२ सप्टेंबर १९६९ साली आशिया खंडामध्ये नारळ विकासासाठी एशियन अँड पॅसिफिक कोकोनट ही संघटना निर्माण करण्यात आली. या संघटनेचा भारत हा संस्थापक देश आहे. जकार्ता, इंडोनेशिया येथे मुख्यालय असलेल्या एशियन अँड पॅसिफिक कोकोन (APCC) यांच्याद्वारे दरवर्षी २ सप्टेंबर ही तारीख जागतिक नारळ दिवस म्हणून जगभर नारळ उत्पादक देशांमध्ये साजरा केला जातो.
भारत हा जगातील नारळ उत्पादनात एक अग्रगण्य देश आहे. जगात नारळ उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. भारतात १९.८ लाख हेक्टर क्षेत्रात २०४४ कोटी नारळाचे वार्षिक उत्पादन घेतले जाते. देशाच्या GDP मध्ये नारळाचे रु. २०,००० कोटी चे योगदान आहे. २०१५-१६ मध्ये, देशामधून १४५० कोटी रुपयांचे नारळाची उत्पादने निर्यात करण्यात आली. भारतात जवळपास एक कोटी लोक त्यांच्या उपजीविकेसाठी नारळ पीकावर अवलंबून आहेत.
नारळ क्षेत्रासाठी ‘फ्रेंड ऑफ कोकोनट ट्री’ आणि ‘नीरा तंत्रज्ञ प्रशिक्षण कार्यक्रम’ ही कौशल्य विकास कार्यक्रमे राष्ट्रीय नारळ बोर्ड (NCB) कडून राबविण्यात येत आहे. योजनेच्या अंतर्गत, नारळ झाडावर चढण्याचे प्रशिक्षण आणि झाडांचे संरक्षण करण्याचे काम बघण्याकरिता ५,२०० बेरोजगार युवकांना आणि २८०० नीरा तंत्रज्ञ ला प्रशिक्षण दिलेले आहे. कोकणात ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर नारळाचे उत्पादन घेतल जाते. यातून उत्पादित होणाऱ्या ९० टक्के पीक हे नारळ आणि शहाळी म्हणून वापरली जातात.
नारळाला कल्पवृक्ष असे संबोधले जाते. कारण नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागापासून उपयुक्त वस्तुंची निर्मिती होऊ शकते. पण कल्पवृक्षाची संकल्पना कालबाह्य़ होत चालली आहे. शहाळी आणि नारळ विक्रीपलीकडे या पिकाचा फारसा वापर होताना दिसत नाही. शहाळ्याची तसेच नारळाची चोड ही फेकून दिली जातात. नारळाच्या इतर भागांचा वापर करून वस्तुंची निर्मिती करण्याचे प्रमाण नगण्य आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोकणात नारळावर प्रक्रीया करणारा एकही मोठा उद्योग कोकणात सुरु होऊ शकलेला नाही नारळावर प्रक्रीया करून विविध प्रकारची उत्पादन घेतली जाऊ शकतात. प्रक्रीया करून टाकून देण्यात येणारया करवंटी आणि चोडांपासून दागिने, शर्टाची बटने, शोभेच्या वस्तू, चुल आणि तंदूरमध्ये जाळण्यासाठी जाळण्यासाठी कोकोनट चारकोलच्या वडय़ा तयार केल्या जाऊ शकतात. नर्सरी आणि गार्डिनग उद्योगासाठी कोकपिठ तयार केले जाऊ शकते. जे मातीतील ओलावा टिकवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. शहाळ्यातील नारळावर प्रक्रीया करून उच्च प्रतीचे तेल तयार केले जाऊ शकते. या तेलाला सौंदर्यप्रसाधन उद्योगात मोठी मागणी असते.
नारळाचे फायदे.
नारळाच्या पाण्यात कमी प्रमाणात फॅट असतात. यातील पोषक घटकामुळे तुमच्या भूकेवर नियंत्रण राहते. त्यामुळे तुमचे जेवण नियंत्रित राहते.
त्वजा उजळण्यासाठी नारळ पाणी खूप फायदेशीर आहे. कोणत्याही औषधापेक्षा ते कमी नाही. चेहऱ्यावरील डाग घालविण्यासाठी हे पाणी काम करते. नारळपाणी त्वचेला हायड्रेटेड आणि मॉश्चराईज्ड करते. नारळ पाणी शरीरात नविन ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते. जर तुमचे डोके दुखत असेल तर नारळ पाणी प्या.
तुमची पचनाबाबत तक्रार असेल तर नारळ पाणी पिण्यानंतर दूर होते. नारळ पाण्यापासून शरीराला पोषक घटक मिळतात. तसेच काही अनावश्यक घटक रोखण्यास पाणी मदत करते.
बाजारात मोठ्या प्रमाणात पाण्याची विक्री होते. या पाण्यापेक्षा १०० टक्के नारळ पाणी केव्हाही चांगले. नारळ पाण्यात शरीराला आवश्यक असणारी पोषक घटक भरपूर असतात. यात कॅल्शिअम, मॅग्नशिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, सोडिअम यांची मात्रा सर्वाधिक आहेत.
काही पदार्थ नारळाचे.
शहाळ्याचे सरबत
साहित्य. एका शहाळ्याचे पाणी, २ बाटल्या सिट्रा, साखर, मीठ, लिंबाचा रस, बर्फाचा चुरा
कृती. शहाळ्याचे पाणी, २-३ चमचे लिंबाचा रस, चवीप्रमाणे साखर, मीठ व बर्फ घालून हे सर्व मिक्सरमधून फिरवून घ्यावे. प्यायला देताना या मिश्रणात सिट्रा घालून द्यावे.
नारळाचे लाडू.
साहित्य. ३ कप खवलेला ओला नारळ, १ १/२ कप साखर, १ १/२ कप दूध, १ लहान चमचा वेलचीपूड, २ मोठे चमचे बदामाचे काप, १ मोठा चमचा तूप, केशर आवडीप्रमाणे, काळे बेदाणे सजावटीसाठी
कृती. एका पातेल्यात खवलेला ओला नारळ, साखर आणि दूध एकत्र करा. हे मिश्रण मध्यम आचेवर ठेवून परता. पातेल्याच्या तळाला नारळ (मिश्रण) चिकटू नये म्हणून ढवळत राहा. मिश्रण दूध आटेपर्यंत परता. मिश्रण एकजीव झाल्यावर वेलचीपूड आणि बदामाचे काप आणि केशर घाला. मिश्रण घट्टसर होत आलं कि गॅस बंद करा आणि पातेलं गॅसवरून उतरवा. मिश्रण थोडे कोमटसर होऊ द्या. थोडासा तूपाचा हात घेऊन लाडू वळा. लाडू वळून झाल्यावर त्यावर बेदाणे लावा.
नारळाची खीर.
साहित्य. १ नारळ, १ लीटर फुल क्रीम दूध,१/२ वाटी साखर, केसर (दुधात भिजवलेले), बदाम, पिस्ता, वेलची पावडर, १ चमचा साजूक तूप.
कृती. नारळ फोडून पाणी काढून घ्या. नारळ किसून वेगळं ठेवा. दूध आटवून घ्या. एका कढईत साजूक तूप गरम करून नारळाचा किस भाजून घ्या. आटवलेल्या दुधात टाकून उकळी घ्या. साखर टाकून उकळी घ्या. ड्राय फ्रूट्स, केसर, वेलची टाकून गॅस बंद करा. आवडीप्रमाणे गरम किंवा गार सर्व्ह करा.
ओल्या नारळाची करंजी.
करंजीची पारी करायचे साहित्य. २ कप मैदा, २ मोठे चमचे पिठीसाखर, ५ मोठे चमचे फ्रिजमधील थंड साजूक तूप, एक चिमूट मीठ, २-३ मोठे चमचे फ्रिजमधील थंड पाणी, २ मोठे चमचे वितळलेले तूप (करंजीवर लावण्यासाठी).
करंजीच्या सारणासाठी लागणारे साहित्य. २ कप खोवलेला ओला नारळ, ४ मोठे चमचे कंडेन्स्ड मिल्क, २ मोठे चमचे पिठीसाखर, ३ मोठे चमचे पिस्त्याची भरड, १/४ लहान चमचा वेलदोडय़ाची पूड, एक चिमूट केशर.
