पावसाळयात मान्सूनचे वारे हिंदी महासागरावरून म्हणजे नैऋत्य दिशेने वाहतात. मैदान मोकळे असेल तरच हे विधान सत्य आहे. पण मध्ये वारा, नदीच्या पाण्याचा प्रवाह, इमारती, डोंगर वगैरेचा अडथळा आला तर मान्सूनचे वारे अडथळ्याच्या दोन्ही बाजूने वक्राकार गतीने वाहू लागतात. उदाहरणार्थ, एखाद्या ओढ्याच्या प्रवाहात मोठे धोंडे असले तर पाणी त्या धोंड्यांच्या दोन्ही बाजूने वक्राकार वाहते. मान्सूनचे वारे शहरातील इमारतींच्या गर्दीत शिरले की त्यांची दिशा प्रत्येक इमारतीच्या अडथळ्याच्या भोवतालून त्यांची मूळ दिशा बदलत बदलत वाहत राहतात. थोडक्यात वस्तीमध्ये वारे कोणत्याही दिशेने वाहतात. म्हणून मान्सूनचे वारे पूर्व आणि उत्तरेच्या खिडक्यातूनही घरात शिरतात आणि त्याचवेळी मुसळधार पाऊस पडत असेल तर पावसाचे पाणी घरात शिरते.
नवीन इमारतीमध्ये प्रथम बाहेरील प्लॅस्टर एकजीव दिसते. कालांतराने त्यात अनेक ठिकाणी बारीक मोठया भेगा दिसू लागतात. याचे कारण उन्हाळ्यात प्लॅस्टर उष्णतेने प्रसरण पावते आणि थंडीत ते आकुंचन पावते. दोन-तीन वर्षात या भेगा रूंदावतात व दिसू लागण्याइतपत मोठ्या होतात. बाहेरील योग्य रंगाने या भेगा काही काळ दडलेल्या दिसतात. पण काँक्रिट आणि वीटकाम यांचा जेथे सांधा तयार होतो, तेथे या दोन भिन्न पदार्थांच्या प्रसरणातील फरकामुळे फटी पडतात.
याशिवाय वादळी वाऱ्यांच्या दाबाखाली किंवा भूकंपाचे वेळी कॉलम आणि बीममध्ये कंपनेही निर्माण होऊन त्यामुळे त्यांच्यात सूक्ष्म हालचाली निर्माण होतात. यामुळे वीटकाम आणि काँक्रिट यामधील भेगा अधिक स्पष्टपणे लांबूनसुद्धा दिसू लागतात व यातून पाणी झिरपून घरात येते. या भेगा पडू नयेत म्हणून म्हणून वीटकाम व काँक्रिट यांच्यावर प्लॅस्टर करण्यापूर्वी चिकन मेश म्हणजे चौकोनी विणीची जाळी बसवली जाते. १५ ते २२ सें.मी.चा भाग विटेवर व तेवढाच भाग काँक्रिटवर लावला तर त्या ठिकाणी येणारा ताण जाळीवर येतो आणि भेगा पडण्यास प्रतिबंध होतो. साहजिकच तेथून पाणी भिंतीत मुरत नाही.
Leave a Reply