पाया चांगला असला की इमारत चांगलीच होणार. कुठल्याही गोष्टीत पायाला फार महत्व आहे, मग ते आपले जीवन असो की इमारत. चांगल्या संस्कारांच्या पायावर जसे समृध्द जीवन जगता येते, तसेच भक्कम पायाच्या आधारे इमारती पण टिकून राहू शकतात.
जर लोड बेअरिंग इमारत असेल तर जमिनीत थोडं खोल खणून पाया घातला जातो. पण मोठ्या आर सी सी इमारतींना तीन प्रकारे पाया घातला जाऊ शकतो. आयसोलेटेड फुटिंग, राफ्ट, पाईल फाऊंडेशन, पाया कुठल्या प्रकारे घालायचा हे इमारतीचे वजन व जमिनीची वजन पेलण्याची क्षमता यावरून ठरते. आयसोलेटेड फुटिंगमध्ये जरा खोल खड्डा खणतात. मग त्यात बेस तयार करतात. त्या आधारे इमारत तयार होते. जेव्हढी इमारत उंच, तेवढाच त्याचा पाया अधिक मजबूत आणि जमिनीखाली जास्त खोल न्यावा लागतो. बहुतेक उंच इमारतींना जमिनीखाली तळघरांची व्यवस्था असते. त्याचा उपयोग वाहनतळ आणि इतर सर्व्हिसेससाठी करण्यात येतो. तळघराच्या खाली जर दगड अथवा खडक असेल तर इमारतीचे वजन लक्षात घेवून, एक काँक्रीटची मोठी स्लॅब घालतात. हाच राफ्ट. त्याची उंची दीड ते तीन मीटर पर्यंत असू शकते.
जर जमीन बऱ्याच खोलपर्यंत भुसभुशीत असेल तर पाईल पाऊंडेशनचा पर्याय वापरला जातो. यात पाईल रिगच्या सहाय्याने जमिनीत वर्तुळाकार भोकं केली जातात. हे खड्डे बरेच खोल असतात, साधारण दगड लागेपर्यंत ते खोल असतात. मग त्यातील माती पूर्णपणे काढून, तो खड्डा साफ केला जातो. एक लोखंडी सळ्यांचा पिंजरा तयार करून तो आत सोडला जातो. मग त्यात काँक्रीट ओतले जाते. अशा तऱ्हेने पाईल तयार होतात. अशा प्रकारे इमारतीचे वजन या पाईल मार्फत मजबूत अशा, भूगर्भातील खडकापर्यंत नेले जाते. यात पाईलची खोली सात मीटरपासून चाळीस मीटरपर्यंत असू शकते. मुंबईतील अनेक गगनचुंबी इमारती पाईल फाऊंडेशनवरच उभ्या आहेत.
Leave a Reply