आपण एखादे घर नव्याने विकत घेतो तेव्हा या संज्ञांचा आपल्याला विचार करावा लागतो. कारण या संज्ञा घराच्या क्षेत्रफळाशी निगडीत आहेत. संख्येबाबत विचार करता कार्पेट एरिया ही इतर दोन एरियांच्या तुलनेत सगळ्यात कमी असते. त्याचा खरा अर्थ असा की संपूर्ण घरातील सर्व खोल्यांच्या (हो, संडास, बाथरूम धरून) सगळया भितीना चिकटेल (वॉल टू वॉल) अशी सतरंजी (कार्पेट) अंथरली तर तिचे जे क्षेत्रफळ भरेल ते म्हणजे एकाद्या घराचा कार्पेट एरिया. घराच्या भिंती वजा करून मोजलेला एरिया.
बिल्टअप एरिया म्हणजे आपल्या घराच्या प्रत्यक्ष बांधकामाचे क्षेत्रफळ. या क्षेत्रफळात भितींनी व्यापलेला भागही लक्षात घेतला जातो. सदनिकेच्या बाहेरून मोजमाप केले असता मिळणारे क्षेत्रफळ म्हणजे बिल्टअप एरिया.
सुपर बिल्टअप एरिया ही आभासी संकल्पना आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात नाही पण गि-हाइकांकडून जास्त पैसे मिळवण्यासाठी विकासकांनी तयार केलेली व्यापारी संकल्पना आहे. सुपर बिल्टअप एरिया मोजताना सदनिकेच्या बिल्टअप एरियात सामायिक व्हरांडे, जिने, लिफ्टची जागा, क्लब हाऊस, गच्ची, जॉगिंग पार्क, बगीचे, स्विमिंग पूल, जिम्नॅशियम या सर्वांचे क्षेत्रफळ लक्षात घेऊन ते प्रत्येक सदनिकेवर वाटून दिलेले असते. एखादे गिऱ्हाईक घराचा भाव विचारायला जाते तेव्हा तो सुपर बिल्टअपचा विचार करुन सांगितला जातो. पण ग्राहकाला प्रत्यक्षात कार्पेट एरियाच वापरायला मिळतो. बाकीच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. तुम्ही वापरा वा न वापरा. पण त्याचा भाव आणि नंतर त्याच्या देखभालीचा खर्च प्रत्येक सदनिका मालकाला दरमहा द्यावा लागतो. बांधकामाचे नकाशे तयार करताना बिल्टअप एरिया विचारात घेतली जाते. मालमत्ता कर मात्र नगरपालिका कार्पेट एरियावर आकारते. सर्वसाधारणपणे बिल्टअप एरिया हा कार्पेट एरियाच्या १५ ते २० टक्के जास्त असतो. तर सुपर बिल्टअप एरिया कार्पेट एरियाच्या ३५ ते ५० टक्के जास्त असतो. ग्राहकांच्या हितासाठी शासनाने खरेदी खतामध्ये कार्पेट एरियाचा उल्लेख अनिवार्य केला आहे.
Leave a Reply