आरोग्याच्या बाबतीत अमुक एक नियम करून चालत नाही. मागे अनेक वेळा सांगितल्या प्रमाणे देश, प्रकृती, सवय, मनाची अवस्था, आवडनिवड, उपलब्धता इ. अनेक गोष्टींवर आरोग्याचे मापदंड बदलत असतात. प्रत्येकाला एकाच तराजूत तोलता येणारे नसते. एखाद्याच्या प्रकृतीतला नेमकेपणा, आवश्यकता, गरज, योग्य पथ्यापथ्य हा जाणकार वैद्यच सांगू शकतो. त्याहीपेक्षा अचूकपणे फॅमिली डाॅक्टर / वैद्य सांगू शकेल. कारण त्या वैद्याला जन्मापासूनच त्याची सर्व माहिती असते. त्यामुळे निदान करायला किंवा अपथ्य, चिकित्सा सांगायला सोपे होते.
मी असं सांगतो, एकच नियम पाळावा, की (वैश्विक नियम सोडून) कोणताच नियम पाळू नये. वैश्विक म्हणजे युनिव्हर्सली अॅक्सेप्टेड. जगन्मान्य !
आपण आता सर्वसामान्य जगन्मान्य नियम काय असतात ते पाहू.
1. पाणी कधी प्यावे ?
तहान लागेल तेव्हा. गरज असेल तेव्हा.
2. पाणी किती प्यावे ?
तहान भागेपर्यंत. गरजेपुरते.
याला म्हणतात, वैश्विक नियम. जगात कुठेही जा. हाच नियम पाळायचा. म्हणजे कोणताही शास्त्राधार शोधण्याची आवश्यकताच पडणार नाही.
एवढे साधे प्रश्न आणि एवढी साधी उत्तरे असताना, आपण नियम करून खूप गोंधळ निर्माण करून ठेवतो. जे सोप्पं आहे ते, अवघड करून सांगितले, तरच ते शास्त्र आणि ते जाणणारा कोणीतरी मोठ्ठा विद्वान वगैरे वाटतं. असं काही जणांना वाटतं म्हणून जरा अघळपघळ करून सांगितले तर ऐकणाऱ्यालाही जरा बरे वाटते ना !
ताप आहे असं सांगण्याऐवजी पायरेक्झिया ऑफ अननोन ओरीजीन, वगैरे भाषेत सांगितले तर रूग्णालापण आपणाला कोणता तरी मस्त मोठा आजार झालाय असे वाटते. मग नंतर बिल भरताना फार कटकट वाटत नाही. असो.
पाणी पिण्याचे हे दोन नियम मोडले नाहीत, तर पाण्यापासून होणारे रोग निकाली निघतील. (आणि हे एवढ्या पटकन, समजले तर ही लेखमाला पण लवकर बंद होईल.)
याला शास्त्राधार काय ? असंही कोणाच्या तरी मनात येईल. त्यालाही उत्तर देतो.
ही गरज कोण ठरवणार ?
तहान लागली की नाही, हे कसं समजणार ?
सोप्प आहे.
यासाठी त्याला काही काळ गृहीत धरावा लागेल. उत्तर मिळेपर्यंत वाट पहावी लागेल. नंतर वाटलं तर विसरून जायचं. गणितामध्ये नाही का आपण एक्स गृहीत धरंत. तसं. एक्सचं उत्तर मिळालं, की त्याला विसरून जायचं.
आपली तहान भूक, झोप, ढेकर,जांभई, अश्रु, मलमूत्र विसर्जन इ. क्रियांची जाणीव आपणाला कोण करून देतो ? जर त्याने ही जाणीव करून दिली नसतीच तर ? म्हणजे तो आतून काहीतरी सांगतोय, हे असं कर. हे तू असं केलंस तर बरं वाटेल, वगैरे.
कोण आहे तो?
तोच तो निर्गुण निराकार…… आत्मा !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
09.12.2016
Leave a Reply