संग्रह म्हटलं की छंद, सामान्य व्यक्ती एखाद्या गोष्टीकडे सीमित दृष्टीकोनातून पाहते पण त्याच गोष्टीकडे छंदवेडी व्यक्ती कल्पकतेने पाहते. छंद आयुष्यात उर्जा निर्माण करतो,असे मानणाऱ्या आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात कोणतातरी छंद बाळगायला हवा असे म्हणणारे आमचे मित्र धनंजय बदामीकर यांचा विंटेज कार चा छंद.
‘विंटेज कार’ बाळगणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. याचा अर्थ ही हौस केवळ श्रीमंत माणसांचीच आहे, असेही नाही. मुख्य म्हणजे त्यासाठी गाडीवर प्रेम असावे लागते. ही गाडीसुद्धा इतर गाडय़ांसारखी धातूपासूनच तयार झालेली असते. असे असले तरी हिचा सांभाळ करताना धसमुसळेपणा करून चालत नाही. तिला तळहातावरील फोडाप्रमाणे जपावे लागते. ती आहे तशीच रहावी यासाठी हरप्रकारे प्रयत्न करावे लागतात. एकीकडे अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या कितीही गाडय़ा बाळगल्या तरी ही गाडी अनमोल असते. इतर गाडय़ांच्या बाबतीत आपण कितीही ‘रफ अॅंण्ड टफ’ वागत असलो तरी व्हिन्टेज गाडय़ांच्या बाबतीत मात्र ‘हँडल वुइथ केअर’ या धोरणाचा अवलंब करावा लागतो.
पुण्यातील आमचे मित्र धनंजय बदामीकर असाच विंटेज कारचा छंद बाळगून आहेत. धनंजय बदामीकर यांच्या कलेक्शन मध्ये अनेक विंटेज कार आहेत. त्यांच्या विंटेज कार्स अगदी कालच खरेदी केल्यासारख्या दिसतात. गेली सोळा वर्षे ते विंटेज कार छंद बाळगुन आहेत.
त्यांच्या कलेक्शन जर्मन कार मध्ये, व्हॉक्स वॅगन टेम्पो, ओपेल, बीटल, मायक्रो बस, जेट्टा, अमेरिकन कार मध्ये,फोर्ड, डीसेटो, ब्यूक, शेवरलेट फ्रेंच कार मध्ये सिट्रोन, एच व्हॅन, भारतीय कार मध्ये हिंदुस्थान, लॅडमास्टर, फियाट अशा मिळून जवळ जवळ ७० ते ७५ व्हिन्टेज कार आहेत.
धनंजय बदामीकर नेहमी म्हणतात, ‘व्हिन्टेज कार’ बाळगायची असेल तर गाडीवर जीव असावा लागतो. व्हिन्टेज कारची निगा कशी राखावी, यावर धनंजय बदामीकर म्हणतात मुळात म्हणजे ही नेहमीसारखी गाडी नाही. या गाडय़ांना पॉवर स्टेअरिंग नसते, ब्रेकसुद्धा मेकॅनिकल असतात. त्यामुळे चालवताना ती सांभाळून चालवावी लागते. त्याचप्रमाणे आठवडय़ातून किमान २० ते २५ किलोमीटर चालवली पाहिजे. तसे नाही केले तर ब्रेक ‘जाम’ होऊ शकतील, टायरची समस्या उभी राहू शकेल. सहा महिन्यांतून एकदा तरी या गाडीचा ‘चेक अप’ करायला हवा. अशा गाडय़ांचे सुटे भाग सहजासहजी मिळत नाहीत. मुंबईतील ऑपेरा हाउस किंवा चोर बाजार या ठिकाणी गाडय़ांचे सुटे भाग काही वेळा मिळतात. तसे नसेल तर मात्र ते तयार करावे लागतात. त्यासाठी तशी जाणकार व्यक्ती असली पाहिजे. म्हणूनच अनेक व्हिन्टेज कारमालक सुटे भाग जमवून ठेवतात. म्हणजे एखाद्या बाजारात जुन्या प्रकारचे गिअर्स दिसले, इंजिन दिसले तर गरज नसूनही ‘व्हिन्टेज कार’चा मालक ते भाग घेऊन ठेवतो. यांची मूळ किंमत शंभर रुपये असली तरी विकत घेताना अशा भागांसाठी कदाचित पंधराशे रुपयेही मोजावे लागू शकतात. आम्ही धनंजय बदामीकर यांच्या बरोबर मुंबईतील ऑपेरा हाउस, चोर बाजार या ठिकाणी गाडय़ांचे सुटे भाग खरेदी करण्यास कित्येक वेळा गेलो आहोत. धनंजय बदामीकर यांच्या गाड्या प्रदर्शनासाठी नेल्या जातात, तेव्हा त्यांना खूप काळजी घ्यावी लागते. तिच्या बाजूला सुरक्षारक्षक उभा करावा लागतो. कारण पाहणारा पटकन दार उघडतो किंवा कुठेही हात लावतो. तसे करताना चुकून हँडलला काही झाले, किंवा आरसा वाकला किंवा काहीही झाले तरी त्याची डागडुजी करण्याचा खर्च खूप असू शकतो किंवा तुटलेला सुटा भाग परत मिळेलच असे नाही.
साडे माडे तीन, दुनियादारी, बालगंधर्व, अक्षय कुमारचा रुस्तम, अशा अनेक चित्रपटात धनंजय बदामीकर यांच्या विंटेज कार आपण बघीतल्या असतीलच.
धनंजय बदामीकर यांच्या विंटेज कार रस्त्यावरून जाताना ‘वो गाडी देख’ अशा प्रकारचे संवाद कानी पडतात तेव्हा त्याला तोड नसते. केवळ बुजुर्गच नव्हे तर लहान मुलेही वळून वळून या गाडीकडे पाहतात. सिग्नलला थांबल्यावर कोणी गाडीची चौकशी करतो, कोणी नुसताच ‘थम्स अप’ करून दाखवतो, तेव्हा त्याने गाडी सांभाळण्यासाठी घेतलेली मेहेनत सार्थकी लागल्याचे त्यांना एक समाधान मिळते! धनंजय बदामीकर यांनी आपल्या गाड्या दुरुस्ती साठी स्वत:चे आद्यावत गॅरेज बनवले आहे. धनंजय बदामीकर यांना त्यांच्या विंटेज कारचे कायम स्वरूपी एक संग्रहालय करायचा विचार आहे. जागतिक संग्रहालय दिवसाच्या निमित्ताने धनंजय बदामीकर यांचा विंटेज कारच्या छंदाला सलाम.
धनंजय बदामीकर संपर्क.
९४२२००९८९५
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply