युसूफ मेहेर अली हे स्वातंत्र्यपूर्व भारतात इंग्रजाच्या जुलूमी रावटीविरोधात कामगारांना व शेतकर्यांना संघटित करुन त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे प्रखर व तेजस्वी सेनानी होते. त्यांच्या बाणेदार व तडफदार स्वभावाचा वारसा पुढे चालवत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पनवेलमधील तारा या निसर्गरम्य गावी युसूफ मेहेर अली सेंटर सुरु करण्यात आले व काही वर्षांमध्येच या सेंटरने स्वच्छ प्रतिमा व समाजवादी तत्वांच्या बळावर स्वतःचा आदरयुक्त दबदबा निर्माण केला. तळागाळातील लोकांसाठी व हरवत चालेली नैसर्गिक संपत्ती जपण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले. आज ही संस्था युसूफ मेहेर अलींनी अनेक वर्षांपूर्वी बघितलेल्या स्वप्नांना व आदर्श समाजाच्या त्यांच्या संकल्पनांना सत्यात उतरवण्यासाठी झटत आहे, त्यांच्या तत्वांना व नावाला साजेशी समाजसेवा करीत आहे, स्थानिक लोकांची व आदिवासांची भक्कम व व्यापक चळवळ उभी करुन सावकारशाही विरोधात रणशिग फुंकत आहे, तसेच स्त्री-पुरुष एकात्मतेचा संदेश गावागावांच्या नसांमध्ये भिनवून स्त्रियांचे सक्षमीकरण व विचारमंथनाद्वारे त्यांचे संघटन करीत आहे. त्यांनी आजपर्यंत म्हणजे गेली ५० वर्षे ज्या निरपेक्षपणे व अतिशय कल्पक व संशोधन वृत्तीने आपले प्रकल्प व योजना अंमलात आणून स्थानिक व विशेषतः आदिवासी जनतेच्या रखरखलेल्या जीवनात प्रेमाची , विश्वासाची व स्वयंसिध्दतेची जी नवी पालवी रोवली आहे, त्याला तोड नाही. अनेक कार्यकर्त्यांच्या निरपेक्ष व अपार कार्यक्षमतेमुळे व त्यांनी तळागाळातील लोकांसाठी दाखवलेल्या प्रचंड आत्मीयता व तळमळीमुळे आज कित्येकांचे संसार सुखी व स्वयंपूर्ण झाले आहेत. प्रत्येक गावामध्ये उतरुन तिथल्या स्थानिकांशी आपुलकीचं व विश्वासाचं नातं निर्माण करुन त्यांच्यासाठी नव्हे तर त्यांच्याब रोबर काम करण्याची कार्यपध्दती येथील प्रत्येक कार्यकर्त्याने अंगी जोपासल्यामुळे कित्येक वर्षांपूर्वी पेरलेल्या समाजसेवेच्या बीजाचं आज गुलमोहोरात रुपांतर झालं आहे व त्याला दिवसेंदिवस नव्या कल्पनांच्या व उपक्रमांच्या फांद्या फुटतच आहेत. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये जतन केली गेलेली एकात्मता, माणुसकी व आधुनिक तंत्रज्ञान यांचा परस्परमेळ घातला तर एखाद्या गावाचे रुप कसे पालटू शकते याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे या केंद्राने ‘तारा’ या गावाचा बदलेला चेहरामोहरा. हे केंद्र आदिवासी लोकांना स्वावंलबनाची व स्वाभिमानाची शिकवणच देत नाही, तर त्यांच्यासाठी प्रत्यक्ष रोजगाराच्या संधिसुध्दा निर्माण करुन देत आहे. केवळ स्त्री-पुरुष समानतेच्या वल्गनाच करीत नाही, तर त्यासाठी गावोगावी हिंडुन, तेथील वनवासी महिलांच समाजप्रबोधन व संघटन करुन त्यांचे बचतगट स्थापन करुन त्यांना पुरुषप्रधान संस्कृतीत स्वतःचे अढळ असे स्थान व आर्थिक अस्तित्व मिळवून देण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. स्थानिक लोक तसेच आदिवासाी जनतेच्या लहान मुलांना जमवून त्यांचे संस्कारवर्ग चालवण्यापासून ते त्यांच्यात शिक्षणाची गोडी रुजवून, त्यांना बारावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यामातून मोफत देण्याची सोय करीत आहे. हे शिक्षण मोफत असले तरीही त्याच्या गुणवत्तेत व दर्जेदारपणाबद्दल कुठलीही फारकत केली जात नाही. या शाळेत स्थानिकंची मुलंसुध्दा शिकतात, ज्यांच्याकडुन अगदी नाममात्र फी आकारती जाते. या शिक्षणप्रसाराद्वारे हे केंद्र ग्रामीण व आदिवासाी संस्कृतीमधील तसेच आदिवासी व शहरी संस्कृतीमधील दुव्याचे महत्वपुर्ण काम करीत आहे. बेरोजगार तरुणांनी शहरात जावून पडेल ते काम व मजुरी करण्यापेक्षा त्यांना स्वश्रमाचे महत्व पटवून देऊन, व त्यांच्यामधील विशेष कलाकौशल्यांचा व आ वडींचा वेध घेऊन त्यांना गावातच नवीन व्यवसाय थाटण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. या केंद्राने सुरु केलेल्या लघुउद्योग प्रकल्पांमध्ये सध्या अनेक निराधार तरुण, स्थानिक व प्रौढ आदिवासी व्यक्तीसुध्दा आपापल्या बौध्दिक व शारिरीक मर्यादांच्या अनुशगांने काम करीत आहेत. त्यांना नियमीत रोजगार तर मिळतो आहेच, शिवाय त्यांच्यामधील कल्पनाशक्तीला व निर्माणशक्तीला नवं खाद्य मिळत आहे. त्यामुळे कित्येक वर्षांनंतर आज या संस्थेला आदिवासी लोकांच्या मनात उदयोजकतेचे ताटते फुलवण्यात, वनवासी महिलांच्या जीवनात स्वावलंबनाचा प्रकाश ओतण्यात व स्थानिक लोकांच्या जीवनात परिपुर्णतेचा व आनंदाचा शिडकावा करण्यात भरगोस यश प्राप्त झाले आहे. या केंद्राने सर्व स्थानिकांना आर्थिक स्थैर्य देण्यास व सामाजिक तसेच आर्थिक समृध्दीचं शीतल चांदण गावागावांमध्ये शिपडण्यास मदत केली असली तरीसुध्दा स्वतःच्या न्याय्य हक्कांकरिता व स्वाभिमानाकरिता अंगात लागणारे सुर्याचे प्रखर तेज व आत्मविश्वास त्यांच्यात पुन्हा जागवण्याचा आगळावेगळा निर्धार केला आहे.
या केंद्राने जरी त्यांच्या उपक्रमांद्वारे आदिवासींच्या जीवनात शहरी संस्कृतीचे, व सुधारणावादी मवाळ विचारांचे वारे आणण्यास मदत केली असली तरीही या वार्यांमुळे शहरीकरणाचा विशेषतः बाजारीकरणाचा स्पर्श व गंध नसलेली त्यांची पुरातन संस्कृती लोप पावू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. आदिवासांच्या वाळवंटी जीवनामधील मरुदयानाचे काम करत असताना हे काम अंमलात आणण्यासाठी निसर्गाशी स्पर्धा न करता त्याच्या हातात हात देऊन हे काम केल्यामुळे या संस्थेच्या कामाला पर्यावरण प्रेमींकडुन विशेष दाद मिळाली आहे.
