मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा-
मुंबईचे आद्य रहिवासी म्हणजे कोळी. मुंबईमध्ये कोळी समाज मुंबई ही ‘मुंबई’ म्हणून ओळखली जाण्यापुर्वीपासून वास्तव्यास आहे. म्हणून तर मुंबई ही कोळ्यांची असे सांगतात. कोळी आणि त्याचं कुटुंब, अश्या सर्वांचच आयुष्य समुद्राशी, त्याच्या लहरीपणाशी, त्याच्या भरती-ओहोटीशी घट्ट निगडीत असल्याने त्यांची वसती समुद्र किनाऱ्यांवर असणं अगदी साहजिक असतं. समुद्रच यांचा माय-बाप, त्यानुळे चुकला कोळी समुद्रावरच सापडायचा, एवढ याचं जीवन समुद्रमय झालेलं असते. सतत समुद्राच्या अंगा खांद्यावर बागडणाऱ्या कोळ्यांच्या अंगात समुद्राचा दिलदारपणा, रांगडेपणा आणि बेडरपणा हे गुण भिनले नसते तरच नवल. याला त्याची घरकारीण कोळीणही अपवाद नाही.
कोळी समाजाच्या या वस्त्यांना ‘कोळीवाडे’ म्हणतात, हे सांगण गरजेच नाही. मुंबई शहर आणि उपनगरे मिळून असे बरेच कोळीवाडे आहेत. खुद्द मुंबई शहराच्या सीमेत जसे माहीम, शींव (सायन), धारावी, कुलाबा, वडाळा, शिवडी, वरळी, कफ परेड, मांडवी असे काही कोळीवाडे आहेत. यातही मुंबई शहराचा पूर्व किनारा आणि पश्चीन किनारा अशी विभागणी आहे. ब्रिटीशांच्या काळात त्यांची दृष्टी मुख्यत: पूर्व किनार्यावर असल्याने, विविध बंदरांच्या विकासाच्या ओघात पूर्व किनार्यावरचे बरेचसे कोळीवाडे नष्ट झाले किंवा त्याचं स्वरूप अमुलाग्र बदलल. पश्चिम किनाऱ्यावरचे कोळीवाडे, त्यांच्या कालानुरूप बदल झाला असला तरी मात्र, अद्यापही आपल मूळ स्वरूप बऱ्यापैकी टिकवून आहेत.
आज शिल्लक असलेला कोणताही कोळीवाडा दाटीवाटीच्या बैठ्या वस्तीचा आणि चिंचोळ्या रस्त्यांचा असला तरी, ही झोपडपट्टी नाही. शासनाच्या व्याख्येत झोपडपट्टी म्हणजे दाटीवाटीने वसलेली कोणतीही बैठी वसती. परंतु बैठ्या वस्तीतही फरक असतो आणि प्रत्येक बैठी वस्ती ही झोपडपट्टी नसते. ‘प्रत्येक कावळा काळा असतो, पण प्रत्येक काळा कावळा नसतो’ म्हणतात ना, तसं. या पूर्वी मुंबईत बैठ्या वस्त्या असायच्या आणि त्यांना ‘चाळी’ असा सभ्य शब्द होता. झोपडपट्टी म्हणजे दिसेल त्या मोकळ्या जागेवर बारदान आणि पत्रे ठोकून अवैध रीतीने एका रात्रीत उभी केलेली वस्ती. ‘झोपडपट्टी’ हा शब्द आधुनिक काळात विकासाच्या पोटी जन्मलेला आहे. ‘विकास’ आणि त्याच एक अनौरस अपत्य ‘झोपडपट्टी’ या बाप-बेट्याचा जन्मच आधुनिक काळातला आहे. मुंबईच्या प्राचीन सभ्यतेचे आणि संस्कृक्तिक इतिहासाचे जिवंत साक्षीदार असलेले कोळीवाडे म्हणजे झोपडपट्ट्या नव्हेत, हे शासनात बसलेल्या झापडबंद अधिकाऱ्यांना आणि इतिहास-संस्कृती काही देणं-घेण नसणाऱ्या लोभी राजकारण्यांना कुणीतरी सांगणे गरजेचे आहे. कोळीवाड्यांना इतिहास आहे मात्र वर्तमान परिस्थितीत त्यांना भविष्य आहे की नाही हे सांगता येत नाही. झोपडपट्ट्यांना इतिहास नसतो, मात्र वर्तमान काळात त्यांना उज्वल भविष्य आहे हे नक्की..!
वरळीचा कोळीवाडा-
मुंबईच्या इतिहासाचा असाच एक जिवंत साक्षीदार म्हणजे वरळी कोळीवाडा. वरळी कोळीवाडा ही झोपडपट्टी नाही. या कोळीवाड्याला ७-८०० वर्ष वा त्याहूनही जुना इतिहास आहे. हा कोळीवाडा वरळी गांव म्हणूनही ओळखला जातो. ज्या सात बेटांची मुंबई बनली असं म्हणतात, त्यातील सध्याच्या मुंबईच्या हृदयातलं वरळी हे कुलाब्या खालोखालचं सर्वात लहान बेट. वरळी हा एक लहानसा डोंगरी गांव. या बेटाची व्याप्ती साधारणत: सध्याच्या ‘अत्रिया माॅल’च्या समोर असलेल्या ‘पुनम चेंबर’ या इमारत समुहापासून सुरू होणाऱ्या आणि ‘सेंच्युरी बाजार’पर्यंत जाणाऱ्या ‘अॅनी बेझंट’ मार्गाच्या पच्छिमेस पार समुद्रापर्यंतची आहे. या लहानश्या पट्ट्यात वरळीच्या किल्ल्याच्या जवळ वसलेला वरळी कोळीवाडा हीच तेवढी पूर्वापार अस्तित्वात असलेली वस्ती असावी आणि बाकीचा सर्व भाग तेंव्हा मोकळा असावा. ‘अत्रिया माॅल’च्या समोर असलेल्या लहानश्या टेकडीवरचं ‘मार्कंडेश्वर मंदीर’ वरळीच्या दक्षिण सीमेवरचं असावं असा अंदाज बांधता येतो. वरळी गांव आणि हे मंदीर यात त्या काळात फारशी वसती नसावी. मुळात तेव्हाच्या मुंबईतील सर्व बेटात मिळून चार-पांचशेच्या वर घरं नसावीत, तिथे सर्वात लहान असलेल्या वरळी गांवात अशी कितीश वस्ती असणार, याचा अंदाज बांधा. सर्व मुंबई वरळी गांवची उत्तर सीमा म्हणजे सध्याच्या सेंच्युरी बाझारच्या समोरुन वरळी गांवात जाणारा रस्ता असावा असा अंदाज नकाशावरुन बांधता येतो.
असं हे वरळी गांव बाराव्या व तेराव्या शतकाच्या सुरुवातीला बिंब राजाने त्याचे सरचिटणीस सूर्यवंशी गंभिरराव यास इनाम देऊन त्यास या गांवचा ‘पुरो’ हे पद दिल्याचा उल्लेख ‘महिकावतीची बखर’ या बखरीचं विश्लेषण केलेल्या याच नांवाच्या इतिहासाचार्य वि. का. राजवाडेच्या पुस्तकात आहे. केशवाचार्याची ही बखर बखर वाड्मयात फार प्राचीन अशी म्हणता येईल. असाच वरळी गांव इनाम म्हणून दिल्याचा एक उल्लेख श्री. गोविंद नारायण मडगांवकर यांच्या ‘मुंबंईचे वर्णन’ या सन १८६२ सालच्या पुस्तकात आहे. मडगांवकर लिहितात, ‘श्री राज बिंब महाराज यांनी आपले पाटील यांस वरली गांव वंशपरंपरा इनाम दिले होते. त्या गांवातील शेत, जमीन, डोंगर, ताड-माड, खजुरी यांचे उत्पन्न वसूल करून घेऊन पुत्र-पौत्रादिकांनी याचा उपभोग घ्यावा’. मडगांवकरांनी हे लिहिताना सनावळीचा उल्लेख केला नसला तरी, त्यांना एका स्थानिक वृद्ध प्रभु गृहस्थाकडे सापडलेल्या लहानशा बखरीचा हवाला दिला आहे. महिकावतीच्या बखरीपेक्षा मडगांवकर म्हणतात ती बखर वेगळी असावी, कारण मडगांवकराना मिळालेल्या बखरीत वरळीचा पुरातन वृत्तांत होता, असं ते म्हणतात. ‘गंभिरराव सूर्यवंशी’ यांस वरळी गांव इनाम देऊन त्यास वरळी गांवचे ‘पुरो’ हे पद दिल्याचा उल्लेख बखर करते, तर मडगांवकर केवळ वरळी गांव ‘पाटलास इनाम दिले’ येवढाच उल्लेख करतात. एवढा एक फरक सोडल्यास मडगांवकर आणि राजवाडे यांनी दिलेल्या इतर तपशिलात फारसा फरक नाही. ‘पुरो’ हेच पुढे ‘पाटील’ झाले असावेत असं समजण्यास तूर्तास हरकत नाही.
वरळी गांवाची पूर्व सीमा समजल्या जाणाऱ्या डाॅ. अॅनी बेझंट रोडला लागूनच श्री निळकंठेश्वराचं एक जुनं मंदीर आहे. या मंदीरात एक जुना गधेगळ आहे. गधेगळी या सामान्यत: इनाम वा बक्षिस वा दान दिलेल्या गांवाच्या सीमा आखण्यासाठी लावल्या जातात. गधेगळ जीथे असतो, त्या सीमेच्या अातलं क्षेत्र त्या इनाम, बक्षिस वा दान दिलेल्या व्यक्तीचं असतं व त्यात कुणी हस्तक्षेप करु नये, अशी ती एक ताकीद असते. निळकंठेश्वराच्या मंदीरात असलेल्या ह्या गधेगळीवर शेंदूर-तेल माखून आता तिचा देव बनवल्याने ती वाचता येत नाही, परंतू ही वरळी गांव इनाम दिल्याची सीमा खुण असावी असा अंदाज बांधता येतो. याचा अर्थ तेराव्या शतकात मुंबईत राज्य स्थापन करणाऱ्या बिंबराजाच्या पूर्वीपासून वरळी कोळीवाडा मुंबईत अस्तित्वात होता.
प्रताप बिंब हा मुंबईचा पहिला राजा समजण्यास हरकत नाही. कारण प्राचीन मुंबईवर अनेक घराण्यांची येऊन गेली असली तरी, मुंबईच्या माहिमला राजधानी स्थापन करणारा हा पहिला राजा. तत्पूर्वी प्रताप बिंब राजाने केळवे माहीम येथे आपली राजधानी स्थापन केल्यानंतर, आपल्या राज्याची आखणी करताना, त्याच्यासोबत आलेल्या त्याच्या काही महत्वाच्या अधिकाऱ्यांना दमण ते वाळकेश्वरापर्यंतची गांवे इनाम म्हणून दिली, त्यात वरळी गांव आपले सरचिटणीस गंभिरराव किंवा इथल्या पाटलाला त्याच्या वंश परंपरागत इनाम हक्काने दिलं. याचा अर्थ बिंब राजाच्या राज्यात सामील केलं गेलेलं वरळी गांव, बिंब राजा मुंबईत येण्याच्याही पूर्वी लहानशा स्वरुपात का होईना, पण अस्तित्वात होतं, असा होतो. सदर पाटलाचा हा हक्क पुढे पोर्तुगीज आणि नंतर इंग्रजानीही कायम ठेवला होता असा उल्लेख श्री. गोविंद नारायण माडगावकर यांच्या ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात आहे. राजा बिम्बाने दिलेले हे वरळी गांवचे इनाम पुढे अनेक कारणाने इतराच्या हातात गेलं असलं तरी, ‘नऊ पाटलांचा मान’ आजही या कोळीवाड्यात जपला जातो, तो याच संदर्भाने असावा. या ठिकाणी ग्राम पद्धती अद्यापहीशाबूत असून, प्राचीन काळच्या परंपरा अजूनही आवर्जून जपल्या जातात.
श्री गोलफादेवी –
कोळी लोकांचा व्यवसाय समुद्राशी निगडीत असतो. लहरी समुद्र कोणत्या वेळेला कोणतं दान पदरात टाकेल याची काहीच शाश्वती नसते. वर्षानुवर्ष्याच्या अनुभवाने बांधलेले अाडखेही कधी कधी चुकतात आणि मग जीवावर बेतू शकतं. समुद्रावरची मासेमारी म्हणजे रोज जिवावरचा खेळ असतो. मासेमारीला खोल समुद्रात गेलेला नाखवा सुखरूप परत येतो, पण तो येईलच याची काही शाश्वती नसते. म्हणून तर त्यांच्या कुटंबातील लोक असे मानतात की, जोपर्यंत ती व्यक्ती घरी सुरक्षित पोहचत नाही तोपर्यंत ती त्यांची नसते. आणि कदाचित म्हणूनच कोळी समाज देवावर प्रचंड श्रद्धा असणारा असतो. कोळी समाजातील बहुतेक सर्वचजण कार्ल्याच्या डोंगरातली देवी श्री एकवीरा देवी आणि जेजुरीच्या खंडोबाला दरवर्षी भेट देतात.
श्री एकविरेप्रमाणे प्रत्येक कोळीवाड्याचं स्वत:चं एक दैवत असतं. आपल्या देशातील कोणत्याही प्रांतातील कोणत्याही गांवचं स्वत:चं असं एक श्रद्धेय दैवत असतं आणि ते बहुतकरून देवी रुपात असतं. ह्या देवीला गांवदेवी असंही म्हणतात. अशीच वरळी गांवची ग्रामदेवता आहे श्री गोलफादेवी. श्री गोलफादेवी या नांवाचा उगम कसा झाला असावा, याचीही काही ठोस माहिती मिळाली नाही
वरळी कोळीवाड्याच्या श्री गोलफादेवीची स्थापना बिंब राजाने केल्याचं सांगीतलं जात असलं तरी, या देवीची स्थापना कुणी आणि कधी केली त्याबद्दल निश्चित असं काही सांगता येत नाही. श्री. भालचंद्र आकलेकरांच्या ‘मुंबंईतील आद्य शक्तिपीठे’ या पुस्तकातही असाच उल्लेख आहे.
आपण वरच्या परिच्छेदात पाहिल्याप्रमाणे जर वरळी कोळीवाडा राजा बिंबाच्या मुंबईतील आगमना पूर्वीपासून अस्तित्वात होता, तर मग या गांवची ग्रामदेवता श्री गोलफादेवी बिंब राजा मुंबईत येण्या पूर्वीपासून अस्तित्वात होती, असं ओघानेच म्हणावं लागतं. कारण आपल्या देशात प्रत्येक गांवची एक स्वतंत्र देवता असणं, ही आपली परंपरा आहे. परंतू माझ्या वाचनात आलेल्या मुंबईची कहाणी सांगणाऱ्या जुन्या पुस्तकात श्री गोलफादेवीचा उल्लेख नाही. ‘Bombay Gazetteer of Bombay City and Island’ या सन १९०६ साली लिहिलेल्या सरकारी दस्तावेजातही श्री गोलफादेलीचा उल्लेख नाही. वरळी (जुनं नांव वरोली) गांवाचाही फारसा उल्लेख नाही. जुन्या इंग्रजी पुस्तकांत वरळीची स्पेलिंग Worli अशी न लिहिता Varli, Vadali, Vareli, Verulee, वारोळी अशी विविध पद्धतीने केलेली लक्षात येते. वरळी हे अगदी पाडा म्हणावं असं लहानसं गांव असावं आणि त्या मुळे कदाचित, तेथील देवतेचं अस्तित्व जुनी पुस्तकं लिहिणाऱ्या लोकांनी लक्षात घेतलं नसावं, असं म्हणता येईल. परंतू वरळी गांव होतं म्हणजे देवताही असावी, असं तर्काने म्हणता येईल.
मग श्री गोलफादेवीच्या स्थापनेशी बिंबराजाचं नाव कसं जोडलं गेलं असावं, याचा विचार करताना दोन शक्यता लक्षात येतात.
1. वरळी कोळीवाड्याची देवता श्री गोलफादेवी पूर्वीपासूनच अस्तित्वात असल्याने, बिंब राजाच्या मुंबईतल्या आगमनानंतर बिंब राजाने श्री गोलफादेवीला शाकंभरीचंच रुप मानलं असावं.
2. बिंब राजाने श्री गोलफादेवीचं पूर्वीपासून अस्तित्वात असलेलं मंदीर नव्याने बांधून त्यात श्री शाकंभरी देवीची श्री गोलफादेवी नांवाने पुनर्स्थापना केली असावी.
यातील पहिल्या शक्यतेवर विचार करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं वाटतं. मुंबईत राज्या स्थापन करणारा हा बिंब राजा यादव कुळातला की चालुक्य कुळातला, हे दोन विचारप्रवाह अभ्यासकांमधे आहेत आणि त्यात आपल्याला पडायची आवश्यकता नाही. महिकावतीच्या बखरीत या राजाची कुळदेवता शाकंभरी, गोत्र भारद्वाज आणि त्याचा गुजरातेतील अनहीलपाटण प्रांतातल्या सोळंकी राजाशी असलेला संबंध लक्षात घेता, हा बिंब राजा चालुक्य कुलातला वाटतो. चालुक्यांची कुळदेवता श्री शाकंभरी, गोत्र भारद्वाज आणि या घराण्याचा गुजरातशी आलेला राज्यसंबंध व या सर्व तपशिलाचं राजा बिंबाच्या तपशिलाशी असलेलं साधर्म्य यावरुन राजा बिंब चालुक्य कुळातला असं मानायला जागा आहे. आता पहिली शक्यता असं सांगते की, आपल्या राज्यात पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या वरळी गांवातील या देवीला त्याने शाकंभरीचं स्वरुप मानलं असावं आणि तिची पुजा करण्यास सुरुवात केली असावी. परंतू श्री गोलफादेवीची नि:शस्त्र मुर्ती, तिची पाना-फुलांनी-भाज्यांनी केली जाणारी पुजा पाहाता, ही शक्यता ग्राह्य वाटत नाही. श्री गोलफादेवीची म्हणून पुजली जाणारी मूर्ती शाकंभरीचीच असावी असं वाटत. या संदर्भात अधिक संशोधन व्हायला हवं.
दुसरी शक्यता, बिंब राजाने श्री गोलफादेवीचं पूर्वीपासून अस्तित्वात असलेलं मंदीर नव्याने बांधून त्यात श्री शाकंभरी देवीची श्री गोलफादेवी नांवाने पुनर्स्थापना केली असावी, ही शक्यता अधिक स्विकारार्ह वाटते. कारण नव्याने राज्यावर आलेला राजा आपल्या दैवतांची मंदीरं आपल्या राज्यात स्थापन करत असतो किंवा राजाची दैवतं, राजाची भाषा आणि काही प्रसंगात राजाचा धर्मही प्रजा स्वीकारत असते असं इतिहास सांगतो. या शक्यतेवर अधिक विचार केला असता आणखी काही गोष्टींवर प्रकाश पडतो.
बिंब राजाची कुलदेवता श्री प्रभावती देवी असल्याचा उल्लेख महिकावतीच्या बखरीत आहे. वरळीपासून नजिकच असलेल्या प्रभादेवी भागात असलेल्या प्रभादेवीच्या मंदीरातील प्रभादेवी ही ‘प्रभादेवी’ म्हणून ओळखली जात असली तरी, तिचं मुळ नांव श्री प्रभावती असून, ती श्री शाकंभरी देवी आहे. श्री शांकंभरी ही चालुक्यांची तशीच राजा बिंबाचीही कुलदेवता. आताच्या या प्रभादेवीची स्थापना माहिमात राजा बिंबाने केली होती, परंतु तद्नंतर आलेल्या अनेक परकी आक्रमणांच्या संक्रमणांतून जात, हिचं देऊळ सध्याच्या जागी नव्याने स्थापन करण्यात आल्याचा उल्लेख ‘मुंबईतील आद्य शक्तिपीठे’ या श्री. भालचंद्र आकलेकरांच्या पुस्तकात आहे. या प्रभादेवीची जत्रा किंवा यात्रा ही पौष पौर्णिमेला होते. पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असंही म्हणतात. याचप्रमाणे वरळीच्या श्री गोलफादेवीची यात्राही याच दिवशी भरते, हा योगायोग नव्हे. श्री गोलफादेवीच्या मुर्तीचं स्वरुप, पौष पौर्णिमेला प्रभादेवीप्रमाणेच श्री गोलफादेवीचीही भरणारी यात्रा, या बाबी श्री गोलफादेवीची पुनर्स्थापना राजा बिंबाने केली असावी किंवा बिम्बाची देवता कोळीवाड्याने स्वीकारली असल्याच्या शक्यतेस पुष्टी देते.
