लाकूड हे कपाटे, दरवाजे, पार्टिशन व इतर फर्निचर यासाठी वापरतात.
१) लाकूड हा निसर्गात आढळणारा एक पदार्थ आहे. हा पदार्थ झाडापासून मिळतो. झाडांच्या फांद्या व खोड यांपासून मिळणारे लाकूड हे आदिमानवापासून आजतागायत वापरले जात आहे. झाडाच्या फांद्या, काटक्या यांचा उपयोग अग्नी निर्माण करण्यासाठी केला जात असे. पुढे वृक्षाच्या खोडापासून छोटे बुंधे बनवले जाऊ लागले. नंतर दगडाच्या व लोखंडाच्या हत्यारांनी त्याचे तुकडे करण्याचा शोध लागला. संशोधक वृत्तीच्या माणसाने करवतीसारखी हत्यारे बनवून खोडापासून चौकोनी फळ्या, भाल, खांब, तुळ्या वापरून घरांचे सांगाडे, खुर्च्या, टेबल, स्टूल, खिडक्या-दरवाजे, कपाटे इत्यादी वस्तू बनविण्याची कला शोधून काढली.
२) लाकूड कापताना लाकडाचा बराच भुसा निघत असे. तसेच लाकूड गुळगुळीत करण्यासाठी रंधा मारताना लाकडाची सालपटे किंवा ढलप्या निघत असत. पूर्वी याचा इंधन म्हणून वापर करण्यात येई. अजूनही खेड्यात किंवा आदिवासी लोकांत हे इंधन म्हणून वापरतात. पुढे असे लक्षात आले की हालाकडाचा दुरुपयोग आहे. म्हणून हा भुसा, ढलप्या, तुकडे इत्यादींपासून प्लायवूड बनवण्याचा शोध लागला. ज्याप्रमाणे कागद बनवण्यासाठी चिंध्या, भुसा, कागदाचे कपटे यांचा लगदा बनवून कागद तयार करतात त्याप्रमाणे लाकडाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून ३ ते ४ मिमी. जाडीचे स्तर म्हणजे प्लाय बनवले जातात. त्यासाठी प्रेस मशीन वापरले जाते. नंतर ६, ८, १० मिलिमीटरपासून २५ मिमीच्या जाडीपर्यंत हे थर एकावर एक ठेवून एक प्रकारच्या चिकट रेझिनने ते चिकटवून मशीनखाली दाबले जातात आणि पाहिजे त्या जाडीचे म्हणजे १ मीटर रुंद आणि २ मीटर लांब, १.२५ मीटर रुंद आणि २.५ मीटर लांब इत्यादी आकाराचे बोर्ड तयार केले जातात. यामुळे फळ्या कापून, रंधा मारून त्या वापरण्याऐवजी प्लायवूडचे बोर्ड वापरून विविध फर्निचर, दरवाजे, टेबल टॉप इत्यादी बनविणे शक्य झाले. त्यावर रंगकाम करणे किंवा पॉलिश करणेही शक्य झाले. त्यामुळे काही प्रमाणात वृक्षतोडही कमी झाली.
Leave a Reply