होते कारण प्रश्नच धड नव्हते.
शेवटी दुसऱ्या दिवशी सर्व लाज गुंडाळून कर्नलसाहेबांनी रेशन ॲाफीसच्या बाहेर बसणाऱ्या एकाला विचारले.
तो म्हणाला, “साहेब, मी फार्म भरून देतो. त्याचे फक्त वीस रूपये होतील पण कार्ड तुम्हाला लवकर पाहिजे असेल तर दोनशे रूपये द्यावे लागतील.”
कर्नलसाहेब म्हणाले, “दोनशे रूपये. ब्राईब!”
तो म्हणाला, “साहेब, फी समजा. ह्या गांवाबाहेरच्या ॲाफीसला खेटे घालून तुमचे रीक्षाचेच पांच सहाशे रूपये होतील. त्यापेक्षा दोनशेचा सौदा काय वाईट आहे? उद्या या आणि कार्ड घेऊन जा.” कर्नलसाहेबांना जाणवू लागलं की आपण देशाच्या सीमेवर शत्रूवर नजर ठेवून होतो पण “लाचलुचपतीचा मोठा शत्रू आंतूनच देश पोखरतोय.”
पुढल्या कांही दिवसांत हे त्यांचे मत अधिक पक्के होणार होते.
८.
रेशन कार्ड ही तर नुसती सुरूवात होती.
वीजपुरवठा कंपनी, बॅंका, गॅसवाला, दूरचित्रवाणी, वायफाय, टेलिफोन (जरी मोबाईल आले होते तरी कर्नलसाहबांना फोन प्रिय होता आणि दोन मोबाईलसाठीही शिश्टीम होतीच की), इ. प्रत्येक गरजेबरोबर एकाएका शिश्टीमबरोबर झुंझावे लागत होते.
अर्थात सर्व व्यवस्थांची सूत्रे तीच होती.
जशी, १. लवचिकता नसणे, २. पारदर्शकता नसणे, ३. दिरंगाई, ४. किचकटपणा, ५. उलटा घास घेणे, इ.
कर्नलना महिन्या दीड महिन्यात लक्षांत आलं की ह्या गतीने ह्या शहरांत आपलं बस्तान बसायला वर्ष तरी जाईल.
बंगला बांधायला आणखी किती काळ जाईल, ते कांही सांगता येत नाही.
आपण पूर्वीच आपली कांही सोय बघायला हवी होती.
कदाचित आपल्या वर्दीचा प्रभाव पडला असता.
तो त्यांना मान्यही नव्हता आणि खरं तर त्यांचा तो भ्रमही होता.
ही व्यवस्था कुठल्याच वर्दीला दाद देणारी नव्हती.
हीचा उगम कुठे होता, ती वरून खाली जात होती की खालून वर येत होती, तेंही कुणाला कळत नव्हतं पण ती होती.
एखाद्या अदृश्य नागिणीसारखी समाजाला घट्ट विळखा घालून राहिलेली.
शत्रूबरोबर लढतां येतं, त्याची माहिती काढतां येते, त्याच्या मर्मस्थळावर हल्ले करतां येतात पण ह्या व्यवस्थे बरोबर नाही.
ह्या व्यवस्थेने सर्वांना आपले गुलाम करून ठेवले होते.
९.
कर्नल साहेबांच्या सांगण्यावरून आर्कीटेक्टने कोणकोणत्या परवानग्या व कागदपत्र लागतील, त्याची यादी तयार करून कर्नल साहेबांच्या हातांत दिली.
घर बांधण्याच्या प्रक्रीयेच्या सुरूवातीला व नंतर प्रत्येक पायरीवर लागणाऱ्या परवानग्यांचीच संख्या दोन डझनांहून अधिक होती.
इतर कागद पत्रांची संख्या वेगळीच.
कर्नल ती पाहून हतबुध्द झाले.
बंगला बांधायचा निर्णय योग्य कीं अयोग्य अशी चर्चा ते पत्नीबरोबर करू लागले.
बाईसाहेबांनाही कांही सुचत नव्हतं.
सैन्यात असतांना त्या तिथल्या सर्वांना मदत करायच्या.
ते जीवनच वेगळं होतं.
तिथे अशा अडचणी नव्हत्या.
