रवीने हातातला कप बाजूला ठेवला, “ताई काय बोलत्येस तू? कसला आजार? काय सांगत्येस तू हे”, रवीने ताईच्या खांद्यांना हाताने गदगदा हलवून विचारले, त्याच्या चेहऱ्यावर अशक्य गूढ भाव निर्माण झाले होते पण ताईने आपलं तोंड घट्ट मिटून घेतलं होतं, नकारार्थी मान हलवून ती सांगायचं टाळायचा प्रयत्न करत होती. “प्लिज ताई बोल ना ग, काय झालं होतं तुला? अण्णा मुंबईला काम आहे सांगून गेले होते ते आठवतंय मला चांगलंच, भयानक पाऊस होता तेव्हा, अगदी श्रावणातील ऐन दिवस, इथल्या पुजाऱ्याने भैरोबाच्या आवरातल्या महादेवाच्या मंदिरात असणे गरजेचेच होते, पण पण…. अण्णांनी अचानक एका संध्याकाळी आईला सांगितलं रात्री मुंबई ला जात असल्याचं. काम आहे म्हणून जावं लागतंय, बस एवढंच. मुंबई ला कुठे जातायत, कशासाठी जातायत, केव्हा परत येणार, इकडे श्रावण महिना असल्याने शंकराच्या मंदिरात लोकांची गर्दी व्हायची, पुजाऱ्यासाठी तेव्हाच थोडेफार जास्त पैसे मिळायचे दिवस, पण ते सगळं सोडून अण्णा मुंबई ला गेले, माझ्यात हिम्मत नव्हती की मी त्यांना या सगळ्याचा जाब विचारीन, त्यामुळे आई काही बोलली नाही मीही गप्प बसलो, शेवटी जे काही अण्णांकडून शिकलो होतो त्यावर ते 4 दिवस मंदिरात पूजा सांगणे, अभिषेक करणे वगैरे गोष्टी मी केल्या. पण अण्णा परत आल्यावर सुद्धा माझ्याशी फार काही बोलले नाहीत, आईशी काही बोलत असायचे पुढचे काही दिवस पण आईला विचारल्यावर देखील काही नाही एवढं असं म्हणून मला नेहमीच टाळलं गेलं. ताई आता तरी सांग नक्की काय झालं होतं? अण्णा तुझ्याकडे आले होते म्हणालीस, तुला काय झालं होतं? कसला आजार, कुठे होतीस तू? प्लिज सांग मला प्लिज सांग ताई, मी हात जोडतो तुला प्लिज सांग मला…” रवीने ताईसमोर हात जोडले, त्याच्या आवाजात कंप निर्माण झाला होता.
ताईने डोळे घट्ट मिटून घेतले होते, तिचं शरीर एखाद्या वाईट शक्तीने आखडून ठेवल्या सारखं झालं होतं, हाताच्या मुठी तिने घट्ट आवळून घेतल्या होत्या. रवीने तिची अवस्था बदलत चाललेली पाहिली होती आणि त्याने लगबगीने आत जाऊन ताईसाठी प्यायला पाणी आणले. तिला पाणी देऊन त्याने आतून एक खुर्ची आणली आणि ताईला बसवले. तिला पाणी प्यायला लावून त्याने आतून साखर आणली आणि त्यातील चिमूटभर साखर त्याने ताईच्या हातावर ठेवली. ताईने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी रवीकडे पाहिले आणि साखर खाल्ली.
“याच कारणासाठी आम्ही कोणीही तुला काही कळू दिलं नाही. कारण आम्हाला सर्वांना माहीत होतं की तुला ताईची किती काळजी आहे ते, तुझ्या साठी ताई किती महत्वाची आहे याची कल्पना अण्णा आणि आईला होती आणि म्हणूनच जाणूनबुजून त्यांनी, माझ्या नवऱ्याने, मुलांनी आणि मी स्वतः माझं आजारपण तुझ्या पासून लपवून ठेवले.”
ताईने पदराने आपले डोळे पुसले आणि आवाजाला जरा रोखून धरून परत सोडले. आता ती नॉर्मल आवाजात बोलू लागली, “रवी मी खरंच मनापासून तुझी माफी मागते, मी ही गोष्ट तुझ्यापासून इतकी वर्षे लपवून ठेवली की मला…मला मानसिक आजार झाला होता.”
“म्हणजे?” उंचावलेल्या भुवयांना ताण देत रवीने जवळजवळ ओरडून विचारले.
“म्हणजे माझं मानसिक संतुलन बिघडायचं, दहा वर्षांपूर्वी मला पहिल्यांदा मानसिक अस्थिरतेचा झटका आला आणि त्यानंतर मला सारखे तसे झटके येऊ लागले. त्या गोष्टीने तुझे भावजी खूप हादरून गेले होते. मला रात्री, दिवसा, संध्याकाळ च्या वेळेस झटके यायचे, मी हात-पाय झटकायचे, एकदम माझा माझ्याच शरीरावरचा ताबा सुटायचा, माझा तोल जायचा, त्यात मी पडायचे, मला लागायचं. तुझ्या भावजींनी त्यांच्या एका मित्राला इथे पाठवले आणि अण्णांना भेटून घडत असलेला प्रकार सांगण्यास सांगितले. त्यावेळी फोन करून किंवा पत्र पाठवून सांगण्यासारखे काहीच नव्हते. आईला अण्णांनी मुंबईला जाऊन आल्यावर एक दिवशी शांतपणाने सारे सांगितले आणि तिने सुद्धा अतिशय हिम्मत दाखवून ते दुःख स्वतःच्या पोटात शेवटपर्यंत ठेवले. अण्णा जेव्हा मुंबईला आले तेव्हा मी हॉस्पिटल मधे होते, त्यांनी मला एकट्याने भेटून बरंच काही विचारलं. मी सुद्धा गोष्टी नि:संकोच पणाने त्यांना सांगितल्या. तुला माहीतंच आहे अण्णा वेद, मंत्र यात किती वरच्या स्थानावर होते. ते ४ दिवस माझ्या बरोबर हॉस्पिटल ला थांबले. बाकी कोणी येऊ नये असे त्यांनी घरच्यांना सांगून टाकले. ह्यांचं अण्णांसमोर काही चाललं नाही, ह्यांना माहीत होतं की अण्णा मुलीला यातून नक्की बाहेर काढतील. अण्णा रोज माझ्या बाजूला बसून माझ्या डोक्यावर हात ठेवून, काही वेळा माझा हात हातात घेऊन कितीतरी वेळ मंत्रोच्चार करत असायचे. पण त्यावेळी मला मन, मेंदू हलका झाल्यासारखा वाटायचा. त्यांनी मंत्रोचार म्हणायला सुरुवात केली की मला शांत झोप लागायची, मी घोरायचे सुद्धा असं आण्णांनीच सांगितलं मला. घरी होणारा छळ, मानसिक ताण, अपेक्षांचं ओझं, सतत नकारात्मक बोलणी ऐकणं, आई अण्णा यांच्या विषयी वाट्टेल ते ऐकणे याने माझं मानसिक संतुलन बिघडत चाललं होतं. पण अण्णांनी त्यावेळी माझ्या कडे येऊन कमाल केली होती. वादळात अडकलेल्या एका बोटीला त्यांनी भयानक लाटांमधून सुद्धा किनाऱ्याला अलगद आणून सोडलं होतं. त्यानंतर मी त्यांनी सांगितल्या प्रमाणे काही मंत्र म्हणायला सुरुवात केली. काही बदल रोजच्या जगण्यातले त्यांनी सांगितल्या प्रमाणे केले. अन खरंच माझी तब्येत सुधारायला लागली. मला झटके येणं कमी होत गेलं आणि शेवटी पूर्ण थांबलं.” ताईने मनाचा एक कोपरा एका श्वासात रवी समोर उघडला आणि त्यातून शब्द भावनांनी घेरले जाऊन बाहेर पडले.
ते सारं ऐकून रवी स्तब्ध झाला होता. त्याला कानावर पडत असलेले शब्द हे सत्य आहे की आपण स्वप्न बघतोय अशी शंका पडत चालली होती. “आपल्या ताईला, जी ताई लहानपणापासून माझ्यासाठी सगळं काही होती ती ताई मानसिक आजार होऊन अशी भेदरली होती आणि मी या सगळ्या पासून इतकी वर्ष अनभिज्ञ होतो. मला का नाही सांगितलं या सगळ्यांनी, मी काय केलं होतं? मला सांगितलं असत तर मी मदतच केली असती ना काहीतरी, ताई साठी मी काहीही करू शकतो हे माहिती होतं या सर्वांना मग मलाच का नाही सांगितलं गेलं.” या सगळ्या विचारांनी इतका वेळ शांत बसलेला रवींद्र एकदम खवळून उठला आणि त्याने ताईच्या हात हातात घेऊन तो काळजी पोटी दाबला. “ताई एवढं सगळं झालं आणि मला काहीच कळू दिलं नाहीत तुम्ही कोणीच. मी असं काय केलं होतं की मला यापासून लांब ठेवलं गेलं. मी काय लहान होतो का तेव्हा, अगं आता मी पन्नाशीचा आहे म्हणजे तेव्हा ४० चा होतो, मग मला का यात बाजूला केलंत.” रवीने आता तक्रारीचा सूर लावला होता.
“काय झालं असतं सांगून तुला? सांग ना काय झालं असतं सांगून?” ताईने त्याचा हात झटकला आणि त्याला विचारले.
ताईच्या या प्रश्नावर तर रवी उखडलाच, ” काय झालं असतं म्हणजे? काहीही विचारत्येस, अगं मीही आलो असतो अण्णां बरोबर तुझ्याकडे, माझी मदतच झाली असती ना तुला, तुला माहित्ये माझ्यासाठी तू किती महत्वाची होतीस, आहेस आणि नेहमी असशील, तरीही तू असं विचारत्येस की काय होणार होतं म्हणून, कमाल आहे.”
ताईने परत मान हलवली आणि हात रवीकडे करून ती म्हणाली, ” तेच तर, तेच तर घडायला नको होतं आम्हाला म्हणून तुला नाही सांगितलं. तू या गावाच्या बाहेर जाऊ नयेस असच आण्णा आणि आईला वाटायचं. तू नेहमी इथेच राहावंसं, या घरात, या गावात आणि म्हणूनच तुला आम्ही यातलं काहीच सांगितलं नाही.”
“काय? मी गावाच्या बाहेर जाऊ नये असं वाटत होतं आई आणि अण्णांना, मी गावाच्या बाहेर गेलो असतो तर काय घडणार होतं? काय….नक्की काय आहे हा प्रकार?” रवी आता तळमळून बोलत होता. काय चाललंय हेच त्याला कळत नव्हतं.
“काही गोष्टी ऐकून समजायच्या नसतात रवी, काही गोष्टी शोधून काढायच्या असतात. तुला कधी वेगळ्या प्रकारची स्वप्नं पडतात का?”, ताईने परिस्थिती जास्त न ताणता रवींद्र ला एक कोडं घातलं.
ताईचे ते बोलणे ऐकून रवींद्र आजवर त्याला पडणाऱ्या त्या स्वप्नात ओढला गेला आणि चुलीतल्या लाकडाने चुरचुर आवाज करत पेट घेतला.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply