पाणी शुद्धीकरण भाग चार
पाणी शुद्ध करण्यासाठी एक साधी पद्धत ग्रंथकार सांगतात.
दोन मडकी घ्यावीत. एका मडक्यात अस्वच्छ म्हणजे नेहेमीचे उपलब्ध असेल ते नलोदक वा बोअरचे, विहिरीचे पाणी घ्यावे. ते जरा उंचावर ठेवावे. दुसरे मडके जरा खाली ठेवावे. एक स्वच्छ तलम कपड्याची गुंडाळून एक लांब वात करावी. आणि ती वरच्या मडक्यातील पाण्यात तळापर्यंत बुडेल अशी ठेवावी. ही वात ओली करावी. त्याचे दुसरे टोक बाहेर काढून खालील मडक्यात असे लोंबत ठेवावे की, वरच्या मडक्यातील पाणी थेंब थेंब वातीवरून खाली ठिपकत राहील. दोन्ही मडक्यावर नीट आच्छादन घालावे.
वरच्या मडक्यातील काही अशुद्धी, वातीमुळे खालील पाण्यात येणार नाही. फक्त वरच्या मडक्यातील तळापर्यंत गेलेल्या वातीच्या पातळीपेक्षा दुसरे टोक आणखी खालील पातळीवर आले पाहिजे, हे पहावे.
ही वात घसरून खाली येऊ नये यासाठी वरच्या मडक्यात वातीवर एखादी वाटी वजनासाठी ठेवावी.
टीप टीप बरसा पानी…. सुरू होईल.
वरच्या मडक्यातील पाणी गाळून आपोआप खालील मडक्यात जमा होईल. वरच्या मडक्यातील पाणी कमी होत जाईल. खालचे मडके भरत जाईल.
वातीला चिकटलेली धुळ, माती सारखी अशुद्धी आपल्याला उघड्या डोळ्यांनी पहाता येते. कापडाची वात धुवुन वाळवून ठेवली की, पुनः दुसऱ्या दिवशी वापरायला तयार !
खर्च म्हणाल तर काही नाही. मडक्यामुळे पाणी थंड पण होईल. वरील मडक्यात रोज एखाददुसरे सुगंधीत फूल किंवा पान किंवा बी किंवा वाळ्यासारखे सुगंधी असलेले एखादे मूळ ठेवावे. त्याचा वास, अर्क, आणि काही प्रमाणात सूक्ष्म औषधी गुण पाण्यात येतील.
दररोज औषधीयुक्त शुद्ध गाळलेले थंडगार पाणी मिळत जाईल.
करून तर बघा,
गंमत म्हणून !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
31.12.2016
Leave a Reply