वरील दुसऱ्या शक्यतेस बळकटी देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, श्री प्रभादेवीच्या मंदीरात ज्या प्रमाणे तिच्या डाव्या-उजव्या हाताला अनुक्रमे श्री कालिका व श्री चंडीकादेवी आहेत, त्या प्रमाणेच प्रमाणेच श्री गोलफादेवीच्याही मंदिरात तिच्या डाव्या-उजव्या हाताला अनुक्रमे श्री हरबादेवी व श्री साकबादेवी अशा आणखी दोन मुर्ती आहेत. श्री प्रभादेवीच्या मंदिरातली श्री कालिकादेवी वरळी गांव इनामात मिळालेल्या राजा बिंबाचे सरचिटणीस सूर्यवंशी गंभिररावांची कुळदेवता आहे, तर श्री चंडीका देवी बिंबराजाचे राजगुरू हेमाडपंडीतांची कुळदेवता असल्याचा उल्लेख महिकावतीच्या बखरीत आहे. श्री प्रभादेवी( शाकंभरी) बिंबराजाची कुळदेवता असल्याने, आपल्या कुळदेवतेच्या मंदीरात बिंबराजाने आपल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या कुळदेवतांना स्थान दिलं असावं. तसंच श्री गोलफादेवीच्या मंदीरातली श्री हरबादेवी राजा बिंबाचे सरसबनीस शेषवंशी आनंदरावांची कुळदेवता आहे, असं बखर म्हणते. प्रभादेवीच्या मंदीरातील श्री कालिका देवी ज्याची कुळदेवता आहे, तो सूर्यवंशी गंभिरराव वरळी गांवचा इनामदार आहे याचा अर्थ, राजा बिंब, श्री प्रभादेवी आणि श्री गोलफादेवी यांचा निकटचा संबंध आहे, असा होऊ शकतो.
श्री गोलफादेवीच्या डाव्या हाताला असलेली श्री हरबादेवी ही राजा बिंबाचे सरसबनीस शेषवंशी आनंदराव यांची कुलदेवता असल्याचे महिकावतीच्या बखरीत नोंदलेलं आहे. श्री हरबादेवी बिंबराजाच्या उपास्य दैवतापैकी ही एक मोठी देवता असावी किंवा ही बिंबाची मुळ ग्रामदेवता असावी किंवा ती शेषवंशी समाजाच प्रतिनिधित्व करणारी असावी असं म्हणता येईल. कारण राजा बिम्बाने मुंबईत येताना आपल्या सोबत जी कुळें आणली, त्यात शेषवंशी कुळे असल्याचा उल्लेख बहुतेक जुन्या पुस्तकांत आहे. म्हणून मुंबई आणि साष्टी परिसरात जिथे राजा बिम्बाची सत्ता होती, त्या मुंबई व साष्टीमधल्या अनेक ठिकाणी श्री हरबादेवीची मंदीरं सापडतात. हिरबादेवी, हरिबादेवी, हरबाई अशी हिची नांव असल्याचंही दिसून येतं. काही कोळीगीतांत हरबादेवीचा उल्लेख येतो.
श्री गोलफादेवीच्या संमती शिवाय वरळी गांवातील कोणतीही खाजगी वा सार्वजनिक हिताची कामं केली जात नाहीत. देवीने दिलेल्या कौलानुसार वागलं असता कुणीही अडचणीत येत नाही, अशी इथल्या रहिवाशांची श्रद्धा आहे. देवीचा कौल घेण्याची परंपराही अत्यंत प्राचीन आहे आणि आजच्या काळातही ती आवर्जून पाळली जाते. श्री गोलफादेवीच्या मंदीरात असलेल्या तीन देवतांपैकी, केवळ श्री गोलफादेवी व श्री हरबादेवीला कौल लावला जातो. मंदीरात असलेली आणखी एक देवता श्री साकबादेवीला मात्र कौल लावला जात नाही. असं का, याचं उत्तर ‘तशी प्रथा आहे’ या पलिकडे आज तरी कुणाला देता येत नाही.
श्री साकबादेवीला कौल का लावला जात नसावा, यावर मी केलेला एक तर्क या लेखाच्या शेवटच्या टप्प्यात दिला आहे.
