वरवर पाहता मिग विमानांचे अपघात जास्त वाटले तरी दर दहा हजार तासांच्या उड्डाणांच्या हिशेबात जगातील अनेक प्रगत वायुदलातील अपघातांपेक्षा हे प्रमाण कमी आहे.
म्हणजे भारतातील व्यावसायिक वैमानिकच काय पण शिकाऊ वैमानिकही इतर देशांच्या तुलनेत अधिक कसबी आहेत. पण तरीही अपघात हा अपघातच आणि तो वाईटच. म्हणून तो पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी आणि त्यातून काही शिकायला हवे.
विमाने उच्च तंत्रज्ञानाचा वापर करुन बनवलेली असतात. त्यावर अनेक प्रक्रिया होतात, अनेक उड्डाण चांचण्या होतात. उड्डाणाची विश्वसनीयता आणि देखभाल-क्षमता कसोशिने तपासली जाते. त्याप्रमाणे त्याच्या देखभालीचे वेळापत्रक तयार केले जाते. त्याचे उत्तम प्रशिक्षण वैमानिक आणि तंत्रज्ञांना दिले जाते. त्यांचे प्राविण्य आणि नैपुण्य सूक्ष्म दृष्टिने तपासून मगच त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतरच त्यांची नेमणूक विशिष्ट विमानांसाठी होते. मिग विमान हे त्यातलेच एक.
वैमानिक आणि तंत्रज्ञांची मानसिकताही बारकाईने तपासली जाते. वायुदल अकादमी, हकीमपेठ येथे जेट विमानावर प्रशिक्षण घेतल्यावर नुकत्याच कमिशन मिळालेल्या वैमानिकांची स्क्वाड्रनला बदली होते. ही बदली म्हणजे कमी वेगाच्या विमानातून जास्त वेगाच्या विमानावर झालेली बदली असते. हे एका परीने स्वाभाविक असले तरी त्यासाठी लागणारे नैपुण्य आणि मानसिकता तयार झालेली नसते.
१९८३ सालापासून प्रगत जेट प्रशिक्षणाची मागणी वायुदलात होत होती. त्यामुळे इस्का आणि मिग-२१ विमानातील तफावत भरुन निघाली असती. परंतु ही मागणी तेव्हा पुरी झाली नाही. २००६-०७ साली ब्रिटिश हॉक विमाने भरती झाल्यावर मिग विमानांच्या अपघातात एकदम घट झाली. त्यावेळी प्रशिक्षणातील त्रुटी ध्यानात आली.
प्रत्येक विमानाला एक तांत्रिक आयुष्य असते. कोणतेही विमान त्यापेक्षा जास्त वापरले जात नाही. जर ते अधिक काळ वापरायचे असेल तर अत्यंत कसोशीने तपासण्या केल्या जातात. असा काळ वाढवताना देखभालीसाठी लागणारे सुटे भाग उपलब्ध आहेत का हे सुद्धा पाहिले जाते.
– डॉ. अविनाश वळवडे, पुणे
मराठी विज्ञान परिषदेच्या कुतुहल या सदरातून साभार
Leave a Reply