दरवर्षी जागतिक हॅम रेडिओ दिवस १८ एप्रिलला जगभर साजरा केला जातो.
‘हॅम’ म्हणजे काय?
“हॅम” हे व्यक्तिगत “हौशी रेडिओ स्टेशन’ असून, त्यासाठी दूरसंचार विभागाची मान्यता घ्यावी लागते. १४ वर्षांवरील कोणालाही याचे प्राथमिक ज्ञान घेऊन परीक्षा देता येते. त्यात उत्तीर्ण झाल्यावर तो “हॅम’ होऊ शकतो. हॅम यंत्रणा, टेलिफोन यंत्रणेसारखी वाटते. पण हया दोन्हीत एक मोठा मूलभूत फरक आहे. सर्व टेलिफोन हे एकमेकांना तारांच्या द्वारे जोडलेले असतात, पण हॅम यंत्रणा मात्र रेडियो लहरींवर चालते व त्याला म्हणतात बिनतारी संदेश यंत्रणा आणि यावर आधारीत आहे हॅमचा रोमांचकारी छंद. तुम्हाला माहीतच आहे की, मार्कोनीने रेडियोचा शोध लावला. पुढे हर्टज्, आर्मस्ट्राँग आणि मार्कोनी हया तिघांनी मिळून, विद्युत चुंबकीय लहरींद्वारे संदेश पाठविण्याचा शोध लावला. त्यामुळे हया तिन्ही शास्त्रज्ञांच्या अद्याक्षरांवरून HAM हॅम हा शब्द अस्तित्त्वात आला.
१९०१ मध्ये पहिला बिनतारी संदेश इंग्लंडहून न्यू फाऊंडलंडला पाठविला आणि मार्कोनीपासून स्फूर्ती घेऊन अनेक रेडिओ प्रक्षेपण केंद्रे उभी राहिली. मात्र त्यावर सरकारी नियंत्रण आले. काही ठराविक लघुलहरींचा वापर करून, संदेश पाठविण्याच्या कल्पनेतून हौशी रेडिओ केंद्रांची निर्मिती झाली. हा हौशी रेडिओ म्हणजेच ‘हॅम रेडिओ’ आणि त्याचा वापर करणारे हौशी कलाकार म्हणजेच ‘हॅम्स’. आवड, जिज्ञासा आणि कुतूहलापोटी जगातील निरनिराळया देशातील लोकांशी बोलता यावे, मैत्री करता यावी या रोमांचकारी कल्पनेतून हॅमचा छंद सुरू झाला. तिकीटे जमविणे, नाणी जमविणे तसे एकमेकांशी संभाषण करून माहिती मिळविणे व एकमेकांना मदत करणे, हे या छंदाचे उद्दिष्ट आहे. “हॅम’वरून पाठवलेला संदेश पृथ्वीभोवतालच्या वातावरणाला तटून परत फिरतो आणि त्या कक्षेतील अन्य “हॅम’ला जाऊन मिळतो.
भारतातील एखाद्या व्यक्तीने देशातच आणीबाणीच्या प्रसंगी पाठवलेला संदेश वातावरणातील त्या वेळच्या स्थितीमुळे कदाचित मिळणार नाही; पण अनुकूल वातावरण असलेल्या कोणत्याही ठिकाणच्या “हॅम’वर तो जाऊन पोचतोच. अतिशय तातडीचा किंवा आणीबाणीचा प्रसंग असेल, तर ज्याला संदेश मिळाला तो अन्य मार्गाने मदत पोचवण्याचा प्रयत्न करतो. दुर्घटना किंवा आपत्कालीन परिस्थितीत संदेशवहनासाठी हॅम रेडिओ हे एक प्रभावी माध्यम आहे. “इसरोसह अवकाश मोहिमा, सैन्यदल यांना अशा संदेशवहनाची मोठी मदत होते. अमेरिका आणि युरोपीय देशांत याचा मोठा वापर होतो. हॅम रेडिओमुळे जगातील कोणाशीही मोफत संवाद साधणे शक्य होते. आज जपानमध्ये सर्वाधिक १५ लाखाच्या वर त्याखालोखाल अमेरिका ७ लाख ४० हजार, जर्मनीत ७८ हजार असे हॅम रेडिओ आहेत. भारतामध्ये परवानाधारक हॅम केवळ अंदाजे १८ हजार इतकेच आहेत. त्यातही नियमित सुरु असणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. राजीव गांधी, सोनिया गांधी, अमिताभ बच्चन, श्रीकांत जिचकार यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मंडळी हॅम रेडिओ वापरत असतात. हॅम रेडिओच्या
अधिक माहिती साठी पुण्यातील श्रीपाद रेडीओचे श्रीपाद कुलकर्णी (फोन 8208603771) यांच्याशी संपर्क साधावा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
छायाचित्र सौजन्य: National Museum of Industrial History
पुणे.
Leave a Reply