काही प्रकल्प व उपक्रमः-
लघुउद्योग ः- युसुफ मेहेर अली सेंटरने अनेक स्थानिक व बेरोजगार आदिवासी तरुणांना आर्थिक स्थैर्य देण्याबरोबरच त्यांच्यामधील विविध कलाकौशल्यांना व उपजत कष्टाळु वृत्तीला एक व्यावसायिक साचा पुरवण्याचं काम केलं आहे. मुख्य प्रकल्प केंद्रापासून १ किमी अंतरावर, सर्वच कार्यकर्त्यांच्या अपार कष्टांमधून जन्मास व आकारास आलेलं हे लघुद्योग केंद्र म्हणजे स्वयंसिध्दतेकडे घेवून जाणारं प्रवेशद्वारचं आहे. इथे अनेक प्रकारच्या दर्जेदार नैसार्गिक साधनांपासून बनवलेल्या वस्तू विकल्या जातात. या लघुद्योग केंद्रामध्ये एक तेलघाणी आहे, जिच्यात साधारण १०-१२ लोक काम करतात, व या घाण्यात दररोज निरनिराळया प्रकारची खाद्य व अखाद्य तेले जसे की, शेंगदाणा, तीळ, राई, बदाम तेल, निरगुंडीचं तेल, कडूलिब तेल, हर्बल हेअर ऑईल, खोबरेल तेल बनवली जातात. त्यामुळे स्थानिकांना पुर्णतः शुध्द, सकस व ताजं तेल अतिशय रास्त दरात मिळतं. या तेलाची गुणवत्ता व दर्जा टिकवून ठेवण्यासाठी या स्थानिक लोकांना कसुन प्रशिक्षण देण्यातं येतं.
या केंद्राचा एक साबणनिर्मिती कारखानासुध्दा आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारची सुवासिक व काही औषधी साबणे तयार केली जातात. यातील प्रत्येक साबण हे अतिशय नैसर्गिक पध्दतीने बनले असल्यामुळे व त्यांच्यात कुठलाही रासायनिक अंश अगदी नगण्य नसल्यामुळे, यांपासून त्वचेला कुठल्याही प्रकारचा अपाय होत नाही. शरीराला उजाळा येतो. कुटीर, सहकार, चंदन साबण, सर्वोदय, नीम साबण इ. साबणांना उत्कृष्ट दर्जा, अतिशय रास्त किमत, टिकाऊपणा व सुगंध यांच्याबरोबर स्वदेशीपणाचा आपलासा वाटाणारा स्पर्श आहे. त्यामुळे या साबणांना पंचक्रोशीत अतिशय मागणी असते.
बेकरी विभागामध्ये अस्सल महाराष्ट्रीयन संस्कृतीची चव जिभेवर खेळवणारे अनेक ताजे, दर्जेदार व रुचकर पदार्थ जसे की ब्रेड, पाव, जिरा बटर, केक, विविध रंगाची व आकारांची बिस्कीटे, व खारी बनवले जातात व आसपासच्या दुकानांमध्ये विकले जातात. या केंद्राच्या आसपासमधील गावांना दुध, ताजे बेकरी पदार्थ व उत्तम गुणवत्तेच तेलं, या गोष्टींचा तुटवडा कधीच भासत नाही. या बेकरीच वैशिष्टय म्हणजे इथे इलेक्ट्रोनिक नाही तर संपुर्ण लाकडी भट्टीचा वापर केला जातो. या बेकरीमुळे साधारण ४-५ लोकांना नियमीत रोजगार मिळतो.
कुंभारकाम विभागामध्ये ४ ते ५ लोक आपल्या असामान्य कार्यक्षमतेमुळे व अफाट कल्पनाशक्तीमुळे अनेक कलात्मक मातीच्या वस्तू की मातीची घंटा, खेळणी, निसर्ग दिप, पीगी बँक, भितीवरील घडयाळे, वॉटर फाँटन, इ. अनेक आकर्षक व बारीक नक्षीकामाने वेढलेल्या वस्तू बनवून या विभागाची धुरा अतिशय समर्थपणे वाहात आहेत.
सुतारकाम विभागामध्ये अतिशय उत्तम दर्जाचे लाकूड वापरुन सुबक खुर्च्या फोल्डिग टीपॉय, टेबल व इतर प्रकारचं फर्निचर स्थानिक युवकांकडूनच तयार करुन घेतलं जातं.
या केंद्राची यशस्वी वाटचाल समजावून घेण्याकरिता अनेक आसपासच्या शाळांमधून, कॉलेजांमधून, संस्था-संघटनांमधून, महिला-मंडळामधुन, तसेच अर्किटेकचर (वास्तुशास्त्र) व ग्रामीण विकास (rural development) या क्षेत्रांशी संबंधित तज्ञ व्यक्ती आवर्जुन येतात, त्यांच्या आदरतिथ्यासाठी व खाद्यसराईसाठी येथे एक ढाबासुध्दा बांधला आहे.
गांडुळ व सेंद्रिय खत निर्मीती प्रकल्प, डेअरी व गो शाळाः-
या केंद्राने केलेल्या प्रत्येक कार्याला पर्यावरणसंवर्धनाचा गंध व आधुनिकतेला व व्यावसायिकतेला नैतिकतेशी जोडणारा अनोखा बंध असल्यामुळे या केंद्राने तयार केलेल्या वस्तू, व राबवलेले उपक्रम इतरांच्यामध्ये जरा उचवेच ठरतात. या केंद्रातून तसेच या केंद्राने राबवलेल्या विविध उपक्रमांतून तयार झालेल्या कचर्याचं नीट वर्गीकरण करुन मग तो कचरा गांडुळ व सेंद्रिय खत निर्मीती प्रकल्पाकडे पाठवला जातो. तेलघाणी, बेकरी, साबण निर्मीती कारखाना, भोजनालय यांचं किचन वेस्ट, पालापाचोळा, काडीकचरा, गोशाळेमधील उरलेले शेण व गोमुत्र या सगळयाचं अर्धविघटन करुन साधारण ४ महिन्यात उत्तम प्रकारचं गांडुळ खत तयार होतं. या गांडुळांना नियमीत खाद्य देण्यासाठी, व त्याचं उन्हापासून संरक्षण करुन खताचा ओलसरपणा टिकवण्यासाठी इथे दोन स्त्रियांची नेमणूक केली गेली आहे. या डेअरीत दहा गायी असून त्यांचं दुध भोजनालयात व आसपासच्या दुकांनामध्ये विक्रीसाठी पाठवलं जातं. गोमुत्र सुध्दा इथे पुजा-अर्चा किवा धार्मिक विधींसाठी अगदी रास्त दरात विकलं जातं. जमीनीची गुणवत्ता, व कस वाढवण्यासाठी या गांडुळ खताचा योग्य वापर अत्यावश्यक असतो. या भागातील अनेक शेतकरी, फार्म हाऊसचे मालक व नर्सरीवाले या केंद्राकडुनच उत्तम प्रतीचं व निसर्गाच्या बुडत्या समतोलाचा आधार देणारं गांडुळ खत खरेदी करतात व त्यांना कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापरण्यास मनाई केली जाते.
बायोगॅस प्रकल्पः-
गोशाळेतील १० गायींना अतिशय उत्तम प्रतीचा आहार व वैयक्तिक स्वच्छता देऊन, त्यांचं शेण सुकवून त्याचा काही भाग हा बायोगॅस प्रकल्पास पाठवण्यात येतो तर उरलेल्या भागाचं गांडुळखत तयार होतं. या प्रकल्पामधून निर्माण झालेल्या बायोगॅसचा वापर हा भोजनालयात अन्न शिजवण्यासाठी व दिव्यांसाठी उर्जा म्हणून केला जातो.
नैसर्गिक दर्जा व गुणवत्ता यांचे जतन करणारे हे प्रकल्प अतिशय हिरव्या गर्द लाटांच्या साम्राज्यामध्ये वसले असून एखाद्या सुंदर खेडयाची आठवण करुन देणारे आहेत. त्यामुळे निरनिराळया प्राण्यांची, पक्षांची नेहमीच इथे झुंबड उडालेली असते. हा प्रकल्प दहा गुंठयांचा असून येथील परसबागेत निरनिराळया प्रकारच्या फळभाज्या व फुलभाज्या जसे पालक, टोमॅटो, मिरची, काकडी, वांगी, कडीपत्ता व अनेक प्रकारच्या पालेभाज्या उगवण्यात येतात. या केंद्रामधील ढाब्यामध्ये पण अन्न, शिजवण्यासाठी बायोगॅसचा वापर केला जातो. वाया गेलेलं अन्न, गोबर, तसेच परसबागेमधील काडीकचरा या गोष्टी प्रामुख्याने या गॅसच्या निर्मीतीमध्ये वापरतात. बायोगॅस व्यतिरिक्त घन कचर्यापासून विज निर्मिती, तसेच सौरउर्जेचा प्रकल्प पाणी तापवण्यासाठी, जेवणासाठी व दिवे पेटवण्यासाठी हे प्रकल्पसुध्दा प्रायोगिक तत्वांवर चालू आहेत.
स्त्री संघटनः-
युसुफ मेहेर अली सेंटरच्या महिला कार्यकर्त्यांनी स्त्री संघटनेसाठी व एकात्मतेसाठी गावोगावी फिरुन तेथील स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देत, त्यांच्यामधील स्वाभिमानाची व स्वावलंबनाची ज्योत पेटवून त्यांचे महिला बचत गट स्थापन केले आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीत त्यांना मान वर करुन जगायला शिकवले आहे. व त्यासाठी आधी त्यांना स्वतःच्या पायांवर उभे राहायला शिकवले आहे. अनेक गरीब व गरजू महिलांना जमवून त्यांच्यात बचत करण्याची चांगली सवय रुजवून त्यांना शिलाईकाम, भरतकाम, विणकाम, हस्तकला व स्वयंपाक आदी कलांचे खोलवर व शास्त्रोक्त प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचे व्यवसाय थाटण्यास प्रवृत्त केले आहे. त्यांच्यावर शिक्षणाचे महत्व बिबवून प्रौढशिक्षण अभियान धडाक्यात राबविले आहे. या केंद्राच्या अविरत प्रयत्नांमुळे आसपासच्या अनेक गावांमधील स्त्रिया स्वयंपुर्ण झाल्या असून अनेक जणींनी स्वकष्टाने व या केंद्राच्या सतत प्रोत्साहनाने मग ते मानसिक असो वा आर्थिक स्वतःमधील आवडींचा व कलागुणांचा वेध घेवून सुगंधी अगरबत्त्या, मेणबत्त्या, पापड, लोणची, खरवस, मसाले, सुके पदार्थ, भाजणी व फराळ अशा अनेक वस्तुंचे व रुचकर पदार्थांचे घरच्या घरी उत्पादन व विक्री सुरु केली आहे. काही जणींनी स्वतःच्या जनजागरण संघटना स्थापन केल्या असून एकत्रितपणे पुरुषप्रधान संस्कृतीमधून जन्माला येणार्या दादागिरीविरुध्द व अत्याचाराविरुध्द बंड पुकारले आहे. काही जणी महिला मंडळांच्या माध्यमातून हुंडाविरोधी जागृती, रात्रशाळा, प्रौढ शिक्षण, सणासुदींच्या वेळी पूर्ण गावं सजवणं, गावागावांमध्ये स्वच्छता मोहिम राबवणं, होतकरु आदिवासी मुलांना शालेय साहित्य व गणवेशांची मदत करणं, भारनियमविरोधात किवा अन्य सरकारी अन्यायकारी धोरणांविरोधात ोर्चे नेणं, घरगुती हिसाचाराविरुध्द आंदोलन करणं, व्यावसायिकांविरुध्द संप पुकारणं अशा अनेक उपक्रमांद्वारे समाजप्रबोधनाचा प्रयत्न करत आहेत. काही जणींनी कौटुंबिक सल्ला केंद्रे उघडुन सामोपचाराने स्वतःच्या संसाराचा घडा टिकवून ठेवण्यासाठी व जोडप्यांमधील सर्व भांडण तंटे मुळापासून उकरुन काढण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिलयं. काही महिला दरमहा, ५ किवा १० रुपयांची बचत करुन महिला बचत गटांमध्ये खारीचा वाटा उचलत आहेत. सावकाराकडुन कर्ज घेताना तारण द्याव लागतं, परंतु इथे मात्र कुठल्याही प्रकारचं तारण मागीतलं जात नाही. काही अतिशय धडाडीच्या महिलांनी रोजगार हमीचं काम घेणे, नर्सरीसाठी मातीच्या पिशव्या बनवणे, पोळी-भाजी चे डबे देणे, परसबागांमध्ये औषधी झाडे लावून ती विकणे, फळांच्या व भाजांच्या गाडया टाकणे, वडापावची टपरी चालवणे, गावातील लग्नसंमारभाच्यावेळी लागणार्या गरम भाकर्यांची मागणी पुर्ण करणे,वृक्षारोपणासाठी लागणारे खड्डे खोदण्याचे कंत्राट घेणे, पीठचक्क्या, मच्छीव्यवसाय सुरु करणे, पानटपर्या अशा असंख्य लहान मोठया उदयोगधंदयाद्वारे स्वयंसिध्दतेचा वसा समर्थपणे चालवला आहे. नुकतेच कोपरगावामधील स्त्रियांच्या दोन महिला बचत गटांनी पाण्याच्या टाक्या बांधण्याचे कंत्राट आपल्या हाती घेतले. या सर्व उदयोगधंदयासाठी लागणार्या सर्व खर्चाची पुर्तता एकतर महिला बचत गटांतर्फे किवा युसूफ मेहेर अली सेंटरतर्फे केली जाते.
आदिवासी लढा:-
युसुफ मेहेर अली सेंटरने उभी केलेली, आदिवास्यांच्या न्याय हक्कांचे जतन करणारी व्यापक व सर्वव्यापी चळवळ म्हणजे प्रत्येक आदिवासीच्या मनातला आवाज आहे, त्यांच प्रत्येकाचं हक्काचं असं व्यासपीठ आहे, त्यांच्या सगळयांच्या गरजा व समस्या, त्यांच्या जीवनाचं जळजळीत वास्तव प्रतिबिबीत करणारा एकत्रित मंच आहे, व हा सर्वांच्या मनातून निघालेला आवाज गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या अस्तित्वाचं व अनेक वर्ष जोपासलेल्या त्यांच्या पारंपारिक संस्कृतीचं व जीवनपध्दतीचं प्रतिनिधीत्व करतो आहे. आदिवास्यांची जी मुले वीटभट्टयांवर, ऊस तोडणीसाठी, उपहारगृहांमध्ये कमी मजुरीमध्ये राबत आहेत त्यांना शाळेत घालून विनामुल्य शिकवणे, आदिवास्यांच्या जमीनहक्कांसंदर्भातील तक्रारी तहसीलदारांपर्यंत पोहोचवणे, चुकीच्या जमीन व्यवहारांचे बिग फोडणे व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणे, स्थलांतरीत शेती करण्याच्या आदिवास्यांना कायमस्वरुपी शेती करण्यासाठी लागणारं भांडवल पुरवणे, राहती जागा नसलेल्या किवा सावकारांकडुन फसवणूक झालेल्या आदिवासी कुटूंबियांची तात्पुरती निवास व्यवस्था करणे, आदिवासी हक्कांची पायमल्ली करणार्या शेत मालकांना व जमिनीवर बेकायदेशीर हक्क सांगणार्या सावकारांना कायदेशीर मार्गाने धडा शिकवणे, खासगी जमिनीवर राहणार्या व इतरांच्या नावाने असलेली जमीन पूर्वी पासून कसणार्या आदिवास्यांना सात-बारा करायला लावणे, व अन्याय झालेल्या आदिवास्यांना कायदेशीर आधार मिळवून देणे, असं अतिशय भरीव व गौरवास्पद कार्य करणार्या या संस्थेला “आदिवासी सेवक संस्था पुरस्कार” ही मानाची सनद प्राप्त झाली आहे. MRGS रोजगार हमी योजनअंतर्गत आदिवासी विकास खात्याकडुन सर्व गरजु आदिवास्यांना वित्तपुरवठा व कर्ज मिळवून देण्यात सुध्दा या सं ्थेचा हात आहे.
बापु कुटी योजनाः-
गांधीजीनी अनेक वर्षांपूर्वी पहिलेलं स्वयंपुर्ण, सन्मानित व स्वशासित खेडयांच्या जाळयाच स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अतिशय कल्पक अशा दुरदृष्टीने या बापुकुटी योजनेची प्रतिकृती करण्यात आली. स्वयंपुर्ण गावांची रचना भारतीय अर्थव्यवस्थेला कशी उभारी देऊ शकते व अतिशय पर्यावरणसवर्धक वातावरणात गृहनिर्मिती कशी होऊ शकते, घरबांधणीमधून वाढणार्या जागतिक तापमानाला आळा कसा बसू शकतो, हे लेकांच्या बध्दीला पटवून द्यायचा हा या केंद्राचा छोटासा प्रयत्न अतिशय अभ्यासपूर्ण नैतिकतेचं मुर्तिमंत उदाहरणं!
रुग्णालयः-
युसुफ मेहरे अली सेंटरच्या रुग्णालयाचे वेगळेपण म्हणजे इथे केवळ स्थानिक रहिवाश्यांचीच नव्हे तर अगदी रत्नागिरी व भर या लांबच्या गावांमधून येणार्या रुग्णांचीही नुसती झुंबड उडालेली असते. या रुग्णालयाची गणना महाराष्ट्रातल्या सर्वात चांगल्या व प्रतिष्ठित NGO पैकी होते. या रुग्णालयाने गेली अनेक वर्षे उत्तम फिजोओथेरपी व्यायाम, विशेष उपकरणेव आयुर्वेदाचा विशेष वापर या चौकडीच्या साहाय्याने अनेक अस्तिव्यंग रुग्णांचे, पोलिओचे, सेरेब्रल पाल्सी व इतर लक्वाग्रस्तांचे तसेच पाय, मान व डोकेदुःखी वैतागलेल्या रुग्णांचे किवा इतर व्याधीनी अथवा इजांनी जखडलेल्या रुग्णांना जसे भाजणे, लचकणे, मुरगाळणे. पुर्नसंजीवनी देण्याचे चोख काम केले आहे. अतिशय दक्ष, प्रेमळ व आपल्या कार्यात अतिशय सेवातत्पर असा कर्मचारी वर्ग, तज्ञ चिकीत्सक मंडळी, टी. बी. चे शास्त्रशुध्द व संपुर्ण विनामुल्य उपचार, नियमीत चेक उप, वैद्यकिय शिबीरे, डोळयांच्या सर्व शस्त्रक्रिया, हार्निया व हायट्रोसिल सारख्या लहान-मोठया व्याधीवरील शस्त्रक्रिया, दर रविवारी उघडणारी पॅथोलोजी, व सामान्य रोगांवर आयुर्वेदिक उपचार, वेगळे x-ray सी. जी. तसेच अतिशय अद्ययावत व आधुनिक सोयीने सुसज्ज असलेले डेन्टल युनिट या सर्व गोष्टींमुळे या रुग्णालयाची ख्याती अगदी पंचक्रोशीत पसरली आहे. फक्त १०० रपयांचा मासिक पास काढुन इथे केव्हाही येता येंते, व अतिशय अल्प दरात सर्व प्रकारच्या औषधोपचारांचा व शस्त्रक्रियांचा लाभ घेता येतो. आदिवास्यांसाठी मात्र सर्व उपचार इथे अगदी विनामुल्य असतात. डोळयांच्या शस्त्रक्रियांसाठी इथे खास मुंबईवरुन तज्ञ सर्जन व इतर डॉक्टरांना पाचारण केलं जातं व एकही पैसा न घेता फक्त समाजसेवेसाठी हे चिकीत्सक या शस्त्रक्रिया मोफत करुन देतात. यावरुन युसूफ मेहरे अली सेंटरन प्रामाणीकपणे उभारलेला समाजसेवेचा हा दीपस्तंभ आज अगदी महाराष्ट्रामधील सामाजिक बांधिलकी जपणार्या उच्चभु व्यावसायिकांना कसा भावतोय, हे दिसुन येतं.
दहा गुंठा योजनाः-
दहा गुंठा योजनेअंतर्गत दहा गुंठे परिसरात एका कुटूंबाची राहण्याची व व्यवसायाची व्यवस्था कशी होईल याचा अभ्यास केला जात आहे. दोन गुंठयात जनावरे , एक गुंठा राहण्यासाठी, एक गुंठा परसबाग अशी साधारण या योजनेची रचना असून ५ जणाच कुटूंब या जागेत सहज आपला उदरनिर्वाह करु शकते. या योजनेमध्ये पाणी बचत व सांडपाण्याचे योग्य नियोजन या गोष्टींना केंद्राने महत्व दिले आहे.
शाळाः-
तारा या अतिशय प्रदुषण गावी उभारलेल्या शाळेत सुमारे ५०० मुले-मुली शिकतात. अतिशय मंत्रमुग्ध करणारी निसर्गसृष्टी, भारलेला परिसर, अभ्यासाला पोषक असं वातावरण प्रशिक्षीत शिक्षक वर्ग व अभ्यासाव्यतिरक चालणारे विविध उपक्रम अशा सर्वच गोष्टीमुळे हा आदिवास्यांच्या जीवनातला टर्निग पॉईट ठरतो. येथे बहुतांशी विद्यार्थी हे आदिवासी आहेत, व शांतीनिकेतन नावाच्या एका संस्थेशी ही शाळा निगडीत आहे. साने गुरुजी जयंतीला इथे सर्वात मोठा समारंभ साजरा केला जातो, जिथे प्रतिष्ठित वक्त्यांना व विचारवंतांना मार्गदर्शनासाठी बोलावलं जातं. R.S.P. म्हणजेच या शाळेची अनोखी खोज आहे, ज्यात मुलांना प्रशिक्षण देऊन रस्त्यांवर रस्तेवाहतूक नियंत्रणासाठी व महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून ठेवलं जातं. ही शाळा बारावीपर्यंत असून, मराठी व सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षण दिलं जातं.
— अनिकेत जोशी
खूप छान माहिती मिळाली समाजसेवेची मी २०११ मध्ये मुंबईला ह्या संस्थेच्या अंतर्गत सद्भावना संघटना व मैत्री संघटना मार्फत प्रशिक्षण घेऊन आज दहा बर्ष यशस्विपणे स्वतचे वर्तमान पत्र सा. मलंगरत्न सामाजिक व शासकीय योजनांचा व राजकिय घडामोडी प्रकाशित करित आहे. माझा त्रिवार धन्यवाद !