सर्वप्रथम इमारतींची संरचना करताना कशा कशाचा विचार करावा लागतो ते बघूया. वास्तुरचनाकार(आर्किटेक्ट) वास्तू आरेखन तयार करून स्ट्रक्चरल अभियंत्याला देतात, तेव्हा त्या इमारतीवरील संभाव्य वजनाचा प्रथम विचार केला जातो. यात भिंतींचा आकार, त्या मातीच्या विटांनी बांधणार की हलक्या विटांनी, म्हणजे त्यांचे वजन, छपराचे वजन, प्लास्टरचे वजन, फरशीचे वजन, बाह्य सजावटीचे वजन, इतर वजन, असा सर्व तपशील एकत्र केला जातो. तसेच त्या इमारतीचा वापर राहण्यासाठी आहे की इतर कशासाठी ते बघून त्यात माणसांची वावर किंवा यंत्र सामुग्रीमुळे पेलावे लागणारे वजन मोजले जाते. शाळा, रुग्णालये, औद्योगिक वसाहती इ. साठी हे वजन प्रमाणित केलेले आहे. इमारतीवरील या दोन प्रकारचे वजन धरल्यानंतर, बाह्य घटक पण विचारात घेतात. यात बाहेरील हवेचा दाब अभ्यासतात. शिवाय इमारत भूकंप-प्रवण क्षेत्रात आहे का ते पण बघतात. अति उंच इमारतींना उच्च हवेच्या दाबाचा धोका असतो. तसेच वेगवेगळी क्षेत्रेही भूकंपाला कमी अधिक प्रमाणात संवेदनशील असतात. हे सगळे घटक आरेखन करताना विचारात घेतले जातात.
स्ट्रक्चरल आरेखनासाठी भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) चे मार्गदर्शक तत्वच (कोड) अंगीकारावे लागते. प्रत्येक तत्वात (कोडमध्ये) दिलेल्या नियमाप्रमाणेच आरेखन करावे लागते. काँक्रीट, स्टील, (लोखंड), भूकंप या प्रत्येकासाठी वेगवेगळी तत्वे (कोड) आहेत. आता आपल्या शरीरात कुठला अवयव जास्ती महत्वाचा हे ठरवणे अवघड तसेच इमारतींमध्ये जास्त महत्व कशाला हे ठरवणेही अवघड तरीही, सर्वप्रथम पाया, मग खांब आणि त्यानंतर तुळया महत्वाच्या. तुळयांमधील भेगांनी तिथल्यापुरते नुकसान होते. पण खांबांना पडलेल्या भेगांनी संपूर्ण इमारत कोसळू शकते. मजबूत इमारतीसाठी उत्तम पाया घातला पाहिजे, सर्व खांब, तुळ्या, व्यवस्थित ठिकाणी पुरेशा आकाराच्या आणि ताकदीच्या पाहिजेतच, पण हे सगळे ज्या काँक्रीटने बांधले तेही उत्तम दर्जाचे व ताकदीचे हवे तरच त्या इमारतीचा दर्जा उत्कृष्ट बनेल.
Leave a Reply