आजची मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुहा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. १५३४ साली पोर्तुगीजांनी बहादूरशहाकडून मुंबई काबीज केली व तिला बॉम बाहीया असे नाव दिले. १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याच्या कॅथेरीन दे ब्रगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. कंपनीस मुंबई ही उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली. १६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले कार्यालय सुरतेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली. १८१७ ते १८४५ पर्यंत होर्नबी वेलार्ड (Hornby Vellard)च्या अंतर्गत बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ ४३८ वर्ग कि.मी. झाले. १८५३ रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईत बनवला गेला. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात मुंबईही जगातील प्रमुख कापूस बाजारपेठ म्हणून उदयास आली व शहराची भरभराट सुरुच राहिली. सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर झाले.
पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. १९०६च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे कोलकात्याखालोखाल दुसरे मोठे शहर बनले. भारती स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. महात्मा गांधीनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरू केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई ही बॉम्बे इलाख्याची राजधानी झाली. १९५० साली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढविण्यात आल्या.
१९५५ नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून महाराष्ट्र व गुजरात राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर विरोध केला व मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. १०५ हुतात्म्यांच्या आहुती नंतर मे १, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन मुंबईला राजधानी बनवण्यात आले.
१९७० च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायाची भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई कोलकात्याला मागे टाकून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे मराठी लोकांमध्ये असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी शिव सेना नावाची राजकीय संघटना उदयास आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. मराठी अस्मितेच्या रक्षणार्थ मुंबईची हिंदी भाषा व इंग्लिश भाषा नावे बदलून केवळ मुंबई हे मराठी नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या मध्य रेल्वेतील प्रमुख स्थानकास छत्रपती शिवाजींचे नाव देण्यात आले.
Leave a Reply