कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

कोल्हापुरातील मुख्य उद्योग शेती आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसाय आहेत. याशिवाय कोल्हापूर शहराजवळ लोहकाम आणि कोल्हापुरी चपला बनवण्याचे बरेच छोटे कारखाने आहेत. सहकार व उद्योगधंदे-कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे माहेरघरच मानले जाते. जिल्ह्यात कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी, हुपरी, यड्राव, हातकणंगले शिरोळ, शिरोली, हलकर्णी व गडहिंग्लज या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. इचलकरंजी येथील औद्योगिक वसाहत ही सहकारी तत्त्वावरील देशातील सर्वांत मोठी वसाहत आहे.
इचलकरंजी या शहरात बरेच वस्त्रकामाशी संबंधित उद्योग आणि कारखाने आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ ही जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण संस्था गोकूळ या नावाने ओळखली जाते. जिल्ह्यात वारणानगर येथे दुधाचे पदार्थ तयार करण्याचा उद्योग आहे. वारणा सहकारी दूध उत्पादक संघाचे वारणा दूध तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ मुंबई, ठाणे, पुण्यासह कर्नाटक व गोवा या राज्यातही जातात. पूर्वीपासूनच्या उसाच्या भरघोस उत्पादनामुळे जिल्ह्यातील गूळ उद्योगाला सुमारे १५० वर्षांची परंपरा आहे. येथील गूळ महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यांतही प्रसिद्ध आहे.
येथील साखरही प्रसिद्ध असून पूर्वीपासून साखरेची निर्यात केली जाते. जिल्ह्यातील कागल, हातकणंगले व शिरोळ तालुक्यात तंबाखुचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यामुळे जिल्ह्यात विडी उद्योगही मोठ्या प्रमाणावर चालतो. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत बनणार्‍या कोल्हापुरी चपला भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. पर्यटकांसाठी हा आकर्षणाचा मुद्दा आहेच, शिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशांत कोल्हापुरी चपलांची निर्यात केली जाते. कागल तालुक्यातील कापशी हे गावही या चपलांसाठी प्रसिद्ध आहे. येथील हुपरी हे गाव चांदीवरील कलाकुसरीच्या कामासाठी प्रसिद्ध आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*