श्री गोलफादेवीची वार्षिक जत्रा पौष पौर्णिमेला, म्हणजे शाकंभरी पैर्णिमेला भरते. साधारणत: जानेवारी महिन्यात ही तिथी येते. यात्रेच्या आदल्या रात्री मंदीरात सामुदायिक अभिषेक व हरिपाठ केला जातो. नंतर देवीला नेसवली जाऊन तिला अलंकाराने सजवतात. यात्रेच्या दिवशी पुन्हा पुजा देवीची पुजा केली जाऊन मंदीर भाविकांसाठी खुलं केलं जातं. या दिवशी हजारो भक्तगण नवस फेडण्यासाठी येतात. लग्नानंतर वरळी गांव सोडून गेलेल्या सासुरवाशीणी न चुकता पोरा-बाळांसकट देवीच्या दर्शनाला येतात. खणा-नारळाने देवीची ओटी भरतात. आपल्या देशातील कोणत्याही गांवातील कोणत्याही जत्रेप्रमाणे श्री गोलफादेवीचीही जत्रा असते. कोणत्याही जत्रेप्रमाणे या ही जत्रेत विविध प्रकारच्या वस्तू विकणारी दुकाने लागतात, खेळाचे चक्री पाळणे लागतात, मेवा-मिठायांची ठेले लागतात. पहाटेच सुरू झालेला श्री गोलफादेवीच्या जत्रेचा हा सोहळा मग उत्तररात्रीपर्यंत सुरू राहातो. श्री गोलफादेवीच्या यात्रेचा इतिहास फार-तर शंभर-सव्वाशे वर्षांचा असावा. कारण सन १९०६ च्या ‘Bombay Gazetteer‘मधे मुंबईत होणाऱ्या यात्रांची तिथी आणि ती यात्रा किती दिवसांची असते त्याची यादी दिलेली आहे, त्यात श्री गोलफादेवी यात्रेचा उल्लेख नाही. याचा अर्थ श्री गोलफादेवीची यात्रा या नंतर कधीतरी सुरु झाली असावी.
या व्यतिरिक्त चैत्र शुद्ध अष्टमीला ‘भवानी उत्पती महोत्सव’ आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या नऊ दिवसांच्या कालावधीत ‘शारदीय नवरात्रोत्सव’ही मंदिरात साजरा केला जातो.
श्री गोलफादेवीच्या जत्रेतलं एक वैशिष्ट्य म्हणजे, या जत्रेत काठीयावाडी गुजराती भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. गुजरातच्या ह्या समाजाला ‘वाघरी’ समाज असे म्हणतात. यांची भाषा राजस्थानी मिश्रित गुजराथी असून, हा देविपुजक समाज आहे. हे लोक दरवर्षी श्री गोल्फादेविला देवीला झेंडा अर्पण करतात. काठीयावाडी लोकांनी या जत्रेला येण्याची परंपरा अत्यंत जुनी आहे. एवढच नव्हे तर या वाघरी समाजाने मुंबईत अनेक ठिकाणी श्री गोलफादेवीची मंदीर स्थापन केली आहेत. काठेवाडी गुजराती लोक या यात्रेला येण्याच कारण काय हे शोधता शोधता मी राजकोटच्या श्री. उमेशभाई सोलंकी आणि श्री. जयसिंगभाई उग्रेजिया यांच्या पर्यंत पोहोचलो. श्री. उमेशभाई सोलंकी यांनी “શ્રી દેવીપૂજક (વાઘરી) સમાજના દેવ અને દેવિઓ અને પૂર્વજોની અમર ગાથાઓ” हे पुस्तक लिहिले आहे. श्री. सोलंकी यांच्याशी बोललो असता त्यांना वरळीच्या गोल्फादेविबद्दल काही सांगता येईना. म्हणून त्यांनी मुंबईच्याच श्री. जयसिंगभाई उग्रेजीयांशी बोलण्यास सांगितले. श्री. उग्रेजीयानी सांगितले की, जेंव्हा त्यांचा वाघरी समाज मुंबईत स्थलांतर करता झाला, तेंव्हा मुंबईच्या देवतेची आपल्यावर कृपा असावी यासाठी त्यांनी श्री गोल्फा देवीची निवड केली आणि तेंव्हा पासून हा समाज श्री गोल्फादेविला पुजत आलेला आहे.
मुंबईत हा समाज कधी आला याची ठोस अशी माहिती मिळालेली नाही, तरी श्री उग्रेजीया यांच्या म्हणण्याप्रमाणे साधारण शंभर-दीडशे वर्षापूर्वी हा समाज मुंबईत आला. हा समाज गुजरातेतील राजकोट, सौराष्ट्र, अहमदाबाद व इतरही ठिकाणी पसरलेला असल्याची माहिती श्री उग्रेजीया यांनी दिली. उग्रेजीया पुढे म्हणाले की, त्यांचा राजा सोलंकी घराण्याचा होता म्हणून त्याची देवताही ते पूजतात. सोलंकी हे आडनाव चालुक्यचा अपभ्रंश आहे, असे महिकावातीची बखर लिहिणाऱ्या श्री राजवाडे आणि ह्याच बखरीच नव्याने विश्लेषण करणाऱ्या श्री अशोक सावे यांनीही लिहिलंय. असं असेल तर गुजरातच्या ह्या राजाची कुळदेवता श्री शाकंभरी ठरते आणि म्हणून कधीकाळी त्याचे प्रजाजन असलेला वाघरी समाज श्री गोल्फादेविला पुजत असावा असा अंदाज बांधला तर चुकीचा ठरू नये.
श्री साकबादेवीला कौला का लावला जात नाही, या विषयी एक अंदाज बांधायचा तर, श्री शाकंभरी देवीच जे एक स्थान राजस्थानातल्या सिकर इथे आहे, तिथे या देवीचं नांव ‘सकराई’ किंवा ‘सकराय’ असही आहे ( ‘सकराई’चा उच्चार ‘सागराई’ असाही होऊ शकतो आणि सागर हा तर कोळ्यांची माता-पिता असा सगळाच आहे. राजभवनाच्या परिसरातील श्री गुंडी या ऐतिहासिक ठिकाणावर असलेली देवी कोळी लोकांच्यात ‘सकलाई’ नांवानेच ओळखली जाते, हे ही इथे लक्षात घ्यायला हवं). श्री गोल्फादेविच्या दर्शनाला येणाऱ्या वाघरी लोकांची भाषा गुजराती मिश्रित राजस्थानी आहे, हे लक्षात घ्यायला हवं. देवीच्या या नांवाचा अपभ्रंश ‘सकलाई’, सकबाई’, ‘सकबा’ असा विविध प्रकारे होऊ शकतो. मग श्री गोल्फादेविच्या मंदिरातली ही श्री साकबादेवी शाकंभरीच आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. वरळीची श्री गोलफादेवी हे शाकंभरीचं रूप असल्याने एकाच मंदिरातल्या दोन शाकंभरी मातांना कौल कसा लावणार, म्हणून श्री साकबादेविला कौल लावला जात नसेल का, असाही प्रश्न उभा राहतो. अर्थात हे माझ्या मनात उभे राहिलेले प्रश्न आहेत, पुढील काळात यावर अधिक संशोधन व्हायला हवं असं वाटतं..!!
वरळीच्या कोळीवाड्यात कोळीवाड्यांच्या सीमांच रक्षण करणारा, गांवाचं आद्य स्थान असलेला श्री चेडदेव, श्री पापविमोचनेश्वर, श्री मारुती मंदीर, श्री प्रभू येशू आणि मेरी प्रार्थनास्थळ आणि पीर दर्गा अशी इतरही धार्मिक स्थळ आहेत. तसेच उत्तरेला समुद्र काठावर श्री वेताळांच मंदिरही आहे. पाण्यातला वेताळ आणि आग्या वेताळ यानाही कौल लावला जातो. कोळी बांधव समुद्रात मच्छिमारीसाठी जाताना वेताळ देवाला हात जोडून त्यांच्या सुरक्षेसाठी साकड घालतात. नारळी पौर्णिमेचा उत्सवही वरळी गांवात उत्साहात साजरा होतो. शिवाय या बेटाच्या रक्षणासाठी ब्रिटिशांनी समुद्र किनाऱ्यावर बांधलेला एक किल्लाही या गांवात असून, तो अजूनही बऱ्यापैकी स्थितीत आहे.
अशी ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या वरळी गांवाची कथा..!!
– नितीन साळुंखे
9321811091
संदर्भ –
1. महिकावतीची बखर – श्री. वि. का. राजवाडे
2. मुंबईचे वर्णन– श्री. गोविंद नारायण मडगांवकर
3. मुंबई नगरी– श्री. न. र. फाटक
4. वरळी कोळीवाड्याची ग्रामदेवता श्री गोलफादेवी – श्री. विलास वरळीकर
5. मुंबईतील आद्य जागृत शक्तिपीठे – श्री. भालचंद्र आकलेकर
6. Bombay Gazetteer of Bombay City and Island- Vol. I, II, III-1906
7. श्री. सी. डी. काटकर, वरळी गांव
8. श्री. विलास वरळीकर, वरळी गांव
9. श्री. उमेशभाई सोलंकी, राजकोट
10. श्री. जयसिंगभाई उग्रेजीया, राजकोट
11. श्री. अधिश काटकर, वरळी गांव
12. श्री. सागर कोळी
13. श्री. चंदन विचारे, मुंबई.
Leave a Reply