कृती. प्रथम सारण करण्यासाठी नारळ, कंडेन्स्ड मिल्क, पिठीसाखर, पिस्त्याची भरड, वेलदोडय़ाची पूड आणि केशर काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भांडय़ात एकत्र करावे. मायक्रोवेव्हमध्ये एक मिनिटभर शिजवावे. नंतर बाहेर काढून एकजीव करावे व पुन्हा तीस सेकं द मायक्रोवेव्हमध्ये ठेवावे. शिजल्यावर सारण एकजीव झाले पाहिजे; फार ओलसर वाटल्यास आणखीन तीन सेकंद शिजवावे. मग गार करण्यास बाजूला ठेवावे. पारी करायला मैदा, तूप, पिठीसाखर आणि मीठ एकत्रित मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमध्ये ठेवून ‘पल्स’ करावे (क्षणभर फिरवावे.) असे केल्यास मिश्रण पावाच्या चुऱ्यासारखे दिसू लागेल.
आता त्यात एक-एक करून २-३ मोठे चमचे अगदी थंडगार पाणी घालून पुन्हा पल्स करावे. मिश्रण जरा एकत्र येऊ लागेल. दिसायला कोरडे दिसले तरी त्यात आणखी पाणी घालू नये. लाटताना पीठ एकत्र येईल. अर्धवट एकत्र आलेले पीठ क्लिंग फिल्म किंवा प्लास्टिकमध्ये घट्ट बांधून, थोडे चपटे करून फ्रिजमध्ये २०-२५ मिनिटे ठेवावे. मग त्याचे लिंबाएवढे भाग करून प्रत्येक भाग प्लास्टिकच्या दोन कागदांमध्ये लाटावा. त्याच्या मधोमध दोन लहान चमचे सारण ठेवावे आणि कागदाच्या आधाराने पारी दुमडावी. कडा दाबून कातण्याने कापावे. अशा सगळ्या करंज्या करून घ्याव्यात. बेकिंग ट्रेवर तूप लावावे किंवा बटरपेपर लावावा. त्यावर करंज्या ठेवाव्यात. ओव्हनमध्ये १७५ डिग्री तापमानावर करंज्या १५-२० मिनिटे भाजाव्यात. मग त्या बाहेर काढून त्यावर वितळलेले तूप लावावे आणि पुन्हा ५-१० मिनिटे करंज्या भाजाव्यात. तयार झाल्यावर त्यांचा रंग गुलाबी होतो आणि करंज्या खुसखुशीत होतात.
नारळाची बर्फी.
साहित्य. नारळ खवलेला दोन वाटी, दूध दोन वाटी, साखर एक ते दीड वाटी, मिल्क पावडर दोन छोटे पॅकेट.
कृती. नारळ खवलेला, दूध, साखर सर्व कढईत एकत्र करून आटवा. आटत आले की दोन छोटी पाकिटं मिल्क पावडर घाला. व तूप लावलेल्या थाळीत सेट करून बर्फीचा आकार द्या.
नारळाचे पराठे.
साहित्य. एक वाटी नारळाचा चव ,एक वाटी कणीक, एक वाटी मैदा, तेल आणि तूप, ३-४ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडं जिरं यांचं वाटण,एक चमचा साखर, चवीनुसार मीठ.
कृती. नारळाचा चव नारळाच्याच पाण्यांत बारीक वाटून घ्यावा. एका परातीत मैदा आणि कणीक एकत्र करून त्यात हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडं जिरं यांचं वाटण, मीठ व साखर घालून दहा मिनिटं घट्ट भिजवून मुरत ठेवावं. पिठाचा मोठया लिंबाएवढा गोळा घेऊन पोळपाटावर प्लास्टिक पेपर घालून त्यावर छोटे पराठे लाटावे आणि तूप सोडून नॉनस्टिक तव्यावर दोन्ही बाजूंनी खमंग भजावे.
नारळाची चटणी.
साहित्य. १ नारळ किसून घेतलेला, १ वाटी दही ( दही जास्त आंबट नको ) ४ ते ५ हिरवी मिरची, फोडणीसाठी जिरे मोहरी, कढीपत्ता, तेल व चवीप्रमाणे मीठ.
कृती. किसलेला ओला नारळ एका भांड्यात घेऊन त्यामध्ये व थोडे मीठ मिक्स करावे. नंतर फोडणीसाठी गॅस चालू करून पातेल्यात तेल घालून तेल गरम झाल्यावर जिरेमोहरी तडतडल्यावर बारीक चिरलेली हिरवी मिरचीचे तुकडे टाका व कढीपत्ता टाका मिरची व गॅस बंद करून तयार झालेली फोडणी नारळाच्या मिश्रणात टाका. नारळाची चटणी तयार.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply