नवीन लेखन...

युगांतर – भाग ५

अंधार दाटून आला होता, आणि रवींद्र त्या अंधारात चालत जात होता. आजूबाजूला किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र रातकिड्यांचा आवाज कानात घुमत होता तर पायाखालची माती काटे, गवत, लहान खडे यांनी चालायला अडथळा आणत होती. पण रवींद्रचे लक्ष पुढे काळोखात जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या व्यक्तीवर खिळले होते आणि पुसट दिसत असणाऱ्या त्या व्यक्तीच्या मागे तो भान हरपल्या सारखं चालत जात होता. ना त्याच्या हातात टॉर्च किंवा काही दिवा नव्हता, ना त्या पुढे चालत असलेल्या व्यक्तीच्या हातात काही होते, केवळ चंद्राच्या प्रकाशात दिसेल एवढ्याच प्रकाशात ती व्यक्ती चालत होती पण, पायाखालची वाट, ती जागा, त्या व्यक्तीला अगदी तोंडपाठ असल्यासारखी वाटत होती. उलट रवींद्रचे लक्ष त्याच व्यक्ती कडे असल्याने तोच मधे मधे अडखळत होता, त्या व्यक्तीच्या हातात काहीसं असल्यासारखं त्याला दिसलं होत. काही झाडांमधून ती व्यक्ती फिरताना त्याला दिसली होती आणि कुणीही काही न सांगता, न बोलता रवींद्र त्या व्यक्ती मागे गेला होता. खरे तर काय गरज होती त्याला जायची अशा अनोळख्या व्यक्ती मागे पण तिथेच तर खरी कसोटी होती. ती व्यक्ती कोण आहे, कशाला आली आहे, इथे काय करत्ये, त्या व्यक्तीचा चेहरा दिसत का नाहीये, इतक्या अंधारात इथे काय काम? वगैरे वगैरे सगळे प्रश्न न पडता त्या व्यक्तीशी आपले काहीतरी नाते आहे असे त्याला वाटले होते आणि मग कसलाही विचार न करता तो त्या काळ्याकुट्ट अंधारात त्याच्या मागे चालला होता.

ती व्यक्ती काय म्हणून, कुठे जायचे आहे काही न माहीत असता रवींद्र त्याच्या मागे जात होता हे जरा चमत्कारिकच वाटत होतं. ती व्यक्ती चालताना ना मागे वळून पहात होती ना तिला माहीत होतं की रवींद्र तिच्या मागे येतोय ते, पण तिच्या चालण्याच्या गती वरून तरी ती कुणी वयोवृद्ध वाटत होती आणि थोडीशी वाकून चालत होती. काही मिनिटं तशीच गेली आणि ती व्यक्ती एका शेतात शिरली तशी रवींद्र सुद्धा योग्य अंतर राखून तिच्या मागे शेतात शिरला, शेत सम्पून ती व्यक्ती एका पोखरणी पाशी आली आणि थांबली. रवींद्र सुद्धा त्या व्यक्तीच्या साधारण ३० फुटांवर येऊन तिला कळणार नाही अशा ठिकाणी जाऊन थांबला.

पण रवींद्रचे सगळे मनसुबे बहूदा त्या व्यक्तीला समजले असावेत. त्या व्यक्तीने अंगावरची घोंगडी काढली तशी त्या मंद प्रकाशात रवींद्र ला दिसले की त्या व्यक्तीच्या हातात एक लहान मूल आहे. रवींद्र ते पाहून चाटच पडला, त्याला समजेना नक्की काय आहे हे, त्या व्यक्तीने त्या अंधारात सुद्धा मागे वळून रवींद्र कडे पाहिले तेव्हा त्याला पांढरी दाढी आणि चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत हे रवीला जाणवले. त्याने रवीकडे रोखून पाहिले आणि त्या हातातल्या लहान मुला सकट त्या पोखरणी च्या पाण्यात उडी मारली. रवींद्र ने ते पाहून तो जोरात ओरडला, “अरे एएईई काय करतोयस, वेड लागलंय का तुला? त्या बाळाला पाण्यात का बुडवतोयस” पण त्या व्यक्तीने पाण्यात स्वतःला झोकून दिलं होतं.