भय निर्माण करतील अशा बातम्या यायच्या, त्यांना सर्व धीराने तोंड देत.
बाईसाहेबांना आठवण झाली.
त्यांचा एक दूरचा भाचा त्याच राज्यांत पण दुसऱ्या जिल्ह्यांत रहात होता.
त्याला विचारावं की तो कांही दिवस येऊन ह्यांना कांही मदत करू शकेल कां?
त्याचा नंबर मिळवून त्या बोलल्या व फोन कर्नलसाहेबांकडे दिला.
तो म्हणाला, “काका, एका राजकीय पक्षाचे एक नेते तुमच्या शहरांत रहातात. तुम्हाला चालत असेल तर मी त्यांना बोलतो. ते राजकारणात असले तरी भ्रष्ट नाहीत. तुम्ही त्यांना तुमच्या अडचणी खुशाल सांगा.”
१०. बायकोच्या भाच्याकडून लिहून घेतलेला नंबर कर्नल साहेबांनी फिरवला.
दुसऱ्या बाजूने नम्र आवाजांत “हॅलो, मी प्रभाकर Xxxxx बोलतोय.” असं उत्तर आलं.
कर्नल साहेबांनी स्वत:ची ओळख सांगितली व भाच्याकडून नंबर मिळाल्याचे सांगितले.
प्रभाकर पुन्हा नम्र आवाजांत म्हणाले, “अस्सं कां! कर्नल साहेब, तुमची कधी भेट होऊ शकेल कां?”
कर्नल म्हणाले, “अहो, मी तुमची भेटीची वेळ ठरवायला फोन केलाय!”
प्रभाकर म्हणाले, “तुम्ही ती तसदी घेऊ नका. मला तुमचा पत्ता आणि वेळ द्या. मीच तुम्हांला येऊन भेटतो.”
कर्नलसाहेबांचा स्वत:च्या कानांवर विश्वास बसेना.
त्यांनी पत्ता दिला व दुसऱ्याच दिवशी प्रभाकर ठरल्या वेळेवर आले.
थोडे औपचारिक बोलणे झाल्यावर कर्नलसाहेबांनी आपल्या अडचणींचा पाढा वाचला व “सिस्टीम” कशी नाडत्येय ते सांगितले.
प्रभाकर गंभीर होत म्हणाले, “कर्नल साहेब, देशासाठी तळहातावर शिर घेणाऱ्याची ही स्थिती आहे तर गरीबाच्या दैनंदिन जगण्यात किती कांटे पसरत असतील त्याचा विचार करा. असं असू नये असं वाटणारे तुमच्या माझ्यासारखे अनेक आहेत आणि मी तुम्हाला म्हणून सांगतो की तें सर्व पक्षांत, सर्वत्र, खाजगी कंपन्यातही आहेत. ह्या व्यवस्थेलाच बळ देणारेही सर्व पक्षांत आहेत. ते असो. सद्य परिस्थितीत मी तुम्हाला एक मार्ग सुचवतो. माझे एक वकील मित्र आहेत. ते सगळी कामं तुम्हांला करून देतील. तें ह्या सर्व कामांच्या मोबदल्यात फी म्हणून सत्तर-पंचाहत्तर हजार रूपये फी म्हणून घेतात. त्यांत सिस्टीमला द्यायला लागणारे सर्व पैसे व त्यांची खरी फी आली, बाकी खर्च वेगळा. तुमच्यासाठी मी त्यांना त्यांची ही फी तीस हजार करायला लावीन. तुम्हांला सर्व घरबसल्या मिळेल. चालेल?”
कर्नलसाहेबांना आता व्यवस्थेच्या ताकदीची पूर्ण कल्पना आलेली असल्याने ते लागलीच ‘हो’ म्हणाले.
प्रभाकर हंसत, हंसत म्हणाले, “कर्नलसाहेब, ह्या सिस्टीममधे राहूनच ह्या सिस्टीमबरोबर मला लढायचे आहे. तेव्हा कधीतरी आमच्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून येऊन तुमचे सैन्यांतले व हवे तर व्यवस्थेबद्दलचे अनुभव सांगाल कां?”
अरविंद खानोलकर.
७.१.२०२०
गोष्ट पूर्णपणे काल्पनिक आहे. कुणालाही कांहीही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.
Leave a Reply