रवींद्र ते पाहून बिथरला होता, त्याला काय करावं हे कळत नव्हते, आपण काहीतरी करायला हवं हे त्याला सुचायला काही क्षण जावे लागले आणि त्याने आपल्या पायांना त्वरित आज्ञा देऊन तो जोरात धावत सुटला आणि त्याने पाण्यात उडी मारली. उडी मारल्याने तो पाण्यात बराच खाली गेला, वर यायला काही सेकंद लागली पण त्याचे डोळे उघडे ते उघडेच होते, ते शोधत होते त्या व्यक्तीला आणि त्या लहानश्या जीवाला जो अकल्पितपणे या पाण्यात का जाणे बुडत होता. त्याने आता हात पाय मारायला सुरू केले आणि नजर त्या पाण्यात त्या जीवाला शोधू लागली, काळोखात फारसं दिसत नव्हतंच पण त्याची हालचाल मंदावते आहे असे त्याच्या लक्षात यायला लागले, त्याचे हात पाण्यात हलणे थांबले, पाय फिरणे मंदावले, त्याच्या नाकात, तोंडात पाणी जाऊ लागले, त्याचा श्वास कोंडला जाऊ लागला, तो दुसऱ्याला वाचवण्यासाठी आलेला आता स्वतःला वाचवायला धडपड करू लागला, श्वास गुदमरायला लागला आणि अचानक रवींद्र झोपेतून बिथरलेल्या अवस्थेत जागा झाला आणि जोरजोरात श्वास घेत उठुन बसला. सत्य काय हे लक्षात यायला त्याला २ मिनिटं जावी लागली. आतापर्यंत आपण जगत होतो, पाण्यात बुडत होतो ते स्वप्न होतं हे लक्षात आल्यावर त्याने शांतपणे दीर्घ श्वास घेतला आणि तोंडावरून आपले दोन्ही हात फिरवले. स्वप्न होतं तर मग अंग ओलं का लागतंय हे पाहायला त्याने पोटाला, पायांना हात लावला तशी त्याला जाणवलं की त्याचं शरीर घामाने थबथबले आहे. याचे कारण त्याच्या लक्षात आले आणि ते स्वप्न त्याच्या चेहऱ्यासमोरून जशेच्या तसे परत फिरले.

त्याने उठून खोलीतला दिवा लावला अन घड्याळ बघितले, पहाटेचे ३:३० वाजले होते. ताई आणि तिचे मिस्टर बाहेरच्या झोपाळ्याच्या खोलीत झोपले होते तर रवींद्र माजघराच्या बाजूच्या खोलीत झोपला होता. त्याने खोलीतला दिवा तसाच चालू ठेऊन तो माजघरातून बाहेर आला. घरा बाहेर असलेल्या बाथरूममध्ये जाण्यासाठी त्याने तेथला दिवा पेटवला तशी त्याला बाथरूम मागच्या झाडांमध्ये काहीतरी हालचाल झालेली जाणवली. त्याने हळूच मागील बाजूस पाहिले पण परत काही हालचाल झाली नाही तशी त्याने रोखून धरलेला श्वास सोडला.बाथरूम मागे संबंध वाडी होती, त्यामागे शेत, सुरुचं बन आणि मग अथांग सागर. लहानपणा पासून मनावर बिंबवले गेले होते की रात्री वाडीत जायचे नाही, त्यामुळे तेव्हापासूनच वाडी विषयी एक अनाकलनीय अशी भीती रवींद्रच्या मनात घर करून बसली होती. संध्याकाळ नंतर वाडीकडे तो कधी पाहायचा ही नाही. आणि रात्री वाडीत जायची त्याने कधी हिम्मत केली देखील नाही. आणि आता तर पहाटेचे ३:४० वाजले होते.

तो बाथरूम ला जाऊन आला आणि बाहेर आल्यावर त्याच्या मनात ते स्वप्न परत धावू लागले. स्वप्नात त्याला झाडं दिसली होती, नारळाची, सुपारीची म्हणजे ती एखादी वाडीच होती की काय? आणि आपलीच वाडी असेल तर? त्याच्या मनात वाडीचा विचार आला आणि परत काहीतरी हालचाल झाली की काय मागे असे उगाचच त्याला वाटले. त्याने वाडी कडे जाणाऱ्या वाटेवर उगाचच निरखून पाहिले, सुकी वाळू वाऱ्या बरोबर पडून ती वाट त्या वाळूतल्या पांढऱ्या कणांनी चमकत होती आणि बाजूच्या लहान लहान झुडुपांची सळसळ होत होती. रवींद्र च्या मनात वाडीत जावे की न जावे अशी अडचण निर्माण झाली आणि त्याने त्या पहाटेच्या अंधारात त्या वाडीला, आजूबाजूच्या परिसराला एकदा पाहिले आणि ही योग्य वेळ नाही असे स्वतःला समजावून त्याने परत घराकडे पावलं टाकली. रवींद्र वाडीकडे पाठ फिरवून घराकडे फिरला खरा पण वाडीत त्या व्यक्तीला तो कधीतरी पाहू शकणार होता का? वाडीत ती व्यक्ती खरंच होती का? या प्रश्नांची उत्तरं काळच देणार होता.

आता वाट पहायची होती ती योग्य वेळेची आणि योग्य काळाची….. ती रात्र पहाटे वाहणाऱ्या सुसाट वाऱ्याच्या पाठीवर बसून नव्या दिवसाच्या स्वागताला निघाली होती, आपल्या पोटातल्या अनेक युगांची रहस्य उलगडण्या साठी.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..